राहुल गांधी खरंच मार्शल आर्टमध्ये 'ब्लॅक बेल्ट' आहेत का?

  • दिलनवाज पाशा
  • बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
भरद यांच्या मते, राहुल गांधींचा हा फोटो 2016 सालचा आहे.

फोटो स्रोत, TWITTER/BHARAD

फोटो कॅप्शन,

भरद यांच्या मते, राहुल गांधींचा हा फोटो 2016 सालचा आहे.

जपानी मार्शल आर्ट आयकिडो शिकतानाचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.

भरद नावाच्या व्यक्तीने हे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. काँग्रेसचं सोशल मीडिया अकाउंट बघणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी या फोटोंना रिट्वीट केलं आहे.

"हे फोटो 2016 सालच्या डिसेंबर महिन्यातील असून ते मी स्वत: शेयर केले आहेत. तसंच माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही," असं भरद यांनी बीबीसीला सांगितलं.

"आयकिडोच्या माध्यमातूनच मी राहुल यांना ओळखतो. त्यांच्यासोबत आयकिडो शिकताना मला आनंद होतो," भरद पुढे सांगतात.

फोटोंमध्ये राहुल गांधींसोबत त्यांचे प्रशिक्षक सेंसेई पारितोस कार आहेत. ज्यांना राहुल गांधी यांनी मात दिली होती.

'आयकिडोमध्ये मला ब्लॅक बेल्ट आहे'

भरद यांच्या मते, "राहुल गांधी हे नियमितप्रमाणे आयकिडोचा सराव करतात आणि क्लासमध्ये ते बहुतांश वेळी शांत असतात."

राहुल यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळं जपानी मार्शल आर्ट आयकिडोचा प्रचार झाला आहे, असं भरद यांना वाटतं.

फोटो स्रोत, TWITTER/BHARAD

फोटो कॅप्शन,

2013-14 या वर्षात राहुल यांनी आयकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असल्याचं डॉ. थिंड सांगतात.

राहुल यांनी नुकतंच यासंबंधी म्हटलं होतं की, "मी आयकिडोचा अभ्यास करतो, धावायला जातो, पोहायलाही जातो, तसंच आयकिडोत मला ब्लॅक बेल्टही आहे."

"बहुतेक वेळा राहुल घरी राहूनच आयकिडोचा सराव करतात. त्यासाठी आमचे प्रशिक्षक त्यांच्या घरी जातात", असं राहुल गांधी यांच्यासोबत नियमित सराव करणारे डॉ. ओपिंदर थिंड सांगतात.

"कधी-कधी त्यागराज स्टेडियमवर येऊन ते सराव करतात," असंही डॉ. ओपिंदर थिंड यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, OPINDER THIND

फोटो कॅप्शन,

राहुल येतात, सराव करतात आणि निघून जातात असं डॉ. पिंड सांगतात.

ते पुढे सांगतात, "आयकिडो एक जपानी मार्शल आर्ट आहे. यामुळं व्यक्तीमध्ये स्वयंशिस्त रुजण्यास मदत होते. आध्यात्मिक भावना वाढीस लागते. याचा उद्देशच स्व:संरक्षण करणं हा आहे. या प्रकारात आक्रमकतेला अजिबात स्थान नसतं."

"यात कौशल्य प्राप्त करण्यासाठी खूप दिवस लागतात. नियमितपणे सराव केल्यास शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक भावना वाढीस लागते," डॉ. थिंड सांगतात.

राहुल यांनी 2013-14 या वर्षात आयकिडोमध्ये 'ब्लॅक बेल्ट' मिळवला असल्याचं डॉ. थिंड सांगतात.

'राहुल दिखाऊपणा करत नाहीत'

राहुल गांधी यांच्या सरावाविषयी ते सांगतात, "राहुल त्यांच्या सरावाबद्दल जास्त दिखाऊपणा करत नाही. ते येतात, सराव करतात आणि निघून जातात."

दरवर्षी आयकिडोशी संबंधित सेमिनारमध्ये राहुल भाग घेतात.

फोटो स्रोत, TWITTER/BHARAD

फोटो कॅप्शन,

दरवर्षी आयकिडोशी संबंधित सेमिनारमध्ये राहुल भाग घेतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ते मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा मात्र लोकांनी याकडे गांभीर्यानं बघितलं नव्हतं.

सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा

भरद यांनी फोटो शेअर केल्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. असं वाटत आहे की, प्रतिस्पर्ध्याविरोधात राहुल खूपच सामान्य प्रकारची ट्रिक वापरत आहेत, असं सुदीप यादव यांनी लिहिलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/BHARAD

फोटो कॅप्शन,

राहुल यांच्या फोटोंमुळे आयकिडोचा प्रचार झाला, असं भरद यांना वाटतं.

यावर उत्तर देताना भरद यांनी लिहिलं आहे की, "राहुल यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी अगोदर तुम्ही त्यांना नीट जाणून घ्यायला हवं. आयकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवण्यासाठी वर्षानुवर्षं सराव करावा लागतो. यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)