प्रेस रिव्ह्यू : खिचडी होणार 'ग्लोबल ब्रँड'!

food

फोटो स्रोत, INDU PANDEY

फोटो कॅप्शन,

'खिचडी'ची चर्चा

करण्यास सोयीची म्हणूनच भारतभर लोकप्रिय असलेल्या 'दाल खिचडी'चा भारतीय खाद्यपदार्थांतील 'ग्लोबल ब्रँड' म्हणून सक्रियपणे प्रसार करण्याचं सरकारनं ठरवलं आहे.

शुक्रवारपासून दिल्लीत भरणाऱ्या 'वर्ल्ड फूड इंडिया' या जागतिक खाद्यमेळ्यात भारतातर्फे 'खिचडी' हा अधिकृत प्रातिनिधिक पदार्थ म्हणून सादर केला जाणार आहे.

'लोकमत'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या निमित्तानं प्रत्यक्ष खिचडी शिजविण्याचा जागतिक विक्रम करण्याचाही आयोजकांचा मानस आहे.

या खाद्यमेळ्यात शेफ संजीव कपूर सात फूट व्यासाच्या आणि एक हजार लीटर क्षमतेच्या भव्य कढईत ८०० किलोहून अधिक खिचडी शिजवतील. ती खिचडी ६० हजार अनाथ मुलांना व कार्यक्रमाला हजर असलेल्या पाहुण्यांना खायला दिली जाईल, असं अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं.

लोकप्रतिनिधींवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालयं स्थापन करा

गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घालण्यात यायला हवी, असं निवडणूक आयोगानं बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

लोकप्रतिनिधींवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालयं स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

जुलै महिन्यात खंडपीठानं निवडणूक आयोगाला या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर अशा नेत्यांच्या खटल्यांसाठी फास्टट्रॅक कोर्टाच्या धर्तीवर विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात यावी, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

तसंच या न्यायालयांच्या निर्मितीसाठी किती खर्च केला याची माहिती देण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले. 'लोकसत्ता'नं हे वृत्त दिलं आहे.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठानं न्यायालयानं यासंदर्भात तीन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांचं परीक्षण करण्याचं निश्चित केलं होतं.

निवडून आलेल्या खासदार किंवा आमदारांवरील भ्रष्टाचार आणि गंभीर गुन्ह्यांतील केसेस या एका वर्षांत पूर्ण व्हाव्यात. त्याचबरोबर ठराविक वेळेमध्ये या खटल्यांचा डेटाही नष्ट करायला हवा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी भाजप नेते अश्वनीकुमार हे एक याचिकाकर्ते आहेत.

बॉयलरचा स्फोटात 20 जण ठार

उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बुधवारी बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत सुमारे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, अनेकजण गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुंतवणुकीबाबत परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी प्रशासनाला बचाव आणि मदतीसाठी आवश्यक ती पावलं तातडीनं उचलण्यास सांगितलं आहे.

फोटो स्रोत, ANUBHAV SWAROOP

फोटो कॅप्शन,

एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बुधवारी बॉयलरचा स्फोट झाला.

बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ५०० मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला. कामगार आगीत होरपळल्यानं गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान रायबरेलीत मदतकार्यासाठी पोहोचले आहेत.

भायखळा चर्च, ऑपेरा हाऊसचा 'युनेस्को' गौरव

'युनेस्को'तर्फे सांस्कृतिक वारसा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्या यादीत मुंबईतील चार स्थळांचा समावेश आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'नं हे वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार 'युनेस्को'च्या आशिया-पॅसिफिक पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यात भारतातील सात स्थळं असून, त्यातील चार मुंबईतील आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊसचा 'युनेस्को' पुरस्कारानं गौरव

मुंबईतील भायखळा चर्च आणि रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊस या स्थळांना 'गुणवत्ता पुरस्कार' जाहीर झाला आहे. तर बोराबाजार येथील बोमोनजी होरमर्जी वाडिया फाऊंटन अँड क्लॉक टॉवर, तसंच, रिगल चित्रपटगृहासमोरील वेलिंग्टन फाऊंटन या दोन वारसा स्थळांना 'विशेष उल्लेखनीय पुरस्कार' जाहीर झाला आहे.

युनेस्को वारसा पुरस्कारांमध्ये श्री रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंगम, तामिळनाडू), गोहड किल्ला (मध्यप्रदेश), हवेली धर्मपुरा (दिल्ली) यांचाही समावेश आहे.

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा स्थळांचं संवर्धन करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांना संस्कृती संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येतं.

सिलेंडर महागलं

स्वयंपाकाच्या गॅससिलिंडरमध्ये बुधवारी दरवाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलिंडर ९३ रुपयांनी तर अनुदानित सिलेंडर साडेचार रुपयांनी महागल्यांची बातमी 'झी 24 तास'नं दिली आहे.

गॅसची किंमत दर महिन्याला वाढवून त्यावरील अनुदान संपवण्याचा सरकारनं निर्णय घेतल्यानंतर किमतीत करण्यात आलेली ही १९ वी दरवाढ आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिलेंडर महागलं

प्रत्येक कुटुंबाला वर्षांला १४.२ किलो वजनाचे १२ सिलिंडर अनुदानित दरानं मिळू शकतात. त्यानंतर मात्र बाजारभावानं सिलेंडर विकत घ्यावं लागतं.

विनाअनुदानित किंवा बाजारभावानं मिळणाऱ्या घरगुती गॅसच्या सिलिंडरची किंमतही ९३ रुपयांनी वाढवण्यात येऊन ती ७४२ रुपये करण्यात आली आहे.

यापूर्वी १ ऑक्टोबरला झालेल्या दर पुनर्निर्धारणात ही किंमत ५० रुपयांनी वाढवून ६४९ रुपये करण्यात आली होती.

'घोटाळेबाज भाजप'

शिवसेना भवनात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या, 'घोटाळेबाज भाजप' या पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शिवसेनेनं काढली भाजपवर पुस्तिका

भाजपचे नेते आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे 'घोटाळेबाज भाजप' ही पुस्तिका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिली आहे. हे वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)