एनटीपीसी दुर्घटना : मृतांचा आकडा वाढला

NTPC Image copyright ANUBHAV SWAROOP

उत्तर प्रदेशातील रायबरेली मध्ये एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात झालेल्या बॉ़यलरच्या स्फोटात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांची संख्या 100 झाली आहे. त्यांना निरनिराळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या संख्येबाबत खूप गोंधळाची परिस्थिती आहे. काही लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नातेवाईकाचं म्हणणं आहे.

मात्र, अशी कोणतीही तक्रार आपल्यापर्यंत आलेली नसल्याचं एनटीपीसीचे महाव्यवस्थापक राजीव कुमार सिन्हा यांनी बीबीसीला सांगितलं.

दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी हजर असलेल्या हिमांशू या कामगारानं सांगितलं की, बॉ़यलरचा स्फोट झाला तेव्हा किमान तिथं 550 कामगार काम करत होते.

दुर्घटना झाल्याबरोबर प्लांटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला होता. पत्रकारांनाही जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी आल्यावरच प्रवेश देण्यात आला.

हिमांशू यांनी बीबीसीला प्रत्यक्ष घटनेविषयी सांगितलं -

या अपघातात माझ्या मेव्हण्याला गंभीर दुखापत झाली आहे. बॉ़यलरच्या स्फोट झाल्यानंतर अर्धा तास सगळीकडे धूरच धूर होता.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA
प्रतिमा मथळा जखमी कामगारांचे नातेवाईक

त्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. दुपारी 3.20 ला स्फोट झाला. आमचं काम तीन वाजता संपलं. त्यामुळे आम्ही खाली गेलो होतो.

त्यावेळी तिथं 570 लोक काम करत होते.

हे सगळे कंत्राटी कामगार आहेत. जखमींमध्ये एनटीपीसीचे दोन किंवा तीन कर्मचारी आहेत.

अपघात झाल्यावर तासाभरानं रुग्णवाहिका आली.

पोलीस आल्यावर आम्हाला आत जाण्यापासून रोखण्यात आलं. मदतही करू दिली नाही. तिथं एनटीपीसीचा एकही कर्मचारी नव्हता.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA
प्रतिमा मथळा प्रत्यक्षदर्शी सुरेंद्र वर्मा

आणखी एका प्रत्यक्षदर्शी सुरेंद्र वर्मा यांनी एनटीपीसीच्या रूग्णालयातल्या स्थितीची माहिती दिली. सकाळी तिथं एकच रूग्ण होता. तिथंच संध्याकाळी सगळं रूग्णालय जखमींनी भरलं होतं.

ते म्हणाले, आवाज आल्यावर आम्ही तिथं धावलो. बऱ्याच लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. लोक सैरावैरा धावत होते.

आमचे नातेवाईक सापडत नाहीत, ही सगळी एनटीपीसी कर्मचाऱ्यांची चूक असल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्हाधिकारी काय म्हणतात?

घटनास्थळी पोहोचलेल्या एनडीआरएफच्या टीमचं काम संपलं आहे. तिथं त्यांना आणखी मृतदेह सापडला नसल्याची माहिती रायबरेलीचे जिल्हाधिकारी संजय खत्री यांनी दिली.

Image copyright ANUBHAV SWAROOP

बॉयलरचा पाईप फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर गॅस आणि राख बाहेर पडली, त्यानं पेट घेतल्यानं कामगार जखमी झाल्याचं जिल्हाधिकारी संजय खत्री यांनी सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)