सोशल : जगभरात व्हॉट्सअॅप बंद; सोशल मीडियावर युजर्सचा धुमाकूळ

व्हॉट्सअॅप बंद

फोटो स्रोत, STAN HONDA/AFP/Getty Images

नेटिझन्सचे सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप शुक्रवारी तासभर बंद पडलं आणि सोशल मीडियावर यासंदर्भात विनोदांचा अक्षरशः पाऊस पडला.

व्हॉट्सॲप बंद पडल्याने युजर्सना शुक्रवारी दुपारी साधारण तासभर एकही मेसेज पाठवता येत नव्हता. अनेकांनी ट्वीट करत यासंदर्भातली माहिती दिली, त्यामुळे ट्विटरवर '#whatsappdown' हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता.

व्हॉट्सअॅप हे मोबाईल अॅप्लिकेशन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

पण आज दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्याने जगभरातल्या युजर्सना फटका बसला. सोशल मीडियावर '#whatsappdown' हा हॅशटॅग वापरून यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू होती. त्यातलीच निवडक ट्वीट आणि पोस्ट.

"पूर्वी लाईट गेल्यावर आपण शेजाऱ्यांचेही लाईट गेले का पाहायचो, आता आपण व्हॉट्सअॅप डाऊन आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्विटर चेक करतो #WhatsAppDown", असं प्रसिद्ध लेखक चेतन यांनी ट्वीट केलं आहे.

तसंच, "व्हॉट्सअप डाऊनला कारणीभूत व्हॉट्सअॅपमधील इंजिनियर असावा. त्याला त्याच्या गर्लफ्रेण्डने ब्लॉक केलं असावं, अन् मग याने 'मी ब्लॉक, तर सर्वच ब्लॉक' म्हणत पूर्ण व्हॉट्सअपच डाऊन केलं असावं." असंही त्यांनी म्हटलं आहे.

तर सर जेडेजा अर्थात रवींद्र जडेजाने, "अशा लोकांसाठी दोन मिनिटं शांतता बाळगा, ज्यांनी व्हॉट्सअप डाऊननंतर व्हॉट्सअॅप अन-इन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केलं." असं ट्वीट केलं आहे.

गायत्री गंभीर यांनी व्हॉट्सअॅप बंद झाल्यावर लोक सर्वांत आधी काय करतात, हे तपशीलवार सांगितलं आहे.

फेसबुकवर मुग्धा देशमुख म्हणतात, ट्विटरचे आभार! मी उगाचच माझ्या इंटरनेट सर्व्हिसवर राग काढत होते.

फोटो स्रोत, Facebook

तर शिवांगी ठाकूर म्हणते की, चला एक ब्रेक घेऊ या. व्हॉट्सअॅप डाऊन आहे. मी इतकी व्हॉट्सअॅपवर अवलंबून आहे, याची मला जाणीव नव्हती.

फोटो स्रोत, facebook

तसंच अनेकांनी काही विनोदी मीम्ससुद्धा शेअर केली आहेत.

दरम्यान, ही व्हॉट्सअॅपची सेवा फक्त भारतातच नाही तर जगभरात विस्कळित झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)