शेअर बाजारात तेजी : पैसे कमावण्याची हीच योग्य वेळ?

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
सेन्सेक्स, तेजी

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN

फोटो कॅप्शन,

सेन्सेक्समधली तेजी कशामुळे?

दिवाळीनंतर भारतीय शेअर बाजार सातत्याने वर चढताना दिसत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे निर्देशांक अक्षरश: चौखूर उधळत आहेत. पण हा वाढता आलेख उत्साहाची चिन्हं घेऊन आला आहे की सावधतेनं गुंतवणूक करण्याची? आणि सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं?

शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 10,452 तर बाँबे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स निर्देशांक 33, 685 या विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाले. 1 नोव्हेंबर या एकाच दिवसात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना 1,08,000 कोटी रुपयांनी श्रीमंत केलं.

पण सध्या शेअर बाजारातून असा घसघशीत परतावा मिळत असला तरी देशातील केवळ 2-3 कोटी लोकच शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत.

त्यामुळे बाजारात असं सकारात्मक वातावरण असताना सामान्य गुंतवणूकदारांनी त्याचा कसा फायदा उचलावा? चला बघूया.

'तेजीची पायाभरणी'

सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारात भीती वाटत असते ती त्यातल्या जोखमीची. परतावा निश्चित नसतो, त्यामुळे गुंतवलेले पैसे कमी होतील ही भीती असते. पण अर्थतज्ज्ञ अभिजीत फडणीस यांच्यामते महागाईचा वाढता दर लक्षात घेता शेअर बाजारातल्या गुंतवणुकीला पर्याय उरणार नाही.

ते सांगतात, "अर्थव्यवस्था वाढते तसे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढतात. आणि हे परिमाण मानलं तर 2013 सालापासून (तेव्हा निफ्टी 5600वर होता) 2017 पर्यंत निफ्टीने 10400चा टप्पा ओलांडला आहे. म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना दरवर्षाला चक्रवाढ व्याजाने किमान 15 टक्क्यांचा परतावा दिला आहे."

"बँकेतल्या मुदतठेवींवरचे व्याजदर कमी झाले आहेत. सोन्याचे दर गेली तीन वर्षं स्थिर आहेत. घरांच्या, जमिनींच्या किंमती वाढण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी शेअर बाजारात अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक आणि त्यातून मिळालेला 15 टक्के परतावा, हा आश्वासक असाच आहे."

शिवाय, शेअर बाजाराच्या पुढच्या वाटाचालीबद्दलही ते सकारात्मक आहेत. "नोटाबंदी होऊन एक वर्षं झालं आहे. वस्तू आणि सेवा करासाठीच्या (GST) नोंदणी दरम्यान 50,000 नवीन कंपन्यांनी नोंदणी केली आहे. अशावेळी सरकारी उत्पन्न वाढून त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे. आणि म्हणून ही तेजीची फक्त सुरुवात म्हणजे पायाभरणी आहे," डॉ. फडणीस यांना वाटतं.

पण गुंतवणूक करताना काही पथ्य पाळण्याचा सल्ला डॉ. फडणीस देतात.

पहिला सल्ला, गुंतवणुकीचे निर्णय घाईने न घेता निफ्टीचा स्तर थोडा खाली जाण्याची वाट बघावी.

आणि दुसरं म्हणजे, निर्देशांक चढे राहण्याचा अंदाज असल्यामुळे इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा त्यांचा सल्ला आहे.

'GSTचा परिणामसकारात्मक'

मागच्या वर्षभरात देशाने दोन मोठ्या आर्थिक घडामोडी पाहिल्या - नोटाबंदी आणि त्यानंतर GST अंमलबजावणी. हे दोन्ही निर्णय दूरगामी परिणाम करणारे आहेत, यात शंकाच नाही. पण शेअर बाजाराची यावर प्रतिक्रिया काय आहे?

नोटाबंदीचे जे परिणाम होते ते वर्षभरात शेअर बाजाराने अनुभवले आहेत. GSTचा परिणाम बाजारावर आता जाणवत आहे.

फोटो कॅप्शन,

सामान्य गुंतवणूकदारांसाठी संधी

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळकांच्या मते GSTची वाटचाल आश्वासक आहे. अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या काळात अस्वस्थता अपेक्षित होती. पण अंमलबजावणी अपेक्षेपेक्षा सुरळीत झाल्याचं टिळक सांगतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार, असा त्यांचा होरा आहे.

सरकारच्या बँक क्षेत्रातल्या सुधारणा, जगातील इतर देशांच्या तुलनेत सुस्थितीत असलेली अर्थव्यवस्था, चांगला झालेला मान्सून, यांमुळे आर्थिक घडी सुखावह असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. "आर्थिक सुस्थिती, गुंतवणुकीसाठी पैशांची उपलब्धता आणि गुंतवणुकीची सुरक्षितता, या निकषांवर भारतात गुंतवणुकीची चांगली संधी आहे," असं टिळक यांनी सांगितलं.

त्याचवेळी सामान्य गुंतवणूकदारांसाठी त्यांनी सबुरीचा सल्लाही दिला आहे.

गुंतवणूक कुठे, किती आणि कशी करायची, हे महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते सांगतात. कारण बाजार तेजीत आहे याचा अर्थ सगळेच शेअर चालत आहेत, असं नक्कीच नाही.

त्यामुळे शेअरची निवड, गुंतवणुकीची मुदत, याचा अभ्यास गरजेचा आहे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला महत्त्वाचा असेल.

शिवाय नोव्हेंबर महिना असल्यामुळे जे नियमित गुंतवणूकदार आहेत त्यांनी आधीच्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याची योग्य वेळ असल्याचं ते सांगतात.

कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत. त्यानुसार पोर्टफोलिओची फेररचना करण्याची, म्युच्युअल फंडाचा फेरआढावा घेण्याची ही योग्य वेळ आहे. वर्षभरातील कर बचतीचं उद्दिष्ट ठरवलं असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

पण ही गुंतवणूक करताना सकारात्मक राहूनही अभ्यासपूर्ण गुंतवणुकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.

'परकीय संस्थांचा विश्वास, मग आपला का नाही?'

एकट्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा विचार केला तर निफ्टीची स्थापना झाली 1996मध्ये 1000 या पायापासून झाली. आणि पुढच्या 21 वर्षात निर्देशांकाने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. वित्तीय संस्थांकडून निघणारे वेल्थ रिपोर्ट असं सांगतात की निफ्टीतली गुंतवणूक दर सहा वर्षांनी दुप्पट होते.

अमेरिका, इंग्लंड, इतर युरोपीय देश, जपान यांनी मागच्या काही वर्षांत सातत्याने भारतीय बाजारात गुंतवणूक केली आहे. 2017 साली आतापर्यंत देशात 56,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन,

बाँबे स्टॉक एक्सचेंज

शेअर बाजार विश्लेषक आशुतोष वखरे यांनी नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवलं आहे.

"आपली अर्थव्यवस्था चोख आहे. भारत ही जगातील एक वाढणारी अर्थव्यवस्था आहे, यावर जागतिक स्तरावर विश्वास असताना भारतीय लोक तिच्यावर विश्वास का दाखवू शकत नाहीत?" असा प्रश्नच वखरे यांनी केला आहे.

"वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. नोटाबंदी आणि GSTचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. शिवाय व्यवसायासाठी पोषक वातावरण असल्याचा संदेश नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे गेला आहे," ते सांगतात.

"सरकारी बँकांना केंद्र सरकारने 12,000 कोटींची मदत देऊ केली आहे. हे निर्णय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून आपण लांब राहू शकत नाही," असं वखरे यांचं म्हणणं आहे.

आणि म्हणून थेट गुंतवणुकीची भीती वाटत असेल तर निदान म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पैसे वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

'शेअर बाजारातील सुरक्षा वाढली'

अगदी सुरुवातीपासून शेअर बाजार असुरक्षित, असं आपण ऐकत आलो आहोत. जोखीम आणि त्यातही यापूर्वी इथं झालेले घोटाळे, यामुळे आपल्या मनात भीती तयार झालेली असते. पण गुंतवणूक तज्ज्ञ जयंत विद्वांस यांनी सध्याच्या परिस्थितीत नेमका हाच विचार खोडून काढला आहे.

"अलिकडे शेअर व्यवहार ऑनलाईन होतात. डिमॅट अकाऊंट हे सुरक्षित आहे. त्यामुळे गैरव्यवहारांचा निम्मा धोका कमी झाला आहे," विद्वांस सांगतात.

आणखी एक सुरक्षेचा मुद्दा आहे तो सुरक्षित गुंतवणुकीचा. तिथेही बरीच प्रगती आहे. घटत्या व्याजदरांमुळे अगदी ज्येष्ठ नागरिकही निवृत्तीवेतनासाठी म्युच्युअल फंडावर अवलंबून आहेत, असं त्यांचा अनुभव सांगतो. त्यामुळे जास्त परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीने भविष्याची तरतूद म्हणूनही शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आहे.

गुंतवणुकीच्या बदलत्या सवयी पाहिल्या तर हीच गोष्ट अधोरेखित होते.

अँफी वेबसाईटच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील स्थानिक गुंतवणूकदार SIPच्या माध्यमातून दर महिन्याला 4,500 कोटी रुपये म्युच्युअल फंडात गुंतवत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सुरक्षित पर्याय आहे, असं विद्वांस यांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांनी सल्ला दिला आहे तो जोखीम स्वीकारण्याची तयारी लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा.

फोटो कॅप्शन,

शेअरमधील गुंतवणूक किती सुरक्षित?

थेट शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर 3-4 वर्षांचं उद्दिष्ट ठेवावं, त्यानंतर गुंतवणुकीचा पुन्हा आढावा घ्यावा असं ते सांगतात. आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कमी धोक्याचे 'बॅलन्स्ड फंड' त्यांनी सुचवले आहेत.

शिवाय 'बॅलन्स्ड अँडव्हांटेज फंड' हा बाजारात नवीन आलेला फंड त्यांच्यामते गुंतवणुकीसाठी योग्य आहे.

'ट्रेडर्सना रोजच संधी'

शेअर बाजारात येताना एक मंत्र पाळावा लागतो. इथं येऊन शिकू नका. शिकून इथं या. म्हणजे प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय पारखून आणि अभ्यासपूर्वक घ्या.

एक अभ्यास म्हणजे, शेअरच्या मूलभूत घटकांचा म्हणजे कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती, आगामी योजना वगैरे. आणि दुसरा अभ्यास म्हणजे, टेक्निकल किंवा तांत्रिक.

पेशाने सीए असलेले आणि शेअर बाजाराचा विशेष अभ्यास असलेले निखिलेश सोमण यांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूकीवर भर दिला आहे. सध्या बाजारात आलेली तेजी तांत्रिक दृष्ट्या शाश्वत आहे, असं त्यांना वाटतं.

"तांत्रिकदृष्ट्या मोठ्या कंपन्यांचे समाधानकारक तिमाही निकाल, बाजारात असलेली रोखता, त्यामुळे पैशाची उपलब्धता, GSTची सुलभ अंमलबजावणी आणि नोटाबंदीचं भूत उतरल्यामुळे येत्या काळात बाजार आणखी वर जाऊ शकेल," असं सोमण यांचं म्हणणं आहे.

निफ्टीचा विचार केला तर नजीकच्या काळात निर्देशांक 10,500चा टप्पा गाठू शकतो, यासाठी खालची पातळी त्यांनी 10,200 पर्यंतची धरली आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांनी न घाबरता बाजारात यावं. आणि तेजीनंतरही अजून खाली असलेल्या निवडक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. दीर्घ मुदतीत शेअर बाजार चांगला परतावा देऊ शकेल, असं त्यांना वाटतं.

फोटो कॅप्शन,

सुरक्षित, दीर्घ मुदतीची गुंतवणूक

देशाची अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडी, सरकारी धोरणं, वित्तीय संस्था आणि देशांतर्गत आकडेवारी, सामाजिक, औद्योगिक परिस्थिती याचे परिणाम वेळोवेळी शेअर बाजारावर होत असतात.

त्याचबरोबर एक महत्त्वाचा घटक आहे तो जागतिक राजकारणाचा. अमेरिका विरुद्ध उत्तर कोरिया यांच्यातील जुगलबंदी, युरोपीय महासंघातील बदल, अमेरिकन फेडरल बँकेचं व्याजदर धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर, अशा गोष्टीही बाजारावर तात्काळ परिणाम घडवून आणतात.

पण, सध्याच्या परिस्थितीत अशा गोष्टींचा दीर्घकाळ परिणाम जाणवणार नाही, असं तज्ज्ञांना वाटत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)