गच्चीवरच्या विमानाची झेप यशस्वी: कॅप्टन यादवांसोबत सरकारचा 35,000 कोटींचा करार

  • सौतिक बिस्वास
  • बीबीसी न्यूज, मुंबई
फोटो कॅप्शन,

गेल्यावर्षी मार्चमध्ये हैदराबादमध्ये झालेल्या एअर शोमध्ये अमोल यादव यांचं विमान ठेवण्यात आलं होतं.

आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर विमान बांधणारे मुंबईचे अमोल यादव यांच्या प्रयत्नांना अखेर सरकारकडूनही दाद मिळाली आहे. सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्र सरकारने अखेर त्यांच्यासोबत करार केला आहे, ज्यानुसार पालघरमध्ये लवकरच विमान बांधणीचा कारखाना उभारण्यात येणार आहे.

भारतीय बनावटीचं विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट प्रा. ली. या कंपनीबरोबर राज्य सरकारनं मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेमध्ये देशांतर्गत विमान निर्मितीबाबतचा सामंजस्य करार केला.

प्रसार माध्यमांतील वृत्तांनुसार, यादव आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. या करारानुसार पालघर इथं 19 आसनी विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी राज्य सरकार यादव यांना लवकरच जमीन उपलब्ध करून देणार आहे.

फेब्रुवारी 2016 मध्ये याच वांद्रे-कुर्ला संकुलावर भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात कॅप्टन अमोल यादव यांनी आपले सहा आसनी विमान प्रदर्शित केलं होतं.

पण बिल्डिंगच्या गच्चीवर कसं बांधलं विमान?

सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अमोल यादव यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या गच्चीवर विमान बांधण्याचा इरादा घरच्यांना, मित्रमंडळींना सांगितला.

"पण ते विमान बांधल्यावर खाली कसं आणणार?" घरच्यांनी प्रश्न विचारला.

"माहिती नाही," असं उत्तर अमोल यांनी दिलं होतं. पण जिद्दी स्वभावाचे असल्याने त्यांचा निश्चय पक्का होता.

अमोल यादव दोन इंजिनवाल्या टर्बोप्रॉप विमानाचे वैमानिक आहेत. त्यावर त्यांचा चरितार्थ चालतो.

पाच मजली बिल्डिंगमध्ये 19 जणांचं यादव कुटुंब एकत्र राहातं. या बिल्डिंगला लिफ्ट नाही. त्यामुळे लेथ मशीन, कॉम्प्रेसर, वेल्डिंग मशीन आणि 180 किलो वजनाचं आयात केलेलं इंजिन, हे सगळं चिंचोळ्या जिन्यानं गच्चीवर नेण्यात आलं.

आणि मग कडाक्याच्या उन्हात, तर कधी मुसळधार पावसात यादव आणि गॅरेजमधल्या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी - एक मेकॅनिक, एक फॅब्रिकेटर, एकत्र येऊन 1200 चौ. फूट जागेत ताडपत्रीच्या शेडखाली राबून एक विमान तयार केलं.

फोटो कॅप्शन,

बिल्डिंगच्या गच्चीवर विमानाचे काम सुरू असताना

फेब्रुवारी-2016 मध्ये अखेर सहा आसनी प्रॉपेलर विमान तयार झालं. अमोल यादव यांच्या मते, अशाप्रकारे घरात बनवण्यात आलेलं हे पहिलं भारतीय विमान आहे.

या विमानाच्या इंजिनाची 13,000 फुटांपर्यंत विमान घेऊन जाण्याची क्षमता आहे. एकाचवेळी 2000 किमींचं अंतर कापण्याइतकं इंधन यात राहू शकतं, तर ताशी 342 किमीचा प्रवास या विमानानं करता येईल.

आता हे विमान तयार झाल्यावर ते खाली उतरवणं, हेच मोठं आव्हान होतं.

...आणि विमान खाली आलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेसाठी मुंबईत प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात हे विमान यादव यांना प्रदर्शनात ठेवायचं होतं खरं, पण त्यासाठी बरीच धडपड करावी लागली.

सुरुवातीला आयोजकांनी विमान ठेवण्यासाठी जागा नसल्याचं कारण देत त्यांना परवानगी नाकारली.

यादवांच्या भावांनी मैदानाच्या आसपास जागा शोधू्न काढली. सुरक्षारक्षकांना विनंती केली, या प्रकल्पाचं महत्त्व समजावून सांगितलं.

फोटो कॅप्शन,

क्रेनच्या मदतीनं विमान खाली आणलं.

"आम्ही विमानाचे भाग वेगवेगळे करून ते खाली उतरवण्याचं ठरवलं. रातोरात ते करायचं होतं," यादव म्हणाले. सगळं कुटुंब मग त्याच कामाला लागलं.

इंजिन, पंख, शेपटी आणि इंधन टाकी वेगळं करण्यात आलं. एका क्रेनच्या मदतीनं विमान खाली घेण्यास सुरुवात झाली. अन् त्यात मध्येच क्रेन बंद झाली.

"मला तर जवळजवळ हार्टअटॅकच आला होता. 'आता क्रेन पडणार आणि इंधनाची टाकी रस्त्यावर पडून फुटणार...!' पण तोवर क्रेन पुन्हा सुरू झाली. मग सगळं सुरळीत झालं," यादव म्हणाले.

मध्यरात्रीच ट्रकमध्ये सगळे भाग नीट ठेवून घरापासून 25 किमींवर असलेल्या प्रदर्शनाच्या मैदानात आणण्यात आले.

सुरक्षारक्षकांनी त्यांना आत येऊ दिलं, तीन तासांत विमान बांधण्यात आलं.

फोटो कॅप्शन,

विमान चाचणीसाठी नेताना...

विमानाची लोकांमध्ये चर्चा

प्रदर्शन सुरू झाल्याबरोबर उत्साही नजरा या विमानाकडे वळल्या आणि मग विमानच प्रदर्शनात चर्चेचा मुद्दा ठरला. स्थानिक वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांनी त्याला प्रसिद्धी दिली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री, वरीष्ठ अधिकारी, उद्योजक सगळ्यांनीच या विमानाला भेट दिली.

नंतरचे 15 महिने ते विमान एका मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आलं. काही एअर शोमध्येही पाठवण्यात आलं.

फोटो कॅप्शन,

मुंबई विमानतळावर या विमानाला जागा मिळाली.

त्यानंतर मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका कंटेनर ट्रकमध्ये ठेवण्यात आलं. आणि मे 2017मध्ये विमानतळावर एका खाजगी एअरबसच्या शेजारी त्याला उभं करण्यास जागा मिळाली.

विमानाचं भविष्य

अशाप्रकारच्या विमानाचं व्यावसायिक उत्पादन करण्यास आपण तयार असल्याचं यादव यांचं म्हणणं आहे. गुंतवणूकदारांनी त्यात रसही दाखवला आहे.

महाराष्ट्र सरकारने यादव यांना 157 एकर जागा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तिथं 19 आसनी विमान बनवण्याचा कारखाना यादव उभा करणार आहेत.

भारतात 450 व्यावसायिक विमानं आहेत. हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार होत आहे. सरकारचं सहकार्य, गुंतवणूकदारांचा पाठिंबा यांच्या मदतीनं छोटी विमानं तयार करता येतील. त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढेल, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील, असा यादव यांचा दावा आहे.

यात केवळ एकच अडचण आहे.

फोटो कॅप्शन,

गच्चीत 19 आसनी विमानाचं काम सुरू झालं आहे.

गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्र सरकार, स्थानिक खासदार, पंतप्रधान कार्यालय यांनी पाठपुरावा करूनही हवाई वाहतूक नियामक प्राधिकरणानं गच्चीवर बांधण्यात आलेल्या या विमानाची नोंदणी केलेली नाही.

"ते सतत नियम बदलत राहतात. त्यामुळे मी कंटाळलो आहे," असं यादव सांगतात. तर प्राधिकरण म्हणतं की, हवाई वाहतूक यंत्रणेनं अशा प्रकारच्या विमानांसाठी नियमावली तयार केलेली नाही.

'चुकाही झाल्यात'

1998मध्ये यादव यांनी लष्कराकडून दहा हजार रुपयांना सहा सिलेंडरचं पेट्रोल इंजिन विकत घेतलं होतं. त्यापासून पहिलं विमान बनवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता.

त्यानंतर 1990मध्ये दुसरं आठ सिलेंडरचं पेट्रोल इंजिन आणि विमानविषयक 50 जुनी पुस्तकं खरेदी केली. ती वाचून मग विमानाचं काम सुरू केलं.

चार वर्षांनी एक सहा आसनी विमान तयार केलं आणि त्याची चाचणीही घेतली.

2004मध्ये यादव यांनी दिल्लीत काही बड्या मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्याला चाचणी घेण्यास सांगितलं. त्या अधिकाऱ्यानं, "हे विमान उडू शकणार नाही, उडालंच तर कोसळेल," अशी टिपण्णी केली.

तिथं सगळंच संपलं. विमान पडून राहिलं आणि चोरांनी त्याचा काही भाग लंपासही केला.

पाच वर्षांनी त्यांनी पु्न्हा विमान बांधण्यास सुरुवात केली. यंदा हे काम 19 आसनी विमान तयार करण्याचं होतं.

त्यांनी यावर आतापर्यंत सुमारे पाच कोटी रूपये खर्च झाले आहेत. त्यासाठी मालमत्तेपासून दागिन्यापर्यंत सगळं विकून झालं आहे.

"भारतात सर्वसामान्यांनी केलेल्या संशोधनाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. मला हे विमान उडवण्याची परवानगी मिळाली तर मी भारताचा हवाई इतिहास घडवीन," यादव आत्मविश्वासानं सांगतात.

(ही बातमी प्रथम 7 नोव्हेंबर 2017ला प्रसिद्ध करण्यात आली होती.फोटो अनुश्री फडणवीस यांनी काढले असून यादव कुटुंबीयांनी दिले आहेत.)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)