प्रेस रिव्ह्यू : हेमलकसामधील प्राण्यांविषयी केंद्र सरकारची प्रकाश आमटेंना नोटीस

डॉ. प्रकाश आमटे यांना केंद्र सरकारकडून नोटीस मिळाली आहे. Image copyright ROMEO GACAD/GettyImages
प्रतिमा मथळा डॉ. प्रकाश आमटे यांना केंद्र सरकारकडून नोटीस मिळाली आहे.

हेमलकसातील वन्य प्राण्यांविषयी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना केंद्राकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

डॉ. आमटे यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामधील प्रकल्पाला सरकारने वन्यप्राणी अनाथालय म्हणून मान्यता दिली होती. पण गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी पाळल्याचे फोटो, व्हीडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर केंद्राने त्यांना नोटीस पाठवली आहे.

'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की वन्यप्राणी पाळून त्याचं असं चित्रीकरण करणं हे नियमबाह्य आहे.

गेल्या दोन दिवसांपासून याबाबत आमटे दाम्पत्याने दिल्लीत विविध मंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही मध्यस्थी करून केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली.

फेरीवाल्यांची प्रश्नावरून नाना पाटेकर-राज ठाकरे आमने सामने

मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून अभिनेता नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आमने-सामने आल्याचं दिसलं.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/ GETTY IMAGES
प्रतिमा मथळा मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सध्या मनसेचे आंदोलन सुरू आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात नाना पाटेकर म्हणाले, "मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी, दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही."

त्याला प्रत्त्युत्तर देत राज ठाकरे म्हणाले, "फेरीवाल्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करू नये, ज्या विषयाची त्यांना माहिती आहे त्याबद्दलच त्यांनी बोलावे."

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज म्हणाले की, "महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं आहे. नानाला वाटतं तो चंद्रावरून पडलाय. जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाहीत."

महाराष्ट्रातील शिक्षक रस्त्यावर

अशैक्षणिक कामांचा व्याप वाढत असल्यानं राज्यभरातील शिक्षकांनी शनिवारी विविध ठिकाणी सरकारी कार्यालयांवर मोर्चे काढले.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा, कोल्हापूर या जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झाले होते.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/ GETTY IMAGES
प्रतिमा मथळा शाळाबाह्य कामांना शिक्षकांचा विरोध होत आहे.

मतदार नोंदणी करणं, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून देणं, शाळेत विविध दिवस साजरे करून त्याचे अहवाल पाठविणं, इथपासून ते आता थेट शौचालयांची पाहणी करण्यापर्यंतच्या अशैक्षणिक कामांचा व्याप वाढत असल्याची शिक्षकांची तक्रार आहे.

शनिवारी हे शिक्षक अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर उतरल्यानं यंत्रणेची धावपळ उडाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.

सोशल मीडियावरून आंदोलनाची माहिती वाऱ्यासारखी पसरू लागताच अनेक जिल्ह्यातील शिक्षक उत्स्फूर्तपणे मोर्चांमध्ये सहभागी झाले. राज्य सरकारच्या निषेधात जोरदार घोषणा देत 'आम्हाला फक्त शिकवू द्या,' असा नारा या शिक्षकांनी दिला.

जेटलींचा काँग्रेसवर आरोप

केंद्रीय अर्थमंत्री आणि गुजरात निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अरुण जेटली यांनी शनिवारी काँग्रेसवर गंभीर आरोप लावले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अहमदाबाद इथं माध्यमांशी बोलताना जेटली म्हणाले की, "एका व्यक्तीला हरवण्यासाठी काँग्रेसने निवडणुकांमध्ये सलगपणे लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांचा वापर केला होता."

"हे स्पष्ट आहे की एका व्यक्तीविरोधात तीन राज्य निवडणुकांमध्ये काँग्रेसनं सीबीआय, सरकारी यंत्रणा, लष्कर-ए-तोयबा आणि दहशतवादी संघटनांचा वापर केला. आणि आता ते विकासावर हसतात. त्याच्यावर उपहासात्मक टीका करतात. हे विचित्र आहे."

ती एक व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असं द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)