साताऱ्यात 2 लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवी संस्कृतीचा शोध

  • मोहसीन मुल्ला
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
साताऱ्यातील अश्मयुगीन मानवी संस्कृती

फोटो स्रोत, Jayendra Joglekar

फोटो कॅप्शन,

अतीत इथं नदी किनारी अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं सापडली.

सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मध्ययुगीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास यात सातारा जिल्ह्याला नेहमीच मोठे स्थान लाभलं आहे. याच साताऱ्यात किमान २-३ लाख वर्षांपूर्वीच्या आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडल्या आहेत.

कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंतचा समज होता. पण या संशोधनानं कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व होतं हे सिद्ध झालं आहे.

साताऱ्यातील उरमोडी नदीच्या पात्रालगत आणि इतर काही भागांत आद्य-पुराश्मयुगीन मानवी संस्कृतीचा शोध लागला आहे.

पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅंड रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक यावर काम करत आहेत.

कृष्णा नदीच्या खोऱ्यातील प्लेइस्टोसिन काळातील मानवी संस्कृती शोध घेण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. या प्रयत्नातील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

संस्थेतील विद्यार्थी जयेंद्र जोगळेकर २०१४ पासून या विषयावर काम करत आहेत. डॉ. सुषमा देव, प्रा. एस. एन. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. उरमोडी नदीनजीक शहापूर, वेचळे, वळसे, माजगाव, अतीत, निसराळे आणि कृष्णा नदीजवळ मेणवली इथं या संस्कृतीचं अस्तित्व आढळलं आहे.

फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

फोटो कॅप्शन,

सापडलेल्या शस्त्रांत फरश्यांचा समावेश मोठ्याप्रमाणावर आहे.

संस्थेतील प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्रमुख प्रा. सुषमा देव यांनी हे संशोधन महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.

त्या म्हणाल्या, "कृष्णेच्या खोऱ्यातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वावर अनेक वर्षं संशोधन सुरू आहे. पण कृष्णेच्या उगमानजीक अश्मयुगीन मानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंत समज होता. तसंच, बेसाल्टचा दगड अश्मयुगीन काळात हत्यारं बनवण्यासाठी योग्य नाही, असा ही समज होता. हे दोन्ही समज या संशोधनानं खोडून काढले आहेत."

कृष्णा खोरे आणि पाषाणयुग

जयेंद्र जोगळेकर म्हणाले, १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट यांना पल्लावराम (तत्कालीन मद्रासजवळ) इथं काही दगडी हत्यारं सापडली, ज्यात 'हातकुऱ्हाड'चा समावेश होता. त्यानंतर भारताच्या इतर भागांमध्ये संशोधन सुरू झालं.

फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

फोटो कॅप्शन,

डावीकडून डॉ. एस. एन. राजगुरू, प्रा. सुषमा देव आणि जयेंद्र जोगळेकर या प्रकल्पावर काम करत आहेत.

परंतु डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) दगड असलेल्या भागांमध्ये अश्मयुगीन हत्यारं मिळत नव्हती. घनदाट जंगल आणि डोंगराळभागामुळे या अडचणी येत असाव्यात. त्यामुळे असा समज निर्माण झाला होता की अश्मयुगीन मानव या भागामध्ये वास्तव्यास नव्हता.

योगायोगानं १९५२ मध्ये गंगावाडी येथे (गंगापूर जवळ) मातीच्या धरणाच्या बांधकामासाठी खोल खड्डे घेतले जात असताना त्यामध्ये काही मानव निर्मित अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली.

प्रोफेसर ह. धि. संकलिया यांनी त्या हत्यारांचा अभ्यास केला. त्यानंतर डेक्कन ट्रॅप भागामध्ये संशोधन केलं असता कऱ्हा, घोड, भीमा यासारख्या नदी आणि परिसरांमध्ये सुद्धा अनेक साईट्स सापडल्या.

पुढे डॉ. आर. एस. पप्पू यांनी कर्नाटकातील अनगवाडी आणि परिसरात मोठ्याप्रमाणावर पाषाणयुगातील साईट्स शोधल्या होत्या.

फोटो स्रोत, nevio3/Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रतिनिधीक चित्र

तर १९८६ला काळे व त्यांच्या सहकाऱ्यांना कर्नाटकातील येडूरवाडी येथे विविध विलुप्त प्राण्यांच्या प्रजातींचे जीवाश्म आणि कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण असलेले झाडांचे बुंधे आणि १०० च्या आसपास पाषाण युगातील हत्यारे सापडली होती.

या साईटचे कालमापन केले तेव्हा ते ३.५ लाख वर्षांहून अधिक जुने आहे, असे लक्षात आले.

२००८ मध्ये डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅंड रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक चारुता कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णा खोऱ्यातील (वाई परिसरातील) या मानवी संस्कृती आणि पर्यावरण या वर रिसर्च पेपर लिहिला होता.

नव्या संशोधनाचं महत्त्व

जयेंद्र जोगळेकर म्हणाले, या गावांतून मोठ्याप्रमाणावर दगडी हत्यारं शोधता आली आहेत. ही संख्या ३०० पेक्षा जास्त आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) भागातील कृष्णा खोऱ्यातून या पाषाणयुगातील दगडी हत्यारं मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

फोटो कॅप्शन,

या संशोधनात मोठ्या प्रमाणावर दगडी हत्यारं शोधता आली आहेत.

छिलका हत्यारांचा समावेश असलेल्या या परंपरेला अॅश्युलियन संबोधले जाते. अॅश्युलियन संस्कृतीमध्ये (लार्ज फ्लेक अॅश्युलियन) १० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या छिलक्यांपासून हत्यारं तयार करत असत.

बेसाल्ट दगड लवकर झिजतो, त्यामुळे कृष्णा खोऱ्यात या युगातील हत्यारं जास्त प्रमाणात मिळणं कठीण असतं. पण यावेळी ही मिळाली असल्याचं, ते म्हणाले.

नदीचा प्रवाह हा सध्या आहे तेथूनच लाखो वर्षे वाहत असल्याचंही या या अभ्यासातून दिसते.

या संशोधनाचं महत्त्व

मोठ्या छिलक्यांपासून बनवलेल्या या हत्यारांमध्ये फरश्या (Cleavers) व तासण्या (Scrapers) यांची संख्या जास्त आहे. त्यातही फरश्याचं प्रमाणात जास्त आहे.

फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

त्याकाळात पाऊस जास्त होत असावा, त्यामुळे वनस्पतींची वाढ ही मोठी होत असणार. त्या वनस्पती तोडण्यासाठी, त्यांची साल काढण्यासाठी फरश्यांचा वापर करावा लागत असणार.

याशिवाय, छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशा हत्यारांचा वापर होत असावा.

जयेंद्र जोगळेकर म्हणाले, 'त्याकाळात मोठी शिकार होत नसावी. इतर हिंस्र प्राण्यांनी केलेल्या मोठ्या शिकारींचा शिल्लक राहिलेला भाग मानवाला अन्न म्हणून उपयोगी पडत असे. त्यातही ही हत्यारं उपयुक्त ठरत असावीत.'

लोकसंख्या जास्त

या भागातून मिळालेल्या पाषाणांच्या या हत्यारांची चांगली संख्या लक्षात घेतली, तर या परिसरात त्या युगात मानवाची जास्त लोकसंख्या होती, असा निष्कर्ष काढता येतो, असंही जोगळेकर यांनी स्पष्ट केलं.

या संशोधनाचे रीसर्च पेपर Indian Society for Prehistoric and Quaternary Studies च्या Man and Environment आणि Heritage: Journal of Multidisciplinary Studies in Archaeology या नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)