ढिंच्यॅक पूजा, ढिंच्यॅक राजकारणी आणि ढिंच्यॅक पत्रकार

  • राजेश जोशी
  • रेडिओ एडिटर, बीबीसी हिंदी
ढिनचॅक पूजा

काल रात्रीपासूनच मी समाधी अवस्थेत आहे. सायबर विश्वात भटकता-भटकता मी ढिंच्यॅक पूजापर्यंत कसा काय पोहोचलो काही कळलं नाही. तिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मात्र तिची एक नाही, तीन गाणी (गाणी?) ऐकत बसलो.

'सेल्फी मैंने ले ली आज', 'दारू, दारू, दारू', आणि 'दिलों का शूटर, है मेरा स्कूटर' ही ती तीन 'गाणी'.

'जर तुम्ही ढिंच्यॅक पूजा यांना किंवा त्यांच्या 'कलाकृतींना' ओळखत नसाल, तर तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही 21 व्या शतकात राहात नसून गुहांमध्ये राहात आहात', असं कुणीतरी लिहिलं आहे.

आता हे काही क्षण विसरून जा की, ढिंच्यॅक पूजा ही दिल्लीची एक अशी युवती आहे जी सूर-ताल-लय आणि काव्य, छंद यातलं काहीतरी चघळून यूट्यूबवर जिथे तिथे थुंकते आहे आणि ज्यावर मग लाखो लोकांच्या उड्या पडत आहेत.

या लाखोंनी तिची वाहवा केली, अगदी काहींनी तिला शिव्याही दिल्या तरी त्यातून ढिंच्यॅक पूजाचं बॅंक अकाउंट गब्बर होतंय.

दिल्लीच्या या ढिंच्यॅक पूजाची तरीही प्रशंसा करायला हवी. कारण तिनं आपल्या 'रिव्हर्स टॅलेंट'चा वापर करून अनेक प्रतिभावंतांच्या गोतावळ्यातही स्वतःला सिद्ध केलं आहे.

पण, इथे होत असलेली चर्चा ही त्या एका ढिंच्यॅक पूजा या व्यक्तीची नव्हे तर त्या प्रवृत्तीची आहे.

ढिंच्यॅक पूजा : एक प्रवृत्ती

ही ढिंच्यॅक पूजा त्या सर्वांना वेडावून दाखवते आहे, जे अनेक वर्षांपासून आपल्या गुरुजनांकडून संगीताचा एक-एक सूर घोटून साधना करण्याचा प्रयत्न करत होते.

ही ढिंच्यॅक पूजा म्हणजे बडे गुलाम अली साहेबांची 'अँटी-थीसिस'च जणू. ही सोशल-डिजिटलच्या काळाची उपज आहे. आपल्या या काळाच्या कसोटीचं खरंखुरं प्रतिबिंब.

हिट्स, लाइक्स आणि शेअरच्या या जमान्यात अशा ढिंच्यॅक पूजा फक्त यूट्यूबवर भेटतात असं नाही. तर राजकारण, पत्रकारिता, लेखन, शिक्षण, चित्रपट, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांत अशी ढिंच्यॅक व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा बोलबोला आहे, चलती आहे.

आहे त्यापेक्षा मी अजून काहीतरी बकवास आणि बोगस करत राहीन असं त्या व्यक्ती ओरडून सांगत असतात. तुम्हाला काय करायचं ते करा, असं आव्हानही त्या देत असतात.

आपलं असं बोलणं आणि त्यावर ठाम राहणं, याच गोष्टीचे तर आपल्याला पैसे मिळणार आहेत, याची त्यांना चांगलीच जाणीव असते आणि हाच त्यांचा यूएसपी असतो.

याचं उदाहरण पाहायचं असेल तर आपल्या राजकारणाकडे बघता येईल. आपल्याकडच्या राजकारणातले सर्वांत प्रबळ ढिंच्यॅकजी म्हणतात की, मी माझ्या हार्डवर्कच्या जोरावर हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्रज्ञांनाही मागे टाकलं.

इतकंच नाही तर प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरी ही एक सामान्य बाब होती, असं त्यांनी डॉक्टर आणि वैज्ञानिकांना सांगितलं. तसं नसतं तर, गणपतीच्या तुटलेल्या मस्तकावर हत्तीची सोंड बसवणं कसं काय शक्य झालं असतं? असं ते विचारतात.

सिंकदराला बिहारला पाठवून त्यांनी यापूर्वीच त्यांच्या ढिंच्यॅकत्वाचा प्रत्यय दिला आहे.

आता अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, वैज्ञानिक आणि डॉक्टर या बाबीची पडताळणी करण्यात आपले केस पांढरे करुन घेतील. पण, ढिंच्यॅकजींनी त्यांचं गाणं वाजवलं आहे.

आणि ते सोशल मीडियावरही टाकलं आहे. आता तुम्ही त्याला लाईक करा किंवा नापंसती दर्शवा, पण ढिनचॅकजी त्यांचं काम करुन गेले आहेत.

राजकारणातले ढिंच्यॅकजी

आपल्याकडच्या राजकारणात या अशा ढिंच्यॅकजींची कमतरता नाही. उत्तर प्रदेशमधील राजकारणातल्या अशाच ढिंच्यॅक नेत्यांनी सामूहिक प्रयत्नांतून ताजमहालाचा जुनाच वाद पुन्हा एकदा उकरुन काढला आहे.

'ये है मंदिर नहीं है ताज, ये है मंदिर नहीं है ताज, ताजमहल ये है ही नहीं, प्राचीन शिव मंदिर है,' असं ते कोरसमध्ये गात आहेत.

याकडे बारकाईनं पाहिलं, तर नेत्यांचं हे गाणं म्हणजे ढिंच्यॅक पूजाच्या सेल्फी या गाण्यासारखंच असल्याचं तुमच्या लक्षात येईल. ज्यात पूजाजींनी सेल्फी घेण्याच्या ऐतिहासिक घटनेचं जे महात्म्य वर्णन केलं आहे ते असं -

'सेल्फी मैंने ले ली आज, सेल्फी मैंने ले ली आज, मेरे सिर पर रहता ताज, सेल्फी मैंने ले ली आज'.

या दोघांमध्ये एकच फरक. ढिंच्यॅक पूजा ही एकटीच गाते, तर राजकारणातील ढिंच्यॅक पूजा या समूह गायन करत असतात.

यात लहान-मोठे, महिला- पुरुष, उत्तर भारतीय- दक्षिण भारतीय, कुटुंबवत्सल- संन्यासी, सामान्य-फौजी, भगवाधारी, सहजधारी असे सगळे बेसूर सुरात आपला सूर मिसळून गाच असतात.

ही मंडळी एकत्रित येऊन तोपर्यंत गात राहतात जोवर तुम्ही मान्य करत नाही की, ढिंच्यॅक पूजामध्ये काहीतरी खास असणारच, म्हणूनच तर ती इतकी लोकप्रिय आहे.

यामधील काही जण तर मस्तक उडवून लावण्याच्या आणि जीभ काटण्याच्या धमकीनं लोकप्रिय झाले आहेत.

महात्मा गांधींनी देशासाठी केलं तरी काय? ज्याप्रमाणे गांधी हे देशभक्त त्याचप्रमाणे नथुराम गोडसेही. मग फक्त गांधींचंच तेवढं गुणगाण का? फक्त हा असा प्रश्न विचारल्यामुळे काहींचे फॉलोअर्स वाढले.

गांधींना खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरुन हटवण्यात आलं आहे, हळूहळू नोटांवरूनही त्यांना हद्दपार करण्यात येईल, असं हरियाणाच्या एका मंत्र्यानं जाहीर केलं आहे.

गांधींपेक्षाही मोठा ब्रँड म्हणजे नरेंद्र मोदी. गांधींनी खादीसाठी असं काय केलं, की ज्यामुळं त्यांचं नाव कॅलेंडरवर छापायला हवं?

यात असेही राजकारणी आहेत जे हातात तलवार घेवून सर्वांना मारायला हवं, कापून काढायला हवं अशा घोषणा देत राजकीय व्यासपीठावर प्रवेश करतात. पण, शेवटी कळतं की, त्यांच्या हातातील तलवारी या बोगस होत्या. त्यामुळेच शत्रूवर वार करण्याअगोदरच त्या तुटून पडल्या.

पण, ढिंच्यॅक नेत्यांचा एक वर्ग असाही आहे, ज्यांना ना हिट्सची आशा आहे ना लाइक्सची. ज्यांना फॉलोअरही नकोत आणि पैसाही नको.

तसंच आपल्या परंपरागत व्यवसायातही त्यांना स्वारस्य नसतं. पण, जग मात्र त्यांना नेता बनवण्यासाठी तयार झालं आहे. ते काही म्हणोत अथना न म्हणोत, त्यांची खुशमस्करी करण्यासाठी फौज मात्र तयार आहे.

पत्रकारांतील ढिंच्यॅक जमात

पत्रकारांतही ढिंच्यॅक व्यक्तिमत्वांची कमतरता नाही.

यात ते ढिंच्यॅक पत्रकार आहेत, जे दररोज रात्री चर्चा करण्यासाठी टीव्हीवर येतात. इतर आठ लोकांना बोलावतात आणि संपूर्ण देशाच्या वतीनं प्रश्न विचारतात, उत्तरं मागतात.

शेवटी या चर्चेचा शेवट काय होणार, कुणावर गंडांतर येणार हेही या सर्वांना माहिती असतं.

यात उद्योजकासोबत शंभर कोटींचा सौदा करताना पकडलेले आणि नंतर तिहार तुरुंगात रवानगी झालेले, दंगलीच्या रिपोर्टिंगमधील त्यांच्या धाडसाचे खोटे किस्से सांगणारे, न्यायालयाच्या ऐवजी स्वत:च निर्णय सुनावणारे आणि न्यायालयाकडून अनेकदा खरडपट्टी काढण्यात आलेले आणि पंतप्रधानांसोबत सेल्फी काढणारे असे अनेक प्रकारचे लोक आहेत.

आणि मुख्य म्हणजे या ढिंच्यॅक पत्रकारांचे लाखो ढिंच्यॅक अनुयायीही यात आहेत.

आजपासून शंभर- दीडशे वर्षांनी जेव्हा ढिंच्यॅक पूजाच्या व्यक्तित्वाचं आणि कृतीचं मूल्यांकन केलं जाईल, तेव्हा सर्वांना लक्षात येईल की, 'सेल्फी मैंने ले ली आज' ही एक शाश्वत रचना होती.

ज्यात सेल्फी घेण्यात व्यस्त असलेल्या अशा आत्ममग्न समाजाचं वर्णन करण्यात आलं होतं, ज्याला स्वत:च्या डोक्यावर ताज ठेवला आहे असं वाटत होतं. पण, शेजारी भात-भात असं ओरडत एक मुलगी उपाशीपोटी मरुन गेली, याचं मात्र काहीही भान नव्हतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)