पाहा व्हीडिओ : वुलर सरोवर नितळ ठेवणारा काश्मीरचा स्वच्छतादूत

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : हिमालयाच्या कुशीत वसलेला वुलर लेक दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे.

बिलाल अहमद दार. काश्मीर खोऱ्यातला हा किशोरवयीन मुलगा. आपल्याच समवयीन मुलांइतकी ऊर्जा त्याच्यात असली तरी त्या उर्जेचा वापर कसा करावा हे त्याला चांगलंच माहिती आहे.

त्याच्या डोळ्यात निरागसपणा असला तरी आजवर आयुष्याने दाखवलेल्या कठोर क्षणांचं प्रतिबिंबही त्याच्या डोळ्यात दिसतं.

वडिलांच्या मृत्यूनंतर लहान वयातच तो घरात कुटुंबप्रमुखाची जबाबदारी निभावू लागला.

"माझे वडील बकऱ्या विकायचे आणि ते वुलर सरोवरामध्ये पडलेलं प्लास्टिक देखील उचलायचे." तो सांगत होता.

बिलालच्या वडिलांनीच त्याला लाकडी बोट कशी वल्हवायची हे शिकवलं. या बोटीच्या एका टोकावर गुडघ्यात पाय दुमडून बसायचं आणि हातात वल्हं घेऊन प्लास्टिक कसं गोळा करायचं याचं कसब त्यानं वडिलांकडूनच आत्मसात केलं आहे.

Image copyright FAISAL H. BHAT
प्रतिमा मथळा बिलाल लहान असल्यापासूनच वुलर सरोवरामध्ये स्वच्छतेचं काम करतो.

"वडील कॅन्सर झाल्यानं वारले. सध्या या वुलर सरोवरालाही कॅन्सर झाल्यासारखं वाटतं", बिलाल काहीसा हतबल होऊन सांगत होता.

आकसत चाललेलं सरोवर

आशियातील मोठा आणि हिमालयाच्या कुशीतला हा वुलर सरोवर शुद्ध पाण्यासाठी ओळखला जायचा. भारत प्रशासित काश्मीरमध्ये श्रीनगरच्या उत्तरेला 40 किलोमीटरवर वुलर लेक आहे.

1990मध्ये रामसर वेटलँड्स कन्व्हेन्शन या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतानं या सरोवराची पूर्णतः काळजी घेतली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. पण, यासाठी फार प्रयत्न झाले नाहीत, असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे.

'वेटलँड्स इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 1911 सालच्या तुलनेत आता हे सरोवर 45 टक्क्यांनी आटलं आहे.

Image copyright AHMER KHAN
प्रतिमा मथळा वुलर सरोवरामुळे काश्मीरमधील अनेकांना आपल्या कुटुंबाचा खर्च वाचवणं शक्य होतं.

बिलालचे वडील वयाच्या आठव्या वर्षीच गेले. त्यांच्या कुटुंबानं सगळे पैसे त्यांच्या उपचारावर खर्च केले. पैसे कमवण्यासाठी बिलालनं शाळाही सोडली.

वुलर सरोवर हे तेव्हा जणू त्याचं घर होतं. मात्र, आता उत्पन्नाचा स्रोत झाला आहे.

बिलाल वुलर सरोवर मध्ये दररोज नाव घेऊन जातो आणि त्यातील प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गोळा करतो. दिवसभरात 100 ते 200 प्लास्टिक बाटल्या गोळा केल्यावर त्या विकून त्याला दिवसाकाठी 150 रुपये मिळतात.

वुलर सरोवरामध्ये नावेतून फिरून अशा बाटल्या गोळा करण्याचं कसब त्याने इतर अनेक मुलांना शिकवलं आहे.

आणि बिलाल रातोरात प्रसिद्ध झाला...

"मी पैसे कमावण्याच्या दृष्टीने हे सरोवर कधीच स्वच्छ करत नाही. हे मी सगळ्यांच्या फायद्यासाठी करतो आहे. कारण सरोवर स्वच्छ राहिलं तरच सगळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल", बिलाल सांगतो.

बंदीपोरातील एका स्थानिक चित्रपट निर्मात्यानं बिलालवर डॉक्युमेंट्री बनविली आणि तो रातोरात काश्मीरमध्ये प्रसिद्ध झाला.

प्रतिमा मथळा बिलालला तिथल्या स्थानिकांच्या भवितव्यासाठी वुलर सरोवर स्वच्छ ठेवायचा आहे.

श्रीनगर महानगरपालिकेनं त्याला 'स्वच्छ भारत अभियानाचा' ब्रँड अँबेसेडर बनवलं आहे.

तसंच सरकारनं त्याच्या शाळेचा दर महिन्याचा 8 हजार रुपयांचा खर्च उचलण्यासही सुरुवात केली असून तो नियमित शाळेतही जाऊ लागला आहे.

वुलर सरोवराला पर्टनस्थळ बनवण्यासाठी तो स्वच्छ करणं सध्या आवश्यक आहे. बिलाल यासाठी स्वतः प्रयत्न करेल असा सरकारला विश्वास आहे.

"ट्रक भरभरून कचरा इथे टाकला जातो. तसंच श्रीनगरहून वाहून आलेला कचराही इथं साठतो, " असं बिलालनं सांगितलं.

सरोवरात बिलालसोबत जात असतानाच एका घोड्याचा मृतदेह बोटीच्या बाजूनं वाहत गेला. संपूर्ण सरोवरात हिरव्या जलपर्णींचं साम्राज्य पसरलेलं दिसलं. बिलाल मात्र प्लास्टिक बाटल्या, पत्र्याचे कॅन पाण्यातून काढण्यात मग्न होता.

सरकारची कार्यवाही?

'वुलर कन्झर्वेशन अॅण्ड मॅनेजमेंट अथॉरिटी' (WCMA)चे प्रमुख असलेले निसार अहमद म्हणाले की, "सरकारनं सरपणाला वापरण्यात येणारी विलोची उंच झाडं सरोवराभोवती लावली खरी, मात्र या झाडांमुळे 1947 नंतरच्या काळात सरोवरात गाळ साचण्यास सुरुवात झाली. मी गेल्या पाच वर्षांपासून याच प्रकल्पावर काम करतो आहोत.

प्रतिमा मथळा प्लास्टिक कचऱ्यासह मृत जनावरंही वुलर सरोवरामध्ये टाकली जातात.

"गाळ काढण्यासाठी आम्ही 1 चौरस किलोमीटर खोदाईचं कामही केलं. पण हिवाळ्यात खोदाईची यंत्र काम करत नसल्यानं आम्ही वर्षभर हे काम करू शकत नाही", ते म्हणाले.

"हिवाळ्यात काम करणंही शक्य व्हावं यासाठी नवी खोदाईची यंत्र घेणार आहोत. तसंच विलोची झाडंही कापणार आहोत." असं त्यांनी पुढे सांगितलं.

पण, काश्मीरमधील 'शेर-ए-काश्मीर अॅग्रीकल्चरल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी ऑफ जम्मू युनिर्व्हसिटी' (SKUAST-Jammu) मधील डॉ. खुर्शीद अहमद याबाबत काहीसे साशंक आहेत.

ते म्हणाले, ''गेल्या अनेक दिवसांपासून खोदकाम आणि विलो झाडांच्या कापणीबद्दल चर्चा सुरू आहे. पण, प्रत्यक्षात यातले काही बदल दिसत नाहीत."

"सरकार फक्त सरोवराचं व्यवस्थापन कसं करता येईल याकडे लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, एखाद्या नैसर्गिक स्रोताचं संरक्षण त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास केल्याशिवाय करता येत नाही", डॉ. खुर्शीद अहमद सांगतात.

"सरकारनं प्रथम इथला नैसर्गिक आधिवास आणि त्यावर जगणारे जीव या सगळ्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे", असंही ते म्हणाले.

जीवनदायी सरोवर

वुलर लेकमुळे जवळपास 30 हजार जणांचा उदरनिर्वाह होतो. या सरोवराच्या सद्यस्थितीबद्दल इथले मच्छीमार सगळ्यात जास्त अवगत आहेत.

Image copyright Ahmer Khan
प्रतिमा मथळा सरकारनं वुलर सरोवराचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करावा आणि मगच त्याचं व्यवस्थापन करावं अशी पर्यावरण तज्ज्ञांची मागणी आहे.

सरोवरात स्नोट्राऊट आणि कार्प म्हणजेच पंजाबी फिश मोठ्या प्रमाणात आहेत. अब्दुल रहमान मल्ला यांनी या सरोवरात तब्बल 50 वर्षं मासेमारी केली आहे.

ते मासेमारी करत असतानाच्या काळात सरोवराभोवती अनेक झाडं होती आणि ते त्या मासेमारीनंतर त्या झाडांच्या सावलीत शांततेचा आनंद घेत असत.

"सकाळपासून मी जाळं टाकून बसलो आहे. पण, अजून 10 रुपये मिळतील इतकेही मासे मला मिळालेले नाहीत", दुपारच्या वेळेत हुक्का ओढताना मल्ला सांगत होते.

अब्दुल रशीद दार हे दुसरे एक 42 वर्षीय मच्छीमार कसेबसे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. सरकार या सरोवराबाबत काहीच करत नसल्यामुळे ते ही नाराज आहेत.

"सरोवरात तत्काळ खोदाईचं काम सुरू झालं पाहिजे. तरच, जास्त मासे मिळतील", असं दार यांनी सांगितलं.

सरोवरनितळकरण्याचं स्वप्न

या सरोवराजवळ अनेक स्त्रियाही कामासाठी येतात. त्या सरोवराजवळून भुईमूग, जळणासाठी लाकूड आणि जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी येतात.

Image copyright Ahmer Khan
प्रतिमा मथळा शुगुफ्ता (डावीकडे) आणि हजरा बेगम वुलर लेकजवळून सरपणासाठी लाकूड घेऊन परत येत असताना. जवळपास 30 हजार जणांचा उदरनिर्वाह वुलर लेकवर अवलंबून आहे.

शुगुफ्ता बेगम आणि हाजरा बेगम या एकमेकींच्या शेजारी असून दोघीही नियमित डोक्यावर मोठी टोपली घेऊन या सरोवराजवळ येतात.

"हे सरोवर खूप मोठं होतं पण आता जवळपास कोरडं पडलं आहे. तसंच गाळ असल्याने खूप उथळही झालं आहे. इथे पूर्वी खूप मासे मिळायचे," असं 40 वर्षीय हाजरा बेगम यांनी सांगितलं.

सध्या सरोवराजवळ अनेक कामं सुरू आहेत. गुरं चारण्यासाठी स्थानिक त्यांना सरोवराजवळ घेऊन येतात. ट्रक तर थेट काठापर्यंत येतात. आणि त्यातील माती, वाळू घेऊन निघून जातात.

गुलाम मोहुद्दीन मथानजी हे अशी कामं करुन दिवासाला 400 रुपये कमावतात. पूर्वी वाळू वेगळी मिळायची. मात्र आता ती चिखलात मिसळलेल्या अवस्थेतच मिळते.

हे काम करणं त्यांना आवडत नाही. पण या कामावाचून दुसरा पर्याय नसल्याचेही ते सांगतात. "हे सरोवर आम्हाला स्वच्छ हवं असून त्यावरच आमची उपजीविका अवलंबून आहे."

Image copyright Faisal H. Bhat
प्रतिमा मथळा बिलालची आई मुगली हिला बिलालच्या कामाचा खूप आदर वाटतो.

दरम्यान, बिलालला सध्या आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. तसंच पुढील पिढ्यांनी शिकता-शिकता या सरोवराची काळजीही घ्यावी, असं त्याला वाटतं. कारण, त्यांचं भवितव्य या सरोवरावर अवलंबून असल्याचं बिलाल सांगतो.

"वुलर लेक स्वच्छ झाल्याचं मला स्वप्न नेहमी पडतं. माझ्या आयुष्यातलं हे खूप मोठं ध्येय आहे. इन्शाअल्लाह हे स्वप्न लवकर खरं व्हावं." वुलर सरोवराबद्दल आशावादी असलेला बिलाल अखेरीस सांगत होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)