जेव्हा विद्या बालनला अपशकुनी ठरवलं जातं...

विद्या बालन Image copyright Communique PR

'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि 'पा' अशा सिनेमांतून कसदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या विद्या बालनला भीती वाटत होती की, तिला हलक्या फुलक्या सिनेमांची ऑफरच येणार नाही.

'बीबीसी'शी बोलताना विद्या म्हणाली, "माझा स्वभाव हसतमुख आणि खेळकर आहे. पण, माझ्या स्वभावाच्या विरुद्ध अशाच भूमिका मला मिळाल्या आहेत."

"त्यामुळं मला भीतीही वाटत होती की, मला नेहमी गंभीर भूमिकाच मिळतील," असं ती म्हणते.

"मला आनंद होतो की 'तुम्हारी सुलु' या सिनेमातील भूमिकेनं मला मनमोकळेपणानं हसण्याची संधी मिळाली."

या सिनेमात विद्यानं श्रीदेवीच्या 'हवा हवाई' या सुप्रसिद्ध गाण्यावर नृत्य केलं आहे.

श्रीदेवीच्या गाण्यावर नृत्य म्हणजे आत्महत्या

विद्या म्हणते, "सुरुवातीला मी फारच घाबरले होते. हे नृत्य करू शकत नाही, असं दिग्दर्शक सुरेश यांना सांगितलं. हे आत्महत्या करण्यासारखं आहे. पण, त्यांनी स्पष्ट केलं की हे गाणं आपण श्रीदेवीला समर्पित करत आहोत, मगच मी या नृत्याला होकार दिला."

Image copyright Communique PR

38 वर्षांची विद्या स्वतःला सिनेउद्योगातील बदलांची साक्षीदार मानते. ती सांगते "आता 30 वर्ष वय पार केलेल्या अभिनेत्रींसाठीही कथानक लिहिलं जात आहे."

"माझं वय 38 आहे. माझं लग्न झालं आहे आणि मी वेगवेगळ्या भूमिका करत आहे. काही वर्षांपूर्वी असं काहीच नव्हतं," असं ती म्हणाली.

फिट राहणं हा नाईलाज!

20-30 ते वयात फिट राहण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न असतो, असं ती म्हणते.

"खरंतर ही समाजाचीच अडचण आहे, प्रत्येकाला आपलं वजन आणि वय कमी करायचं आहे," असं ती म्हणाली.

"जोपर्यंत समाज बदलत नाही तोपर्यंत अभिनेत्री कमी वयातच फिट राहण्याचा प्रयत्न करणं बंद करणार नाहीत. वाढत्या वयात कोणी काम देणार नाही, अशी भीती असते."

पण विद्या म्हणते तिला अशी कोणतीही भीती वाटतं नाही. ती म्हणते, "मला खात्री आहे की जोपर्यंत मी जीवंत आहे, तोवर माझ्यासाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जातील."

लैंगिक छळावर महिला गप्प का?

हार्वी वाइनस्टाईन प्रकरणानंतर सिनेसृष्टीतील लैंगिक छळाबद्दल चर्चा सुरू झाली आहेत. जर एवढ्या मोठ्या अभिनेत्रींना बोलायला एवढा वेळ लागला असेल तर सर्वसामान्य स्त्रियांना बोलायला किती वेळ लागेल? असा सवाल विद्या उपस्थित करते.

Image copyright Communique PR

या प्रकारावर अभिनेत्रींनी बाळगलेल्या मौनावर विद्या म्हणते, "महिलांसाठी असं करणं कठीण असतं. जर निर्माता मोठा असेल तर तुमचं करीअर संपू शकतं, म्हणून अशा परिस्थितीत कोणी धोका पत्करू इच्छित नाही."

"इतका काळा तुम्ही गप्प का बसला? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. कारण या विषयांवर बोलणं हेच कठीण असतं", ती म्हणते.

विद्या म्हणाली, "लोक तुमच्याकडे बोट दाखवणार हे सर्वांनाच माहीत असतं. मला आनंद होतो की, अभिनेत्री या विषयावर बोलत आहेत." आपल्या बाबतीत असं काही घडल नसल्याचं विद्या सांगते.

जेव्हा विद्याला अपशकुनी ठरवलं गेलं

हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं स्थान बनवलेल्या विद्याला सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत फार संघर्ष करावा लागला होता.

अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या एका मल्याळी सिनेमात तिला भूमिका मिळाली होती.

पण, काही कारणांनी हा सिनेमाच बंद झाला. त्यामुळं विद्याला अपशकुनी ठरवण्यातं आलं.

तर आणखी एका दक्षिणात्य सिमेमाच्या कास्टिंगवेळी विद्याला जन्मतारीख विचारण्यात आली होती.

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित 'तुम्हारी सुलु'मध्ये विद्या एका रेडिओ जॉकी बनण्याची संधी मिळालेल्या गृहिणीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)