मुलीवरील उपचारासाठी आदिवासी कुटुंबाचा नंदुरबार ते मुंबईचा जीवघेणा प्रवास

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी, मुंबई
'जी टी'हॉस्पिटलमध्ये सध्या रविता हिच्यावर उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, BBC/Mayuresh Konnur

फोटो कॅप्शन,

जीटी हॉस्पिटलमध्ये सध्या रविता हिच्यावर उपचार सुरू आहेत.

राजा वळवी आणि त्यांची पत्नी शांती यांच्या मनात प्रचंड खदखद आहे, राग आहे. पण तो नेमका कोणाबद्दल आहे, हे त्यांनाही समजत नाही. जे त्यांच्यासोबत झालं, तसं इतर कोणाहीसोबत झालं असतं तर क्वचितच तो राग असा शांत चेहऱ्यामागे लपवला गेला असता.

त्यांची आठ वर्षांची मुलगी रविता झाडावरून पडल्यानंतर तिच्या उपचारासाठी या पालकांची जी फरफट झाली, ती इतकी लांब पल्ल्याची होती की, रविता नेमकी पडली कधी याचा दिवस, तारीखही त्यांना आठवत नाही. हॉस्पिटल दफ्तरी नोंद 'दीड महिन्यांपूर्वी' अशीच आहे.

मुंबईच्या फोर्ट भागातल्या 'गोकुळदास तेजपाल' हॉस्पिटलमध्ये जेव्हा दोन दुभाषांच्या मदतीनं भिलोरी भाषा समजून घेत या आई वडिलांची कहाणी आम्ही ऐकत होतो, तेव्हा शेजारच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रविताची शस्त्रक्रिया सुरू होती.

वळवी कुटुंबीय नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगांव तालुक्याच्या खडक्या गावचे. सातपुड्याच्या रांगेतल्या या आदिवासीबहुल जिल्ह्यात आजही अनेक अशी गावं, तालुके आहेत ज्यांच्यापर्यंत रस्ते वा वाहतुकीची अन्य कोणतीही साधनं पोहोचत नाहीत.

वळवी कुटुंबीयसुद्धा भिल्ल समाजाच्या या भागातल्या बहुतांश कुटुंबीयांप्रमाणे स्वत:पुरती थोडीफार शेती करतात, गुरं पाळतात.

रविता झाडावरून पडली आणि...

त्या दिवशीही राजा आणि शांती वळवी गुरं चारायला गेले होते आणि दुसरीत शिकणारी रविता थोड्याच वेळात शाळेला जाणार होती. पण ती मैत्रिणींसोबत खेळायला गेली आणि जवळच्याच मोहाच्या झाडावर खेळता खेळता २५ फुटांवरून खाली पडली.

तिच्या मणक्याला तिथंच फ्रॅक्चर झालं आणि मज्जारज्जूलाही गंभीर धक्का बसला. बेशुद्धावस्थेतल्या रविताला राजा वळवी आणि गावकऱ्यांनी लगेच रुग्णालयात न्यायचा निर्णय घेतला आणि तिथंच वळवींचा 'जन्माचा फेरा' सुरु झाला.

"आम्ही तिला बांबूच्या झोळीत (ज्याला या भागात 'बैम्युलन्स' असंही म्हटलं जातं) घातली आणि अर्धा तास चालत डांबरी रस्त्यापर्यंत आणलं. पुढं प्रवासी जीपमध्ये बसवून धडगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथं फक्त ड्रेसिंग करण्यात आलं."

फोटो स्रोत, BBC/Mayuresh Konnur

फोटो कॅप्शन,

रविताची आई

"त्यांनी नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. मग त्या रात्रीच आम्ही गाडी करून तिला ८० किलोमीटर असलेल्या नंदुरबारला हलवलं. रविता अर्धवट बेशुद्धच होती, फक्त हात हलवत होती," राजा वळवी आठवून सांगतात.

दवाखान्यातून पुन्हा घरी आणलं

पुढचे १० दिवस रविता नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती. काही उपचार करण्यात आले, एक्स रे काढण्यात आले. पण तिच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही.

"तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सुरतला जायचा सल्ला दिला. पण तिकडे कोणी माझ्या ओळखीचं नव्हतं आणि इतके पैसेही जवळ नव्हते. काय करायचं कळत नव्हतं. शेवटी आम्ही तिला परत पाड्यावर घरी नेण्याचा निर्णय घेतला," राजा वळवींमधले हतबल वडील बोलत होते.

त्या मणका मोडलेल्या अवस्थेतच रविताला एस टी बसमधून घरी आणण्यात आलं.

"पुढचे ४ दिवस आम्ही घरीच होतो. माझी मुलगी काहीच बोलत नव्हती. फक्त हात हलवायची. काही खायलाही नको म्हणायची. मी तरीही मक्याची खीर तिला भरवायचे," डोळ्यात पाणी आणून रविताची आई शांती सांगतात.

एक दिवसाचा खर्च 5 हजार रुपये

शेवटी तिची अवस्था आईवडिलांना पाहावेना म्हणून त्यांनी परत रविताला डॉक्टरांकडे नेण्याचं ठरवलं. तिला बांबूच्या झोळीत घातलं आणि यावेळेस शहाद्याच्या खासगी रूग्णालयात दाखल केलं.

"तिथं एकच दिवस होतो. कारण एकाच दिवसाचं बिल पाच हजार रुपये झालं. मी कुठून आणणार इतके पैसे? थोडे गावच्या कामदाराकडून उधार घेतले आणि थोडे मोठ्या मुलीकडून." पैसे जमवतांनाच राजा वळवींना पुढचा रस्ता संपल्याची जाणीव होत होती.

पण तिथंच एका ओळखीच्या व्यक्तीनं त्यांना धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटला जायला सांगितलं आणि तत्परतेनं त्यांना अॅम्ब्युलन्सही मिळवून दिली.

वळवींनी ते मान्य केलं आणि बांबूच्या झोळीसहित आपल्या मुलीला त्यांनी त्या अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं. रात्रीपर्यंत ते शहाद्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळ्याला पोहोचले. आता बाकी गावचं मदतीला कोणी नव्हतं. फक्त आई, वडील आणि मुलगी.

फोटो स्रोत, BBC/Mayuresh Konnur

फोटो कॅप्शन,

रविताचे वडील

"धुळ्याला डॉक्टरांनी लगेच रविताला बघितलं, तपासलं आणि सांगितलं की, इथे तिचे उपचार शक्य नाहीत. तिला तातडीनं मुंबईच्या केईएम रूग्णालयात न्यायला हवं."

"आम्ही तर कधी आयुष्यात मुंबईला गेलो नव्हतो. त्या डॉक्टरांनीच अॅम्ब्युलन्स करून दिली आणि गरजेला लागतील म्हणून माझ्या हातात दोन हजार रुपये दिले," राजा वळवी सांगतात.

...आणि मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू झाला

दुसऱ्या दिवशी सकाळीच बांबूच्या झोळीसह वळवींनी रविताला अॅम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि ते मुंबईकडे निघाले. पण त्यांचा हा प्रवासही कमी अडथळ्याचा नव्हता.

"मध्येच कुठेतरी रस्त्यात ड्रायव्हरनं अॅम्ब्युलन्स थांबवली आणि तो आमच्याकडे पैसे मागायला लागला. मी विनवणी केली, परिस्थिती सांगितली, पण त्यानं पैसे लागतील असं सांगितलं."

"शेवटी धुळ्याच्या डॉक्टरांनी दिले होते त्यातले ८०० रूपये त्याला दिले आणि मग तो पुन्हा मुंबईकडे निघाला," वळवी आठवून सांगतात.

त्या दिवशी संध्याकाळी अॅम्ब्युलन्सने वळवी कुटुंबीयांना त्यांच्या बांबूच्या झोळीतल्या मुलीसह केईम रुग्णालयाच्या गेटवर सोडलं आणि ती निघून गेली.

इथून पुढे त्यांचा एक नवाच लढा सुरू झाला... भाषेचा. "केईएम मध्ये डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतलं, उपचारही सुरू झाले. पण आम्हाला त्यांची भाषा समजत नव्हती आणि आमची त्यांना. आमच्या मुलीवर काय उपचार सुरु आहेत हेच आम्हाला समजत नव्हतं", राजा वळवी सांगत होते.

"तिच्या प्रकृतीत काही बदलही आम्हाला दिसत नव्हता. ४ दिवस असेच गेले. शेवटी आम्ही तिला परत घरी न्यायचं ठरवलं आणि सोडायची विनंती रुग्णालयात केली," वळवी सांगतात, जे इतके दिवस नेसत्या कपड्यांनीशी पत्नीसोबत मिळेल ते खाऊन हॉस्पिटलमध्ये राहत होते.

शेवटी 'डामा' म्हणजे 'डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल अॅडव्हाईस' ची नोंद होऊन वळवी आपल्या आठ वर्षांच्या मुलीला बांबूच्या झोळीत घालून केईएम रुग्णालयाच्या बाहेर पडले. पण जायचं कुठे?

मुंबईच्या रस्त्यांवर भटकत राहिले

"ती रात्र तिघांनीही 'केईएम'च्या बाहेर रस्त्यावरच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आम्ही रस्त्यात भेटेल त्या प्रत्येकाला नंदुरबार किंवा धडगांवला कसं जायचं ते विचारत फिरायला लागलो."

"आमची भाषा कोणाला कळत नव्हती. लोक काही हातानं दिशा दाखवायचे आम्ही तिकडं जायचो," राजा वळवी त्यांचा मुंबईतला तो भयाण दिवस आठवतात.

फोटो स्रोत, BBC/Mayuresh Konnur

फोटो कॅप्शन,

'केईएम'बाहेर पडल्यावर रस्त्यात भेटंल त्या प्रत्येकाला नंदुरबार किंवा धडगांवला कसं जायचं ते विचारत फिरायला लागले.

पुढचे काही तास राजा आणि शांती वळवी आपल्या आठ वर्षांच्या जखमी मुलीला बांबूच्या झोळीत घालून मुंबईच्या उन्हात लोक दाखवतील तशी दिशा शोधत भेलकांडत नंदुरबारचा रस्ता शोधत होते.

काहीही समजत नव्हतं, पण आशा होती. ते कुठे पोहोचले ते समजलं नाही, पण राजा वळवींना त्या रस्त्याजवळचा समुद्र आठवतो.

"तिथं आम्हाला पोलिसांनी अडवलं. मी त्यांना अडखळत परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या मोठ्या गाडीत बसवलं आणि एका हॉस्पिटलमध्ये आणून सोडलं," वळवी सांगतात.

भाषेचा अडसर दूर झाला

पोलिसांनी त्यांना जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात आणलं होतं. पण तिथंही भाषेचा प्रश्न आड आला.

तिथं तेव्हा मूळच्या नंदुरबारजवळच्या आणि 'भिलारी' भाषा समजत असलेल्या एक महिला पोलीस कॉन्स्टेबल कामानिमित्त आल्या होता. त्या बोलल्यावर प्रश्न नेमका समजला आणि डॉक्टरांनी 'जी टी' हॉस्पिटलला जायला सांगितलं.

त्या महिला पोलिसानंच मदत केली आणि त्या दिवशी लगेचच, म्हणजे १८ ऑक्टोबरला रविताला 'जी टी' हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. अखेरीस जिथं योग्य वैद्यकीय उपचारांसाठी पोहोचायला हवं होतं, तिथे रविता तब्बल दीड महिन्यानंतर पोहोचली होती.

"मणक्यात फ्रॅक्चर असल्यानं आणि मज्जारज्जूला दुखापत असल्यानं तिची शारीरिक स्थिती नाजूक होती. अशक्तपणा होता, कुपोषणासारखी स्थिती होती. त्यामुळे कोणत्याही मोठ्या शस्त्रकियेअगोदर तिची ही स्थिती सुधारण्यासाठीही आम्हाला वेळ द्यावा लागला," निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल साहा म्हणाले.

अपघातावेळी जबरदस्त इजा झाल्यानं आणि योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं रविताची स्थिती नाजूक आहे. ती अधू झाली आहे आणि कंबरेच्या खाली तिला कोणत्याही संवेदना नाहीत. पाय हलवता येत नाहीत, लघवी झाल्याचंही समजत नाही.

दुदर्म्य इच्छाशक्ती आणि रवितावर उपचार

"तिच्यात लगेच आणि संपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता खूप कमी आहे. शस्त्रक्रियेनंतर ती थोडीफार उठू बसू शकेल. पण पूर्णपणे आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा काळ फिजिओथेरपी आणि इतर उपचारांची आवश्यकता असेल," 'जी टी'हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ मुकुंद तायडे सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Mayuresh Konnur

फोटो कॅप्शन,

'भिलारी' भाषा समजत असलेल्या एक महिला पोलिस कॉन्स्टेबलमुळं पुढचा मार्ग सोईस्कर झाला.

"ती पडली तेव्हाच गंभीर दुखापत झाली होती. त्याचे उपचार नंदुरबारसारख्या ठिकाणी होणं शक्य नाही. ती लवकरात लवकर इथे पोहोचली असती, तर इतकी गुंतागुंतीची परिस्थिती टाळता आली असती," डॉ तायडे पुढे म्हणतात.

माध्यमांत राजा, शांती आणि रविता वळवींची कहाणी आल्यानंतर राज्य सरकार जागं झालं. 'महात्मा फुले जन आरोग्य योजने'अंतर्गत रविताच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांचा सगळा खर्च सरकारनं उचलला.

पण रविताच्या आई वडिलांच्या दुदर्म्य जिद्दीमुळेच रविता उपचारांपर्यंत पोहोचली. उपचार रुग्णांपर्यंत पोहोचवणं हे सरकारचं कर्तव्य असतं. त्याचं वास्तव महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात रविता वळवीच्या निमित्तानं पुन्हा प्रकाशात आलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)