व्हीडिओ पाहा : आसामच्या 'जुगाडू'ने फुलवलं सामान्यांचं आयुष्य

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
BBC INNOVATORS : उद्धव भरालींच्या 'जुगाडां'चा विकलांग व्यक्तींना आधार

"मला सगळ्यांच्या अडचणी दूर करायला आवडतात. आपल्या कामांमुळे इतरांच्या डोक्यावरचा ताण हलका व्हावा किंवा त्यांनी काहीसं स्वावलंबी व्हावं हा माझा या मागचा हेतू आहे", उद्धव भराली सांगत होते.

याच कारणांमुळे भराली नवनव्या शोधांच्या मागे आपला वेळ सत्कारणी लावत असतात. 30 वर्षांपूर्वी त्यांनी या कामाला सुरुवात केली होती. आज हे काम त्यांच्या आयुष्याचं ध्येय झालं आहे.

त्यांनी आजपर्यंत नवनव्या अशा 140 वस्तूंचा शोध लावला आहे. त्यातल्या अनेक वस्तू या व्यवसायिकदृष्ट्या विकल्या जात आहेत. तर, काही वस्तूंना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

लोकांना मदत करणं हे माझं प्रमुख उद्दीष्ट असल्याचं ते सांगतात. कृषी शेत्राशी निगडीत अनेक शोधांसाठी त्यांना देशभर ओळखलं जातं. मात्र, त्यांचे अलीकडचे शोध विकलांग व्यक्तींचं आयुष्य सोपं करत आहेत.

भारत सरकारकडून विकलांग व्यक्तींना विशेष सहकार्य मिळत असल्यानं अशा व्यक्तींना नव्या शोधांच्या माध्यमातून सहाकार्य करण्याचा निर्धार त्यांनी केल्याचं ते सांगतात.

प्रतिमा मथळा नाराळातून खोबरं काढण्यासाठी उद्धव यांनी या जुगाडाचा शोध लावला.

राज रेहमान हा 15 वर्षांचा मुलगा जन्मतःच अपंग आणि सेरलब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त आहे. त्याला मदत करण्यासाठी भराली यांनी एका नव्या वस्तूचा शोध लावला. ही वस्तू म्हणजे त्याच्या हाताचा आधार आहे. हाताला पट्ट्या बांधून त्यात ही वस्तू अडकवली जाते. त्याद्वारे त्याला लिहीता आणि जेवता येतं.

वेगळ्या प्रकारचे पायात घालण्याचे बूटही त्यांनी तयार केले असून त्यामुळे राज याला चालणं शक्य झालं आहे.

"पूर्वी मला माझ्या अवस्थेमुळे सगळीकडे वावरताना काळजी वाटायची. पण, आता कोणताही ताण नाही. आता रेल्वे लाईन ओलांडायची पूर्वीसारखी भीती मला वाटत नाही. आता मी आनंदी आहे कारण माझी काळजी मला घेता येते," असं राजनं आत्मविश्वासानं सांगितलं.

'जुगाडच यशस्वी'

भराली यांनी सुरुवातीला जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा लोक त्यांच्या या प्रयत्नांना निरुपयोगी समजायचे. मात्र, सलग 18 वर्षं हे प्रयत्न केल्यानंतर त्यांना लोकांनी नव-संशोधकाचा दर्जा दिला.

भराली यांनी निर्मिलेल्या बहुतेक वस्तू या कमी खर्चाच्या असून सहज उपलब्ध असलेल्या कच्चा मालापासून किंवा वापरात नसलेल्या टाकाऊ वस्तूपासून तयार केल्या आहेत.

मूळचा हिंदी भाषेतला आणि हिंदीच्या प्रभावामुळे अलीकडे मराठीत प्रचलित झालेला शब्द या वस्तूंना वापरला जातो. तो म्हणजे 'जुगाड'. त्यांनी केलेल्या या नव-संशोधनाला स्थानिक लोक जुगाडच संबोधतात.

हा जुगाड म्हणजे स्वस्तातला आणि हलका पर्याय. केंब्रिज विद्यापीठातील जज बिझनेस स्कूलचे जयदीप प्रभू यांनी या 'जुगाड'वर एक पुस्तक लिहिलेलं आहे. या जुगाडमध्ये अनेकांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य आहे.

प्रतिमा मथळा आगळी यंत्र आणि वस्तू निर्मिल्याने उद्धव यांना प्रसिद्धी मिळाली.

"जुगाड हे मानवी मनातील संशोधन वृत्ती जागी करतात. आपल्या आणि आपल्या भोवतीच्या समस्यांवर जुगाड शोधणं हा चांगला उपाय आहे." असं प्रभू यांनी सांगितले.

भराली हे नव-संशोधीत वस्तूंची विक्री करुन आपला उदारनिर्वाह करतात. तसंच खासगी व्यावसायिकांसाठी आणि सरकारसाठी तांत्रिक बाबींचे सल्लागार म्हणूनही काम करतात.

पण, इतरांना पैसे कमवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करण्यात ते पुढे असतात. तसंच त्यांनी तयार केलेली यंत्र किंवा वस्तू सगळ्यांना वापरता यावीत यासाठी दोन केंद्र उभारली असून तिथे सगळेच जण येऊन त्याचा वापर करू शकतात.

अशाच एका केंद्रावर त्यांनी तांदूळ दळण्याचं यंत्र तयार केलं आहे. आजूबाजूच्या गावांतील महिला या केंद्रावर येऊन तांदूळ दळतात. त्यातून तयार झालेल्या तांदळाच्या पिठाच्या विक्रीचा व्यवसाय त्या करतात.

'शॉर्टकर्ट वापरू नका'

वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, भारतातील 15 वर्षांवरील फक्त 27 टक्के महिलाच आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.

"गावात उत्पन्न मिळवण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. तसंच नोकऱ्याही नाहीत. या केंद्रातील यंत्र वापरुन आम्ही सन्मानाने पैसे कमवू शकतो," असं या केंद्रात आलेल्या प्रोबिता दत्ता म्हणाल्या.

केवळ महिलाच नाही तर ग्रामीण भागातील पुरुषांनाही भराली यांच्या केंद्रातील यंत्रांचा वापर करता येतो. भराली यांनी सिमेंटच्या विटा तयार करणारी 200 यंत्र तयार करुन विकली आहेत. एक यंत्र चालवायला पाच माणसं लागतात.

या यंत्रामुळे आज जवळपास एक हजारहून अधिक माणसांना रोजगार मिळतो आहे.

प्रतिमा मथळा Raj Rehman says he is happy that he can look after himself, thanks to Uddhab Bharali's inventions

यशासाठी शॉर्टकर्ट वापरुन चालत नसल्याचं भराली स्पष्ट करतात. त्यांच्या परिश्रमांमुळे आणि व्यवसायामुळे आज किमान 25 कुटुंबांना आधार मिळाला आहे.

त्यांचं अभियांत्रिकी शिक्षण या सगळ्या नव-संशोधनामागचा कणा असलं तरी मूलभूत संशोधन हे शिकवलं जात नाही. ही त्यांची धारणा आहे.

ते म्हणतात, "आजूबाजूच्या घडामोडींनी व्यथित तसंच अस्वस्थ मन असणारी व्यक्ती नव-कल्पनांना जन्म देऊ शकते. कुणी तुम्हाला शोधक वृत्तीचं बनवू शकत नाही. या गोष्टी उपजतच असाव्या लागतात," असं आपल्या संशोधक वृत्तीबद्दल भराली यांनी सांगितलं.

भराली यांनी नव्या कल्पनांनी निर्मिती करायची आणि त्याला नंतर उद्योजक मूल्य मिळणार असं पूर्वी समीकरण होतं. पण, आता हे समीकरण बदललं असून व्यवसायिकच त्यांना नव्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी बोलवत आहेत. हे त्यांना आता अजिबात थांबवायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात की, "मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. नेहमीच काहीतरी नव्याचा ध्यास मला असतो. हा शोध पहिल्यांदा लावणारा मी आहे याचा मनस्वी आनंद मला होतो."

(याबाबत अधिक संशोधन आणि रिपोर्टिंग प्रीती गुप्ता यांनी केलं आहे. बीबीसी वर्ल्ड सर्विसच्या या निर्मितीला बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून अर्थसहाय्य मिळालं आहे.)


बीबीसी इनोवेटर्स सिरीज हे दक्षिण आशियातील रोजच्या जगण्यातील आव्हानांना पर्याय देणाऱ्या नव-कल्पानांचे व्यासपीठ आहे.

'जुगाड' म्हणजेच स्वस्तातला पर्याय असून यावर उद्धव भराली यांनी निर्मिलेल्या जुगाडांवर चर्चा करण्यात आली आहे.

तुम्ही जर एखादे नव-संशोधन केले असेल किंवा एखाद्या प्रवासादरम्यान तुम्हाला ते आढळलं असेल तर त्याची माहिती, छायाचित्र आमच्यापर्यंत पोहचवा. yourpics@bbc.co.uk या इमेल आयडीवर किंवा #Jugaad, #BBCInnovators या हॅशटॅगचा वापर करुन तुमची छायाचित्र @BBCWorldService वर तुम्ही टाकू शकता. किंवा इथे here क्लिक करुन तुम्ही देऊ शकता.

BBC Innovators बद्दल अधिक माहिती इथे जाणून घ्या.


(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)