दृष्टिकोन : राजकारणाच्या पिचवर राहुल गांधी आऊट झाले नसले तरी रन काढतील का?

  • राजेश प्रियदर्शी
  • डिजिटल एडिटर, बीबीसी हिंदी
राहुल गांधी और सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसच्या एका नेत्याने दोन वर्षांपूर्वी राहुल गांधींविषयी खासगीत बोलताना सांगितलं की, "ते एक असे बॅट्समन आहेत, जे आऊट होत नाहीत आणि रनसुद्धा काढत नाहीत. फक्त ओव्हर खेळत बसले आहेत."

राहुल गांधी 2004 साली खासदार झाले होते. ते गेलं दीड दशक राजकारणात सक्रिय आहेत. एकतर ते घराण्याचा वारसा पुढे नेण्यास सक्षम नाहीत किंवा जबाबादारी घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

13 वर्षं उमेदवारी केल्यानंतर आता राहुल यांना पक्षाचं अध्यक्षपद दिलं जाणार, अशी जोरदार शक्यता आहे. फक्त हे गुजरात निवडणुकीच्या आधी होणार की नंतर हा निर्णय अद्याप बाकी आहे.

काँग्रेस पक्षात याविषयी दोन मतप्रवाह आहेत. एका गटाच्या मते, गुजरात निवडणुकीच्या आधी त्यांना अध्यक्षपद दिलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. म्हणून 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना पक्षाचे सर्वोच्च पद देणार असल्याची चर्चा आहे.

याच वेळी दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की गुजरात निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा. विजय मिळवला तर आनंदी वातावरणात ते पक्षाध्यक्ष होतील आणि पराभव झाला तर कमीत कमी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीची सुरुवात तरी नामुष्कीने होणार नाही.

राहुल गांधींनी अनेकदा अपेक्षा वाढवून पक्षाच्या पाठीराख्यांना निराश केलं आहे. जेव्हा ते अज्ञातवासातून बाहेर आले, तेव्हा लोकांनी 'छा गए' असं विधान केलं होतं. नंतर राहुल गांधींनी अनेक सुट्या घेतल्या, आपल्या (इटलीच्या) आजीच्या घरीसुद्धा जाऊन आले. नंतर परत आले, तेव्हा एका सभेत ते चक्क 'जवाबों का सवाल' मागू लागले.

पण आता पुन्हा एकदा आशा जाग्या झाल्या आहेत. पण काँग्रेस पक्षातल्या लोकांचं तोंड दुधानं पोळलं आहे. राहुलचा फॉर्म पुन्हा बिघडणार तर नाही ना, अशी शंका अजूनही त्यांच्या मनात आहे. फॉर्म बिघडला तर ते आऊट होणार नाहीत, पण अपेक्षांवर मात्र पाणी फिरेल.

काँग्रेसच्या राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या पत्रकार अपर्णा द्विवेदी म्हणतात, "आता नाही तर कधीच नाही, हे राहुलला कळलं आहे. आता त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना लवकरच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल."

जनसंपर्क यंत्रणा जोरात

राहुल गांधीची प्रसिद्धी कमी-अधिक होणं हे नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेच्या कमी-अधिक होण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जेव्हा नोटाबंदी, बेरोजगारी आणि आर्थिक विकासात घट होण्यास सुरुवात होऊन मोदी यांचा करिष्मा कमी झाला, तेव्हाच राहुल गांधी प्रकाशझोतात येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतून परत आल्यानंतर राहुल गांधी भलतेच फॉर्मात आहेत. त्यांच्या भाषणांचा दर्जा सुधारला आहे. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देत आहेत. त्यांची पीआर आणि सोशल मीडिया टीम जोरात आहे. आपला मुलगा राहुल गांधींमुळे पायलट झाला, हे निर्भयाच्या आईने मीडियाला सांगणं हे सकारात्मक जनसंपर्काचंच लक्षण आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट, नाटकीय भाषणं आणि प्रचारतंत्राच्या बाबतीत भाजप-संघ यांच्यासमोर आपला निभाव लागणं कठीण आहे हे राहुल गांधींना उमगलं आहे. सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यास मोदी सक्षम आहेत, हेसुद्धा त्यांना माहिती आहे. मोदी बाउन्स बॅक होण्याच्या स्थितीत असताना आपली पत सांभाळून ठेवणं हा राहुल गांधींसमोरचा चिंतेचा विषय आहे.

यामुळे हळूहळू मोदींपेक्षा आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात राहुल व्यस्त आहेत. कारण मोदींना मोदींच्या पद्धतीने हरवणं कठीण आहे.

राहुल सध्या मोदी आणि अमित शाहांच्या आक्रमणांना संयतपणे उत्तरं देत आहेत. "भाजपसुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी संपून जावं, असं मी म्हणणार नाही. ते आमच्याविषयी असं बोलतात ही त्यांची विचारसरणी आहे," असं वक्तव्य त्यांनी नुकतंच गुजरातमध्ये केलं.

प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न

राजकुमार ही प्रतिमा धुऊन काढण्यासाठी राहुल गांधी खरोखर खूप मेहनत घेत आहेत. ते सामान्य माणूस दिसण्याचा कायम प्रयत्न करत असतात. ते जितका संघर्ष करताना दिसतात, ते बघता युवराज म्हणून त्यांची संभावना करणं कठीण आहे.

म्हणूनच ते आपले वडील आणि आपली आजी इंदिरा गांधी यांचा उल्लेख करणं टाळतात. भाजपची आक्रमकता आणि त्यांच्या टोमण्यांना उत्तर देण्यासाठी ते नवीन भाषाही आत्मसात करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

राहुल गांधी हे मोदींसाठी आव्हान ठरू शकतात, हा विचार काही काळापूर्वी हास्यास्पद मानला जायचा. राहुल गांधी जर प्रचारात उतरले तर भाजपचा विजय होईल हा विनोदसुद्धा काही काळापर्यंत प्रचलित होता.

आजसुद्धा ते मोदींसाठी आव्हान ठरू शकलेले नाहीत, पण या शक्यतेचा इन्कार करणं मुश्किल झालं आहे, हाच राहुल गांधींचा खरा विजय आहे. या बदलत्या वातावरणाची परिणती विजयात होईल की नाही हे सांगणं मात्र कठीण आहे.

आजच्या तारखेला राहुल गांधींकडे गमावण्यासाठी फारसं काही नाही, पण कमावण्यासाठी मात्र भरपूर आहे. नरेंद्र मोदींसाठी हे चित्र मात्र उलटं आहे.

गुजरातची चाचणी

भाजपा आणि मोदी यांच्याबाबत जी निराशा आहे, त्याचा फायदा राहुल गांधी घेऊ शकतील का, यासाठी गुजरातची निवडणूक ही लिटमस टेस्ट आहे.

मनमोहन सिंग यांचं मौन लोकांना खटकत होतं, तेव्हा मोदींनी आशेचा किरण दाखवला. आता मात्र लोकांची तक्रार आहे की, मोदी बोलतात खूप पण कृती कमी करतात.

फोटो स्रोत, Getty Images

अशावेळी मोजकं बोलणारे राहुल गांधी लोकांना आवडायला लागले आहेत. पण राहुल गांधींकडे मोदींसारखा ट्रॅक रेकॉर्ड नाही. ते खासदार होते, पण मंत्री किंवा मुख्यमंत्री नव्हते.

म्हणूनच अजुनही राहुल गांधींची पंतप्रधान म्ह्णून लोक कल्पना करू शकत नाही. पण विरोधी पक्षाकडे राहुल गांधीसारखा चेहरा नाही, हेसुद्धा तितकंच खरं आहे.

तोपर्यंत राहुल गांधी खेळपट्टीवर आहेतच. प्रेक्षकसुद्धा त्यांची हुर्यो उडवण्याऐवजी अधूनमधून टाळ्यासुद्धा वाजवत आहे. पण राहुल धावा करू शकतील का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)