प्रेस रिव्ह्यू : मनमोहन सिंग म्हणतात पंतप्रधानांनी आता तरी चूक मान्य करावी

नोटाबंदीच्या निर्णयावर मनमोहन सिंग यांची पुन्हा एकदा टीका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नोटाबंदीच्या निर्णयावर मनमोहन सिंग यांची पुन्हा एकदा टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचं मोठेपणानं कबूल करावं आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्उभारणीसाठी जनतेचा पाठिंबा मागावा, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीचा हा दिवस सरकारकडून 'काळा पैसा विरोधी दिन' म्हणून साजरा करण्यात येईल.

तर विरोधकांकडून ८ नोव्हेंबरला देशभरात 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर 'ब्लुमबर्ग क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी पुन्हा एकदा भाष्य केलं.

"नोटाबंदीचं राजकारण आता पुरं झालं, असं मला प्रकर्षानं वाटतं. नोटाबंदीचा निर्णय हा खूप मोठा घोळ होता, हे पंतप्रधानांनी मान्य करायची हीच वेळ आहे", असं मनमोहन सिंग म्हणाले.

"नोटाबंदीचा विपरीत परिणाम विविध स्तरांवर झाला. याचा सगळ्यात मोठा फटका समाजातील निम्न स्तराला बसला. केवळ एखादा आर्थिक निर्देशांक पाहून या परिस्थितीची कल्पना येणार नाही.

नोटाबंदीमुळे आर्थिक धोरणांचे खूप मोठे नुकसान झाल्याचं सिद्ध झालं आहे", असंही मनमोहन सिंग म्हटलं.

सीतारामन यांच्या भेटीवर चीनची प्रतिक्रिया

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागास भेट दिल्यामुळं चीननं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images/ISHARA S.KODIKARA

फोटो कॅप्शन,

निर्मला सीतारामन

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, हा भाग वादग्रस्त असल्यानं तिथं सीतारामन यांची भेट शांतता व सलोख्याच्या दृष्टीनं योग्य नाही, असं चीननं म्हटलं आहे.

संरक्षणंत्री झाल्यानंतर सीतारामन रविवारी प्रथमच अरुणाचल प्रदेशला गेल्या. त्यांनी चीन सीमेला लागून असलेल्या अंजॉ जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या चौकींना भेट दिली होती.

चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या बीजिंगमध्ये झालेल्या वार्तालापात मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सोमवारी सीतारामन यांच्या भेटीवर आक्षेप नोंदविला.

खासगी क्षेत्रातही आरक्षण असावं- नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी खासगी क्षेत्रातही आरक्षणपद्धत लागू करण्याविषयी देशस्तरावर चर्चा व्हायला हवी, असं मत मांडलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नितीश कुमार

"हे माझं वैयक्तिक मत आहे की, खाजगी क्षेत्रातही आरक्षण पद्धत लागू असावी. खासगी क्षेत्रात आरक्षण असावं की नसावं हा निर्णय सर्वस्वी संसदेचा आहे. पण यावर सखोल चर्चा व्हायला हवी," असं मतं त्यांनी मांडलं.

तांत्रिक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळं बिहारमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काम आऊटसोर्स (कंत्राटी पद्धतीनं काम करून घेणं) केलं जात आहे.

त्यात आरक्षण असावं, असा निर्णय बिहार सरकारनं घेतला होता. त्याला विरोध झाल्यामुळं नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे आगामी पंतप्रधान

"शरद पवार हे आगामी पंतप्रधान होऊ शकतात," असं भाकित राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कर्जत इथं सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. "2019 हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं वर्ष असेल. सध्याचं बदलतं राजकारण पाहता पवारांबद्दल आपल्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते."

फोटो स्रोत, Getty Images/Matthew Lewis

फोटो कॅप्शन,

शरद पवार

"मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागलं पाहिजे. देशाच्या राजकारणात शरद पवार या नावाचा दबदबा आहे.

त्यांच्या शब्दाला वजन आहे. पंतप्रधानही सभागृहात त्यांच्या शब्दाला मान देतात," असं पटेल यांनी सांगितलं.

भाजप सरकारला पटोलेंकडून घरचा आहेर

राज्यात आणि केंद्रात असलेलं भाजप सरकार आंधळं आणि बहिरं आहे असं म्हणत भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर टीका केली.

लोकसत्तात आलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पांचाळ समाजाच्या महाअधिवेशनासाठी नाना पटोले कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"माझ्यावर पक्षाला जी कारवाई करायची आहे ती करू देत, चुका झाल्यावर मी बोलणारच," असेही नाना पटोले म्हटले.

"राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील हेच समजत नाही," अशी टीकाही पटोले यांनी केली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)