सचिन तेंडुलकर: 'देव' रिटायर झाल्यानंतरचं भारतीय क्रिकेट

  • विनायक गायकवाड
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

क्रिकेटवेड्या भारतात सचिन तेंडुलकरला त्याचे फॅन्स देव मानतात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. आपली जुनी इमेज झुगारून टाकत नव्या दमाच्या या टीम इंडियानं क्रिकेट जगतामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

16 नोव्हेंबर 2013... क्रिकेटवेड्या फॅन्सनं खचाखच भरलेलं वानखेडे स्टेडियम आणि 'सचिन... सचिन...'चा तो नारा... 200 वी टेस्ट मॅच... शेवटची इनिंग आणि कोणालाही नको असलेला तो एक क्षण...

वानखेडेच्या ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवरुन उतरणारा तो तरुण, 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा करणार होता. सचिननं ग्राऊंडवर पाऊल ठेवलं आणि काळजाचा ठोका चुकला.

या इनिंगनंतर तो पुन्हा कधीही खेळताना दिसणार नव्हता. आणि म्हणूनच अनेकांच्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा तो एक दिवस होता.

फोटो कॅप्शन,

24 वर्षांच्या प्रदिर्घ कारकिर्दीनंतर सचिननं निवृत्तीची घोषणा केली.

निवृत्तीनंतर बीबीसीशी बोलताना सचिनही तो क्षण पुन्हा जगला आणि आपल्या भविष्यातील प्लॅन्सवरही त्यानं प्रकाश टाकला होता.

"गेली 24 वर्षं माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. मला फक्त क्रिकेट खेळायचं होतं आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यायचा होता. आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आहे."

"माझ्या करिअरमध्ये ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आता त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे."

सचिनच्या निवृत्तीला आज चार वर्षं उलटली आहेत. पण तरीही भारतातील प्रत्येक मॅचमध्ये 'सचिन... सचिन...'चा जयघोष ऐकायला मिळतोच. म्हणूनच मनात सहज विचार आला की, गेल्या 4 वर्षांत भारतीय क्रिकेट बददलं आहे का?

सचिन : एक स्वप्न

या प्रश्नाचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही. अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण या महान क्रिकेटरवर, त्याच्या करिअरवर आणि त्यानंतरच्या भारतीय क्रिकेटवर बोलायला अनेकांनी नकार दिला.

असं म्हणतात, 'क्रिकेट ज्यांचा धर्म आहे. सचिन त्यांचा देव आहे'. 90 च्या दशकात बदलत्या भारतासाठी तो आशेचा किरण होता. भारताच्या टेलिव्हिजन जनरेशनचा तो पहिला सुपरस्टार होता.

जशी भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली तसे भारतीय समाजात, भारतीयांच्या विचारात, राहणीमानात अनेक बदल होत गेले. तरुण पिढीच्या आकांक्षा वाढल्या, कक्षा रुंदावल्या आणि आपल्या खेळानं, आपल्या वागण्यानं याच तरुण पिढीचा सचिन आदर्श बनला.

फोटो कॅप्शन,

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक भारतीयानं सचिनवर भरभरून प्रेम केलं.

या पिढीला त्यानं स्वप्न बघायला शिकवलं होतं. या पिढीला त्यानं स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं होतं. आणि याच गोड स्वप्नात गेली 24 वर्षं भारतानं सचिनवर अव्याहत प्रेम केलं.

पण सचिनच्या निवृत्तीनंतर 'आता काय' आणि 'आता कोण' हा विचार करण्याची वेळ आली होती.

गेली चार वर्षं भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता. टेस्ट आणि वन डेमध्ये टीम इंडियानं आपला दबदबा निर्माण केला. एक नव्या दमाची टीम इंडिया याच काळात उदयाला आली.

खरं तर याची सुरुवात झाली ती 2007मध्ये. टी-20 क्रिकेटच्या उदयामुळे क्रिकेटची गणितं बदलली. टी-20 च्या या नव्या फॉरमॅटनं फॅन्सनाही भुरळ घातली. पण हा फॉरमॅट तितकाच चॅलेंजिंग होता.

निवृत्तीचा काळ

सेहवागचा अपवाद वगळता सचिन, सौरव, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे या भारतीय क्रिकेटच्या बिग फाईव्हनं टी-20 पासून दूर राहणंच पसंत केलं.

2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणी विचारही केला नव्हता, पण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

जुन्या टीमनं कात टाकली होती आणि यंग टीम इंडियाचा उदय झाला होता. तरुण भारतीयांना त्यांचे नवे हिरो मिळाले होते.

फोटो कॅप्शन,

2008 पासून भारतीय क्रिकेटच्या बिग फाईव्हचं निवृत्तीसत्र सुरू झालं.

2008 ते 2013 हा भारतीय क्रिकेटसाठी निवृत्तीचा काळ होता. सौरव गांगुली आणि अनिल कुंबळेनं 2008 मध्ये, द्रविड आणि लक्ष्मणनं 2012 मध्ये तर सेहवागनं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

पण बदलत्या खेळाची गणितं लक्षात घेऊन सचिन नॉनस्टॉप खेळत आला होता. टी-20 न खेळण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर 2012 मध्ये त्यानं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचनंतर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

पण या नव्या टीम इंडियानं या निवृत्तीसत्राचा धसका घेतला नाही. कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच राहिली.

टीम इंडियाचा विजयी रथ

पण ऑस्ट्रेलिया आणि विंडीजविरुद्धच्या विजयानंतर मात्र भारताच्या विजयी घोडदौडीला लगाम लागला. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. घरच्या खेळपट्टीवर दादा असलेल्या भारतीय टीमला परदेशात खेळता येत नसल्याची नेहमीचीच जहरी टीकाही टीम इंडियाला सहन करावी लागली.

पण 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये याच यंग टीम इंडियानं टीकाकारांची तोंडं बंद केली. फायनलमध्ये यजमान इंग्लंडचाच पराभव करत भारतानं आणखी एक आयसीसी चॅम्पियनशिप पटकावली.

यानंतर वेस्ट इंडीज आणि बांगलादेशमध्येही भारतानं विजय पटकावले. पण 2014 चं वर्ष भारतासाठी तितकं चांगलं गेलं नाही. आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव करत श्रीलंकेनं 2011 च्या वर्ल्ड कप पराभवाचा वचपा काढला.

फोटो कॅप्शन,

महेंद्रसिंग धोणीने कर्णदारपद सोडल्यावर विराट कोहलीने ही धुरा समर्थपणे उचलली आहे.

पण ही टीम इंडिया वेगळी होती. पराभवानं खचून जाणं हे मुळी त्यांना माहितच नव्हतं. आता या टीमकडे एक आक्रमकपणा आला होता. विजय आणि पराभवची चिंता न करता ही टीम प्रत्येक मॅचकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघत होती.

यामुळेच मायदेशातील सीरिजमध्ये लंका आणि विंडीजचा पराभव करत भारतानं वर्ल्ड नंबर वन स्थानाला गवसणी घातली.

पण हे यश टीम पचवत असतानाच 2 टेस्ट पराभवानंतर ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये कॅप्टन धोणीनं अचानक निवृत्ती घेतली. आणि जन्म झाला तो, भारताचा नवा कॅप्टन; विराट कोहलीचा.

यंग ब्रिगेडचा उदय

2007 च्या टी-20 वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर आणि भारताचे माजी क्रिकेटर लालचंद राजपूत यांच्यामते जुन्या पिढीतून नव्या पिढीचं ट्रान्झिशन अगदी शांतपणे आणि सोपं झालं. राजपूत सांगतात, "यात महत्त्वाचा वाटा आहे तो आयपीएलचा. आयपीएलनं नव्या खेळाडूंना विश्वास दिला. त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला आणि म्हणूनच एक परिपूर्ण भारतीय टीम तयार व्हायला मदत झाली."

2014 मध्ये विराट कोहलीचा एका मोठ्या पडद्यावर उदय झाला. आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपमधील तुफान कामगिरीनंतर टेस्टमध्ये कोहलीच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडली होती.

2015 ते जानेवारी 2017 दरम्यान तर भारतानं खऱ्या अर्थानं कमाल केली. 2015 च्या सुरुवातील दक्षिण आफ्रिकेचा टेस्ट सीरिजमध्ये पराभव करत भारतानं मायदेशात सलग 19 टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला.

टीम इंडियाच्या या तुफान कामगिरीमुळे क्रिकेटवेड्या भारतीयांना विचार करायला वेळंच दिला नाही. एक अशी टीम जन्माला आली होती ज्यातील प्रत्येक खेळाडू दमदार होता.

या टीममध्ये बिग फाईव्ह नव्हते. या टीममध्ये त्यांचा लाडका सचिन नव्हता. पण तरीही ही टीम कमाल करत होती.

फोटो कॅप्शन,

जिंकण्याची सवय झालेली नव्या दमाची टीम इंडिया

भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा भारताची संपूर्ण भिस्त बॅटिंगवर होती. पण आता या यंग टीम इंडियानं आपले नवे नियम लिहिले.

सध्याच्या टीम इंडियामध्ये एक वेगळा बॅलन्स बघायला मिळतो. या भारतीय टीमच्या बॅटिंगला धार आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट केहली, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोणीसारखे दादा बॅट्समन बॅटिंगची मदार सांभाळत आहेत.

हार्दिक पांड्यासारखा कशाचीही भीती न बाळगणारा ऑलराऊंडर टीमला मिळाला आहे. अश्विन-जडेजासारखी स्पिनची अभेद्य जोडगोळी आहे; तर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव, जसप्रित बुमराहसारखे फास्ट बॉलर्स आहेत.

अनेक काळानंतर टीमची बेंचस्ट्रेंथही तितकीच तगडी आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अनेक वर्षांनंतर भारतीय क्रिकेट फॅन्सना एक परिपूर्ण टीम इंडिया मिळाली आहे.

सचिन आणि कोहलीची तुलना

रेकॉर्ड्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अगदी आपोआप उभा राहतो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. टेस्ट असो वा वन डे जवळपास सगळे मोठे रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत.

पण आता कोहली नावाचं वादळ या रेकॉर्ड्सना चॅलेंज करतंय. खरं तर 2014 नंतर विराट कोहलीनं मागे वळून पाहिलंच नाही आहे. त्याचा अंदाज, त्याचा फॉर्म, प्रत्येक मॅचकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन यामुळे कोहली नेहमीच वेगळा ठरलाय.

आपल्या याच दमदार कामगिरीच्या जोरावर त्यानं वन-डे आणि टी-20 रँकिंगमध्ये अधिराज्यही गाजवलं आहे.

विराट कोहली ज्या पद्धतीनं रन्सचा डोंगर उभा करतो किंवा ज्या वेगानं सेंच्युरी ठोकतो त्या वेगानं तो सचिनचे रेकॉर्ड मोडू शकतो अशी आशा तज्ज्ञांना वाटते.

फोटो कॅप्शन,

विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडेल का, ही चर्चा नेहमीच असते.

लालचंद राजपूत म्हणतात, "विराट हा असा खेळाडू आहे की जो आकडे बघत नाही. प्रत्येक मॅचला तो महत्त्व देतो. भविष्यात जर त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि त्याचा फॉर्म असाच राहिला तर तो सचिनचे रेकॉर्ड मोडू शकतो यात शंका नाही."

जर इनिंगचा विचार केला तर 345 इनिंगमध्ये कोहलीनं सचिनला रन्स आणि अॅव्हरेजच्याबाबतीत मागे टाकलंय. तर वन डेमध्ये 32 सेंच्युरी ठोकत तो आता सर्वाधिक सेंच्युरीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय.

पण सचिन आणि कोहलीची तुलना करणं योग्य नसल्याचंही लालचंद राजपूत सांगतात.

नवी उमेद, नवी दिशा...

जसा काळ बदलला तसं भारतीय क्रिकेटही बदललं. 1971 मध्ये अजित वाडेकरांच्या टीम इंडियानं परदेशात पहिला सीरिज विजय मिळवला आणि आपणही जिंकू शकतो ही आशा निर्माण केली.

1983 साली कपिल देवच्या टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकत भारतीय तरुणांना सवप्न बघायला शिकवलं.

2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकत या स्वप्नांना गवसणी घालण्याची ताकद दिली.

फोटो कॅप्शन,

टीम इंडिया

तर विराट कोहलीच्या या यंग आणि निर्भिड टीम इंडियानं तरुण पिढीला कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं आणि कधीही हार न मानणं शिकवलंय.

गेल्या 4 वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल झालेत. या टीम इंडियाकडे आक्रमकपणा आहे. या टीम इंडियाकडे टेक्निक आहे. या टीम इंडियाकडे वर्चस्व राखण्याचा आत्मविश्वास आहे.

भारतीय टीमचा हा चढता आलेख बघता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही नव्या दमाची नवी टीम त्यांनी निर्माण केलेलं हे वेगळं स्थान टिकवून ठेवेल यात शंका नाही.

(हा लेख प्रथम 16 नोव्हेंबर 2017 रोजी प्रकाशित झाला होता.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)