प्रेस रिव्ह्यू: सांगलीत पोलिसांनीच जाळला आरोपीचा मृतदेह

प्रातिनिधिक छायाचित्र Image copyright GETTY IMAGES/INDRANIL MUKHERJEE
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

पोलिसांनी चौकशीदरम्यान केलेल्या बेदम मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

'लोकसत्ता'नं दिलेल्या वृत्तानुसार, सांगली इथं ही घटना घडली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय 26) आणि अमोल भंडारी (वय 23) या तरुणांना अटक केली होती. या दोघांनाही दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार युवराज कामटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री चौकशीदरम्यान केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह खाजगी गाडीतून आंबोली घाटात नेला. तिथं पेट्रोल डिझेल ओतून मृतदेह जाळला.

उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी पोलीस कोठडीची तपासणी केली असता त्यांना या प्रकरणाचा संशय आला. या प्रकरणात कामटे यांच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

प्रद्युम्नची हत्या अकरावीच्या विद्यार्थ्यानं केली

हरयाणातील रेयान इंटरनॅशनल शाळेत दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात त्याच शाळेत शिकणाऱ्या एका अकरावीच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

प्रतिमा मथळा रेयान इंटरनॅशल स्कूल, गुरूग्राम

'द इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीनुसार, गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूरची (वय ७ वर्ष) सप्टेंबरमध्ये शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आली होती. शाळेच्या शौचालयात प्रद्युम्नचा मृतदेह सापडला.

या प्रकरणात शाळेच्या बस कंडक्टरला आधी ताब्यात घेण्यात आलं होतं. या कंडक्टरनं गुन्हा कबूल केल्याचंही पोलिसांनी सांगितलं होतं.

पण सीबीआयनं केलेल्या चौकशीत आरोपी वेगळाच निघाला. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं परीक्षा आणि पालक सभा रद्द व्हावी, यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचं सीबीआयच्या तपासातून उघड झालं आहे. प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असंही सीबीआयनं स्पष्ट केलं.

प्रद्युम्नच्या कुटुंबियांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. वाढत्या दबावामुळे हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं.

विमा पॉलिसीशी आधार जोडणं बंधनकारक

मनी लाँडरिंग नियम 2017नुसार, विमा पॉलिसीही आधार क्रमांकाशी जोडणं अनिवार्य असल्याचं विमा नियामक 'आयआरडीएआय'नं म्हटलं आहे.

Image copyright GETTY IAMGES/NOAH SEELAM
प्रतिमा मथळा विमा पॉलिसीला आधार क्रमांक जोडणं अनिवार्य

'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार, विमा नियामक IRDAI नं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. विमा पॉलिसीशी आधार जोडणं बंधनकारक आहे. तसं विमा कंपन्यांना सांगण्यात आलेलं होतं.

या नियमाच्याआधारेच विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांचा आधार क्रमांक पॉलिसीशी जोडायचा आहे. पुढील आदेशांची वाट न बघता कंपन्यांनी त्याची अमंलबजावणी करावी असं IRDAI नं म्हटलं आहे.

आज मतदान, 40 दिवसांनी निकाल

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. गुरूवारी मतदान होणार असलं तरी निकाल हाती यायला 40 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Image copyright GETTY IMAGES/STRDEL
प्रतिमा मथळा हिमाचल प्रदेशात आज मतदान होत आहे.

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, विद्यमान मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून ते आठव्यांदा निवडणुकांना सामोरं जात आहेत.

सिंग यांनी याआधीच ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं आहे. विरभद्र सिंग यांच्या नंतर त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग हे कारभार सांभाळतील. ते सध्या वडिलांच्याच सिमला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

मुंबईचा पाचशेवा रणजी सामना

क्रिकेटची समृद्ध परंपरा लाभलेला मुंबई रणजी संघ गुरुवारपासून आपला पाचशेवा रणजी सामना खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईची गाठ पडणार आहे ती बडोदा संघाशी.

Image copyright GETTY IMAGES/Michael Steele
प्रतिमा मथळा मुंबईचं क्रिकेट प्रेम नेहमी कौतुकाचा विषय ठरला आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत वृत्त दिलं आहे. विजय मर्चंट, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर हे तिघं म्हणजे क्रिकेटमधील तीन युगं अन् त्यांच्यातील एक साम्य म्हणजे मुंबई. हे तिघंही मुंबईचे.

1962-63 मध्ये मुंबईचा 100वा सामना झाला.

1978-79मध्ये 200 वा सामना झाला. तर 1993-94 मध्ये 300 वा आणि 2006-07 मध्ये 400 वा सामना मुंबईनं खेळला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)