एक्सक्लुझिव्ह : या 7 प्रश्नांवर काय बोलले गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी

गुजरातमध्ये 9 डिसेंबरला मतदान होतं आहे. या रणधुमाळीत भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची बीबीसी गुजरातीचे एडिटर अंकुर जैन यांनी घेतलेली ही मुलाखत.

प्रश्न1:तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री आहात पण सगळी सत्ता तर केंद्राकडेच आहे, नाही का?

उत्तर : गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. मग केंद्र सरकार आम्हाला मार्गदर्शन करत असेल तर त्यात गैर काय आहे?

प्रश्न2:गुजरातमध्ये 'विकास वेडा झालाय' यासारखी मोहीम सोशल मीडियावर चालवली गेली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ?

उत्तर : असे सोशल ट्रेंड्स काँग्रेसनेच सुरू केले. सोशल मीडियावर अशा पद्धतीने काँग्रेसची पेड आर्मी कांगावा करत आहे. आमच्याविरुद्धचं हे षड्यंत्र आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तरुण नेत्यांना गळाला लावून राहुल गांधी विजयी होतील का ? हा प्रश्नच आहे.

रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून सरकारवर टीका होते. रस्त्यावर खड्डे आहेत कारण आम्ही रस्ते बनवलेत.

काँग्रेसने रस्तेच बनवले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर खड्ड्यांवरून टीका होत नाही.

प्रश्न3:राहुल गांधींनी गुजरातमधल्या बेरोजगारीचे आकडे दिले आहेत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

उत्तर :राहुल गांधी चुकीची आकडेवारी देत आहेत. त्याला कोणताही आधार नाही. रोजगारामध्ये गुजरात गेल्या 14 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. 72 हजार जणांना आम्ही नोकऱ्या दिल्या आहेत.

प्रतिमा मथळा जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल

प्रश्न4:भाजपला पाटीदार समाजातून एवढा विरोध का होत आहे ?

उत्तर : पाटीदार समाज अजिबात भाजपच्या विरोधात नाही. त्यांच्या चारही मागण्या ऐकून घेतल्या गेल्या आहेत. आम्ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही.

प्रश्न 5:जर पाटीदार भाजपच्या सोबत आहेत तर मग हार्दिक पटेलच्या सभांना एवढी गर्दी का होते ?

उत्तर : हे पाटीदार समाजाचे लोक नाहीत. या खरंतर काँग्रेसच्या सभा आहेत. स्टेजवर काँग्रेसचे प्रतिनिधी बघायला मिळतात आणि एखाद्याने जरी मोठमोठ्या सभा घेतल्या तरी तो निवडणुका जिंकेल, असा याचा अर्थ होत नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गुजरातची निवडणूक अमित शहांसाठी प्रतिष्ठेची आहे.

प्रश्न 6:तुम्ही विद्यार्थ्यांच्या राजकीय चळवळीतून आला आहात. तुम्हाला हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेशच्या राजकारणात सक्रिय होण्याबदद्ल काय वाटतं ?

उत्तर : हे अजिबात चांगलं नाही. आम्ही नीतिमत्ता असलेलं राजकारण केलं आणि अजूनही करत आहोत.

मतदारांना जातीच्या आधारावर एकत्र आणणं हे काही चांगल्या राजकारणाचं उदाहरण नाही. आणि हे सगळे जण काँग्रेसचे बाहुले आहेत.

जातीच्या आधारावर लोकांना विभागून ते देशालाच दुबळं बनवत आहेत. असे नेते नागरिकांची फसवणूक करत असतात.

हे तिघेजण त्यांना निवडणूक जिंकून देतील हा काँग्रेसचा भ्रम आहे.

प्रश्न 7:तुम्ही दलितांशी संवाद का साधत नाही ?

उत्तर : जिग्नेश खरंच दलितांचं प्रतिनिधित्व करतो का? उनाच्या घटनेला सहा महिने उलटून गेले. किती दलितांनी याविरोधात निदर्शनं केली?

या घटनेनंतरही भाजपने निवडणुका जिंकल्या. समधियाळामध्येही आम्ही निवडणूक जिंकली आहे.

भाजपात जाण्यापेक्षा आमहत्या करीन : जिग्नेश मेवाणी

Image copyright Raza Haidar
प्रतिमा मथळा दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दलितांच्या जमिनीच्या हक्कांसाठी आंदोलन केलं.

गुजरातमधले दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दलितांसाठी केलेलं आंदोलन यशस्वी झालं. तरीही ते गुजरात सरकारवर नाराज आहेत. त्यांच्यासोबत साबरमती नदीच्या काठावर केलेल्या 'फेसबुक लाइव्ह' मधला हा काही भाग.

प्रश्न : तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहात की नाही?

उत्तर : मी कोणत्याही पक्षाशी स्वत:ला जोडू इच्छित नाही. मला भाजपचं सरकार उलथवून लावायचं आहे.

प्रश्न : तुम्ही संघ आणि भाजपला का विरोध करता?

उत्तर : संघ आणि भाजप फॅसिस्ट प्रवृत्तीचे आहेत. ते हिटलर आणि मुसोलिनीला आपला प्रेरणास्रोत मानतात. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, शंतनू भौमिक आणि गौरी लंकेश यांची खुलेआम हत्या करण्यात आली.

अशा घटना भविष्यातही होऊ शकतात. हे थांबवायचं असेल तर भाजपला सत्तेवरून हटवायला हवं.

प्रश्न : तुम्ही गुजरातमधल्या दलितांना जमीन मिळवून देण्यासाठी आंदोलन केलं ते यशस्वी झालं. तरीही तुम्ही सरकारवर का नाराज आहात ?

उत्तर : गुजरातमध्ये अजूनही 48 हजार एकर जमीन दलितांच्या ताब्यात आलेली नाही. सरकारची इच्छा असेल तर ते देऊ शकतात.

दलितांना त्यांच्या जमिनीवरचा हक्क मिळवून देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना जमिनी दिल्या गेल्या नाहीत.

आमच्याकडे जमीन आली तर आम्हाला गटारात उतरावं लागणार नाही आणि मृत जनावरं उचलण्याचं कामही करावं लागणार नाही.

प्रश्न : तुम्हाला भाजपने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तर तुम्ही भाजपमध्ये जाल का?

उत्तर : मी साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या करेन पण भाजपमध्ये जाणार नाही.

भाजप रेटून खोटं बोलतं : हार्दिक पटेल

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा या निवडणुकीत अजूनही हार्दिक पटेल यांची भूमिका अस्पष्ट आहे.

प्रश्न : गुजरातमध्ये भाजपचं काय चुकतं, असं तुम्हाला वाटतं?

उत्तर : भाजपचे नेते खोटं बोलतात. खोटं बोला पण रेटून बोला अशी त्यांची पद्धत आहे. त्यांनी लोकांना जी वचनं दिली होती ती पूर्ण केली नाहीत आणि आमची लढाई याविरुद्धच आहे.

प्रश्न :नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये तुम्ही कोणाला किती गुण द्याल?

उत्तर : कामाच्या बाबतीत की खोटं बोलण्याच्या बाबतीत? कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेसने या देशावर 60 वर्षं राज्य केलं आहे.

राहुल गांधींनी देशासाठी त्यांची आजी आणि वडिलांना गमावलं आहे पण खरंतर मी यापैकी कुणाचीही निवड करणार नाही.

'मी काँग्रेसची म्हणजे संघर्षाची वाट निवडली' : अल्पेश ठाकोर

प्रतिमा मथळा अल्पेश ठाकोर हे गुजरातमधले ओबीसी नेते आहेत.

प्रश्न : तुमचा आधीपासूनच काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार होता का?

उत्तर : मला भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून ऑफर होती. पण मी काँग्रेसमध्ये गेलो कारण माझी आणि त्यांची विचारसरणी सारखी आहे.

एकीकडे भाजपसारखं सोन्याचं ताट होतं आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणजे संघर्ष होता. मी संघर्षाची वाट निवडली.

राहुल गांधी एक निष्ठावान नेते आहेत. काँग्रेसमध्ये जाण्याचा माझा कोणताही इरादा नव्हता पण त्यांनी माझ्या अटी मान्य केल्या.

प्रश्न : पाटीदार समाजाच्या आंदोलनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ? त्यांच्या आरक्षणाच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं ?

उत्तर : मी पाटीदारांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. मी कोणत्याही एका जातीचा नेता नाही. गुजरातमध्ये विकास झालेला नाही.

पाटीदारांना आंदोलन करावं लागतं हा त्याचाच पुरावा आहे. आर्थिक उत्पन्नाच्या आधारे आरक्षण मिळण्याच्या शक्यतेवर आपण विचार करायला हवा.

प्रश्न : तुम्ही काँग्रसमध्ये कोणत्या मुद्द्यांवर राजकारण करणार आहात?

उत्तर : लोक व्यसनमुक्त व्हावेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांनी चांगलं आयुष्य जगावं हे माझं ध्येय आहे.

गुजरात सरकारचा असा दावा आहे की गुजरातमध्ये सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे.

बेकारी आणि गरिबी तुम्ही इथल्या रस्त्यांवर बघू शकता. मी या निवडणुकीत हे मुद्दे उचलून धरतो आहे.

(जिग्नेश आणि हार्दिक यांच्या मुलाखती रॉक्सी गागडेकर छारा यांनी घेतल्या तर अल्पेश यांची मुलाखत विजयसिंह परामर यांनी घेतली.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)