पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी कोकणातल्या या गावातून गेले होते 52 सैनिक

  • एम. खान
  • बीबीसी मराठीसाठी
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ - तरंदळे गावातील 52 शूरवीरांचा पहिल्या महायुद्धात सहभाग

पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी कोकणातल्या एका गावातून 52 सैनिक गेले होते. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा स्तंभ तरंदळे गावात आजही उभा आहे.

कोकणातल्या ग्रामीण भागातल्या सैनिकांनी पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवला होता. त्यांच्या या पराक्रमाची साक्ष देत कोकणात हा विजयस्तंभ दिमाखात उभा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तरंदळे गाव. पहिल्या महायुद्धाचे ढग जगभर दाटले होते, तेव्हा या छोट्याशा तरंदळे गावात भाऊ नारायण सावंत हे पोलिस पाटील म्हणून काम करत होते.

फोटो स्रोत, M. Khan/BBC

फोटो कॅप्शन,

पहिल्या महायुद्धात लढलेल्या सैनिकांची स्मृती जपणारा विजयस्तंभ

त्या काळात पोलीस पाटलांचा रुबाब मोठा असे. पहिल्या महायुद्धाचा भडका उडाल्यानंतर तेव्हाच्या इंग्रज सरकारने भाऊ नारायण सावंत यांच्यावर एक जबाबदारी सोपवली.

भाऊ सावंत यांना तरंदळेमधून पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी सैनिक पाठवायचे होते. दर दिवशी घोड्यावरून गस्त घालत असल्यामुळे गावाची इत्यंभूत महिती पोलीस पाटलांना असे. भाऊंनी गावचा सगळा आढावा घेऊन 52 सैनिकांची निवड केली.

तरंदळेचे हे 52 शूर वीर पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. यापैकी दोन सैनिकांना वीरमरण आलं, तर 50 सैनिक गावात सुखरूप परतले. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी कणकवलीजवळच्या या गावात हे स्मारक उभारलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरंदळे गावच्या मधोमध मुख्य रस्त्याला लागून हे स्मारक आणि हा विजयस्तंभ दिमाखात उभा आहे.

फोटो स्रोत, M. Khan/BBC

फोटो कॅप्शन,

तरंदळे गावातील विजयस्तंभावर संगमरवरात कोरलेला संदेश

या स्मारकावर संगमरवराच्या दगडात इंग्रजी भाषेत कोरलेला संदेशही आहे.

"तरंदळे, या गावातले 52 सैनिक 1914 ते 1919 या काळात महायुद्धामध्ये लढले आणि दोन सैनिकांनी प्राणांची आहुती दिली." असं या संदेशात म्हटलं आहे.

1914 ते 1918 पर्यंत चाललेल्या या महायुद्धात तरंदळे गावातल्या सैनिकांनी स्वतःला झोकून दिलं होतं. या युद्धात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. या सैनिकांपैकी हरिशचंद्र सुकटोजी कदम आणि रूकवाजी गावकर यांना निकराच्या लढाईत वीरमरण आलं.

या युद्धामध्ये सहभागी झालेल्या 52 लोकांची यादी खरं तर प्रशासनाने जाहीर करणं आवश्यक होतं. त्याचं जतनही व्हायला हवं होतं. पण याची कोणतीही नोंद नसल्यामुळे हे 52 सैनिक कोण होते, कोणत्या कुटुंबातले होते हे काहीही कळू शकत नाही.

फोटो स्रोत, M. Khan/BBC

फोटो कॅप्शन,

भाऊ सावंत यांचे नातू अशोक सावंत यांनी ब्रिटिशांनी दिलेली तलवार जपून ठेवली आहे.

तरंदळेतून सैनिक धाडणारे पोलीस पाटील भाऊ नारायण सावंत यांचा मात्र ब्रिटिश सरकारने विशेष गौरव केला होता.

भाऊ सावंत यांचा गौरव

सध्याच्या देवगड इथल्या एस. टी. स्टँडच्या शेजारची 52 एकर जागा त्यांना सरकारने इनाम म्हणून दिली होती. पण भाऊंकडे स्वतःची जमीन होती त्यामुळे त्यांनी ही जमीन नाकारली.

"माझ्या पुढच्या पिढ्यांना स्फूर्ती देत राहतील अशा काही गोष्टी मला पुरवण्यात याव्यात," असं त्यांनी सरकारला सांगितलं.

मग सरकारने त्यांना 14 एप्रिल 1919 रोजी सनद दिली. त्यासोबतच 2 बंदुका, 4 तलवारी, 2 गुप्त्या आणि एक ढालही त्यांना देण्यात आली. या तलवारींवर भाऊ नारायण सावंत यांचं नावही कोरलेलं आहे.

फोटो स्रोत, M. Khan

फोटो कॅप्शन,

भाऊ सावंत यांचं नाव कोरलेली तलवार

हा ऐतिहासिक ठेवा भाऊ सावंत यांचे नातू अशोक सावंत यांनी जपून ठेवला आहे.

"तुंबळ लढाईमध्ये हिंदुस्थानातील सैन्यांत नवीन शिपाई भरण्याच्या कामी जी मोठी कामगिरी केलेली आहे, ती मनात आणून व पसंतीची खूण म्हणून नेक नामदार कमांडर-इन-चीफ साहेब बहादूर यांच्या हुकुमाने ही सनद दिली आहे." असं या सनदेवर लिहिलं आहे.

फोटो स्रोत, M. Khan

फोटो कॅप्शन,

ब्रिटिशांनी भाऊ सावंत यांच्या सन्मानार्थ दिलेली सनद

भाऊ सावंत यांचे नातू अशोक सावंत यांनी त्यांना आलेली पत्रं जपून ठेवली आहेत. गेल्या काही वर्षांपासून पेटीत बंद असलेली ही पत्रं काढताना ते प्रचंड भावूक झाले होते.

काय आहे या पत्रांमध्ये ?

अतिशय जीर्ण झालेली ही पत्रं मोडी लिपीतली आहेत. पत्रांची ती जुनी पेटी आणि त्यामधून एक-एक पत्रं बाहेर काढून त्यांनी ती वाचण्याचा प्रयत्न केला.

यात काही मराठी आणि इंग्रजी भाषेतली पत्रंही आहेत. सरकारी आदेश, कचेऱ्यांशी संबंधित ही पत्रं आहेत. 'आंतरदेशीय, ईस्ट इंडिया' असं लिहिलेली पोस्ट कार्डंही यात आहेत.

"ही पत्रं लवकरच मोडी तज्ज्ञांकडे देऊन त्याचं लिप्यांतर करून घेणार आहोत", असं अशोक सावंत सांगतात.

फोटो स्रोत, M. Khan

फोटो कॅप्शन,

मोडी लिपीतल्या या पत्रांचं भाषांतर करणं गरजेचं आहे.

"तरंदळे गावातल्या या स्मारकालासुद्धा आता शंभर वर्षं पूर्ण होत आली आहेत. पण एवढ्या वर्षांत आमच्याकडे याबद्दल कुणीही विचारणा केली नाही," अशी खंत ते व्यक्त करतात.

असं असलं तरी तरंदळे गावच्या तरुणांनी या सैनिकांच्या शौर्याची आठवण जागती ठेवली आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि ऑगस्ट क्रांतीदिन यानिमित्ताने या स्मारकाची रंगरंगोटी करून त्याची फुलांनी सजावट केली जाते.

"आमच्या गावातल्या तरुण मुलांना सतत प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही ही इतिहासाची आठवण करून देतो" असं तरंदळेचा तरुण जितेंद्र सावंत सांगतो.

ब्रिटिश सरकारने जेव्हा या स्मारकाची उभारणी केली होती तेव्हा त्याला पोलादी सळयांचं कुंपण घातलं होतं. त्यानंतर लोखंडी साखळी टाकण्यात आली. कालांतराने तीही खराब झाली.

नाही चिरा, नाही पणती

ही स्थिती सुधारण्यासाठी गावातल्या तरुणांनी वर्गणी गोळा करून एक कुंपण घातलं. आता पुन्हा या कुंपणालाही तडे गेले आहेत. पण तरीही या विजयस्तंभाबद्दल गावकऱ्यांना अभिमान आहे.

फोटो स्रोत, M. Khan

फोटो कॅप्शन,

सिंधुदुर्गातील तरंदळे गावाचा ऐतिहासिक पर्यटनासाठी विकास व्हावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

गावातले ज्येष्ठ नागरिक पप्पी सावंत सांगतात, "या स्तंभाकडे बघताना माझ्यात स्फूर्ती संचारते आणि मनामध्ये आदरभावना निर्माण होते. या युद्धामध्ये जरी आमचे वडील किंवा वंशज प्रत्यक्षात नसले तरी माझ्या ज्या ग्रामस्थांनी मेहनत घेऊन गावाचं नाव उज्ज्वल केलं त्याचा मला अभिमान वाटतो."

"सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर या गावाचाही ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून विकास व्हायला हवा होता", असं पंचायत समितीचे सदस्य जी. ए. तांबे सांगतात.

"इथे इतिहासप्रेमी आणि पर्यटक येतील, असं काहीतरी करायला हवं. पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही" अशी तक्रारही ते करतात.

फोटो स्रोत, M. Khan

फोटो कॅप्शन,

तरंदळेमधला ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे.

जी. ए. तांबे म्हणतात, "तरंदळेसारखी अशी स्मारकं कोकणात जागोजागी पाहायला मिळतात. ही स्मारकं कोकणातील शूरवीरांच्या पराक्रमाची साक्ष देतात. पण या स्मारकांना गावाच्या पलीकडे जाऊन ओळख मिळवून देणं गरजेचं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)