आयुष केजरीवाल : परंपरांना छेद देणारा फॅशन डिझायनर

काळ्या रंगाची मॉडेल Image copyright Instagram/Ayush Kejriwal

"माणसं अनेक प्रकारची असतात. काळी, गोरी, सावळी, उंच, बुटकी, जाड आणि सडपातळ. मी फक्त त्यांच्यासाठी कपडे बनवायचं काम करतो," असं आयुष केजरीवाल सांगतो.

लंडनमध्ये राहून फॅशन डिझायनिंगचं काम करणारा हा तरुण आहे. आयुषनं डिझाइन केलेल्या देशी साड्या आणि लेहंगा सध्या लोकप्रिय होत आहेत. पण आयुषचं काम इतर डिझायनरपेक्षा वेगळं ठरतं ते त्याच्या वेगळ्या सौंदर्यदृष्टीमुळे.

इतर डिझाइनर जे काम करतात, तेच आयुषसुद्धा करतो. पण, त्यांचं काम इतरांपेक्षा खूप वेगळं आहे. तो सर्वसामान्यांना डोळ्यापुढे ठेवून कपडे डिझाईन करतो. त्याची डिझाईन्सच नाही तर मॉडेल्ससुद्धा चाकोरी मोडून सौंदर्याचे नवे मापदंड निर्माण करतात.

या 35 वर्षीय फॅशन डिझायनरनं बनवलेल्या कपड्यांवरुन असं वाटतं की, ते तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी बनवले आहेत. मॉ़डेल्स कुठल्याही घरात, गल्लीत सहज दिसू शकतील अशा असतात.

Image copyright Instagram/Ayush Kejriwal

आयुष त्याच्या मॉडेल्सना कृत्रिम रंगरंगोटी न करता त्यांच्यातलं सौंदर्य हेरतो. कोणतीही महिला असो... सावळी, सडपातळ, जाड किंवा बारिक.. कुणाच्याही चेहऱ्यावरील डाग फोटोशॉप वापरून पुसले जात नाहीत किंवा त्यांचा रंग उजळला जात नाही.

या महिलांना त्या जशा आहेत, तसंच दाखवलं जातं. काही वेळा आयुष त्यांचे हेच फोटो मार्केटिंगसाठीही वापरतो. त्यांच्या तरुण मुलीही असतात आणि वयस्क महिलासुद्धा.

"मी बनवलेल्या कपड्यांकडे बघून ते आपल्यासाठीच तयार करण्यात आले आहेत, असं लोकांना वाटायला हवं," आयुष सांगतो.

फॅशन डिझायनिंग का?

कोलकाता येथे लहानाचा मोठा झालेल्या आयुषला कपडे डिझाइन करण्याची आवड कशी निर्माण झाली? तर लहानपणापासूनच याची आवड होती, असं तो सांगतो.

Image copyright Instagram/Ayush Kejriwal

लहानपणी आयुष आईची साडी नेसून खेळ खेळत असे. तसंच बाहुल्यांचे कपडे शिवत असे. यातूनच त्याला रंगांबद्दल आवड निर्माण झाली.

"नंतर आईची नजर कमजोर झाल्यामुळे साडीला मॅच होईल असा ब्लाऊज तिला शिवता येत नसे. मग मी तिची मदत करायला लागलो आणि यात मला आवड निर्माण झाली," असं आयुष सांगतो.

विशेष म्हणजे आयुषकडे फॅशन डिझायनिंगची कोणतीही औपचारिक पदवी नाही.

अशी झाली सुरुवात

बेंगळुरूमध्ये बीबीए करत असताना मित्रांनी त्यांना फॅशन डिझायनिंग करण्याचा सल्ला दिला.

Image copyright Instagram/Ayush Kejriwal

त्यानंतर मग आयुषनं प्रयोग म्हणून चार-पाच साड्या डिझाइन करुन पाहिल्या. काही दिवसांतच त्या विकल्या गेल्या. तेव्हाच आपण या व्यवसायात यायला हवं, असं आयुषला वाटलं.

एकदा तर त्यानं हिजाब आणि साडी यांच्या एकत्रीकरणातून एक ड्रेस तयार केला. हा पोषाख इंटरनेटवर प्रचंड गाजला. काही लोकांनी याबद्दल तक्रारी सुद्धा केल्या.

आयुषनं हिजाब आणि साडीच्या एकत्रीकरणातून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण आयुषनं याकडं लक्ष दिलं नाही.

Image copyright Instagram/Ayush Kejriwal
प्रतिमा मथळा हिजाब आणि साडीच्या एकत्रीकरणातून तयार केलेला ड्रेस.

"मी डिझाइन केलेले कपडे वापरायचे असतील, तर तुम्हाला उदार दृष्टीकोन ठेवावा लागेल," असं त्यानं याबद्दल सोशल मीडियावर लिहिलं आहे.

काळ्या आणि सावळ्या रंगाच्या मॉडेल्सना निवडण्याबद्दल आयुष सांगतो,

"काही विशेष हेतू ठेवून मी असं केलं नव्हतं. पण यानंतर मला लोकांचे फोन यायला लागले. काळा आणि गोरा रंग हा एवढा मोठा मुद्दा आहे, हे मला तेव्हा कळालं."

"माझ्या कामातून समाजात काही सकारात्मकता निर्माण होत असेल, तर ती माझ्यासाठी आनंदाची बाब ठरेल," असं आयुष सांगतो.

कपड्यांबदद्ल काय सांगतो आयुष?

"मन प्रसन्न असलं की तुम्हाला सुंदर वाटायला लागतं. एखाद्या पद्धतीचे कपडे घातल्यानंतर किंवा छान तयार झाल्यानंतर जो आनंद मिळतो, तोच तुम्हाला सुंदर बनवतो," सौंदर्याविषयी विचारल्यावर आयुष असं मत व्यक्त करतो.

Image copyright INSTAGRAM/AYUSH KEJRIWAL

"कपड्यांकडे केवळ कपडे म्हणून बघायलं हवं. एखाद्या प्रमाणपत्रासारखं नव्हे." असं स्पष्ट मत तो कपड्यांबाबात असलेल्या परंपरागत दृष्टिकोनाबद्दल मांडतो.

"सलवार-कुर्ता घालणाऱ्या मुलीला 'बहेनजी' म्हणून संबोधणं आणि शॉर्ट् कपडे परिधान करणाऱ्या मुलींना 'मॉडर्न' समजणं मूर्खपणाचं लक्षण असतं. याप्रमाणेच साडी नेसलेली स्त्री म्हणजे सभ्य आणि शॉर्ट्स घालणारी स्त्री असभ्य, असं समजणंही चुकीचं आहे." आयुष पुढे सांगतो.

Image copyright Instagram /Ayush Kejriwal

टीकेला आयुष घाबरत नाही. पण, विनाकारण केलेली टीका त्याला सहनसुद्धा होत नाही.

"मी यापुढेही असंच काम करत राहणार आहे. ना माझ्या मॉडेल्स बदलतीत, ना माझा दृष्टिकोन," पुढील योजनांबद्दल विचारल्यावर आयुष परखडपणे बोलतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)