प्रेस रिव्ह्यू: या सरकारची लाज वाटते - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे Image copyright Twitter

"महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफी दिली. मी लाभार्थीची जाहिरातबाजी सुरू झाली. पण कर्जमाफी कुठं मिळाली? या सरकारची लाज वाटते," असं वक्तव्य महाराष्ट्र सरकारचा भाग असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचं वृत्त सामनानं दिलं आहे.

"शिवसेनेनं दबाव टाकून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली. पण, शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप काय पडलं?" असा सवाल उद्धाव यांनी विचारला आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप सरकारनं जीएसटीचा दर घटवल्याचं सामनाच्या अग्रलेखात लिहीण्यात आलं आहे. 'का झुकलात ते सांगा' या शिर्षकाखाली सामनातून मोदींना सवाल विचारण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर मोदींविरोधात अयोग्य भाषा वापरू नका - राहुल गांधी

"भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांसोबत आपले मतभेद आहेत. त्यांच्यावर काँग्रेस टीका करेल. पण ,त्यांचा आम्ही अनादर करणार नाही," असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचारसभेत म्हटल्यांचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

गुजरातमधील पालनपूर येथे प्रचारसभेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. पंतप्रधान हे देशाच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळं त्यांच्या पदाचा योग्य तो मान राखला जावा असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

"आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन केवळ काँग्रेसच्या विचारांचा प्रचार-प्रसार करा. पंतप्रधानांबाबत अयोग्य भाषेचा वापर करणं टाळा," असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

बोट उलटल्यामुळं 16 जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेशातील विजयवाडामध्ये कृष्णा नदीमध्ये बोट उलटल्यामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण बेपत्ता असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे. मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश आहे, असं वृत्त डेक्कन क्रोनिकलनं दिलं आहे.

एका धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांना घेऊन जात असताना ही मोटर बोट उलटली. सर्व मृत हे ओंगले वॉकर्स क्लबचे सदस्य होते असं पोलिसांनी सांगितलं.

कार्तिक मासानिमित्त संगमावर स्नान करण्यासाठी हे भाविक जात असताना ही घटना घडली. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारनं 8 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

इस्लामिक बॅंकेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार नाही - आरबीआय

इस्लामिक बॅंकेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा आपण करणार नसल्याचं भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीनं दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना आरबीआयनं हे स्पष्टीकरण दिलं असल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

सध्या बॅंकिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आणि बॅंकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. तसंच इस्लामिक बॅंकिंग पद्धत ही शरियावर आधारित आहे.

शरियानुसार व्याजानं कर्ज देणं निषिद्ध मानलं जातं. त्यामुळं इस्लामिक बॅंकेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार नसल्याची माहिती आरबीआयनं दिलं आहे.

सक्षम झाल्याशिवाय वेगळा विदर्भ नको- गडकरी

"विदर्भ सक्षम झाल्याशिवाय स्वतंत्र राज्य करणे योग्य होणार नाही," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा नेहमी मांडला आहे.

आपल्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत त्यांनी हे विधान केल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. "विदर्भात अनेक प्रकल्प सुरू आहेत त्यातून विदर्भ सक्षम होईल," असं ते नागपूर येथे एका कार्यक्रमात म्हणाले.

चित्रकूट पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

मध्यप्रदेशातील चित्रकूटमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भारतीय जनता पक्षातील उमेदवाराचा 14,000 मतांनी पराभव केल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

Image copyright DIBYANGSHU SARKAR/getty images

मध्यप्रदेशात ज्या भागांमध्ये काँग्रेस शक्तीशाली आहे त्या भागांपैकी एक भाग म्हणून चित्रकूट गणला जातो. "ही जागा आपणच जिंकू असा विश्वास काँग्रेसला होता," असं काँग्रेस नेत्यांनी या विजयानंतर म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)