जुही चावलाच्या सौदर्याची मोहिनी पन्नाशीतही कायम

जुही चावला Image copyright STR/ Getty images

असंख्य तरुणांच्या हद्याची धडकन असलेली जुहीने सोमवारी पन्नाशीची होत आहे. कोणत्याही सेलिब्रेटीचं पन्नाशीत पदार्पण ही अनोखी घटना नाही. अभिनेता असो वा अभिनेत्री, क्रिकेटर किंवा एखादा गायक, यांचं सुवर्णमहोत्सव म्हणजे त्यांच्या बरोबरीने भवतालाचं संक्रमण असतं.

बॉलीवूडमधल्या ऑल टाइम हिट चित्रपटांपैकी एक असलेला 'कयामत से कयामत तक' 1988 साली प्रदर्शित झाला आणि माझ्यासारखे असंख्य शालेय विद्यार्थी हरखून गेले. निरागस आणि गोड चेहऱ्याची जुही चावला आणि "चॉकलेट बॉय" आमीर खान यांच्या जोडीची मोहिनी झाली नसती तरच नवल.

1984 मध्ये 'मिस इंडिया' किताबासह जुहीचं रुपेरी दुनियेत आगमन झालं. यानंतर काही दिवसांतच तिने 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत बेस्ट नॅशनल कॉश्ट्यूमसाठीचा पुरस्कार पटकावला.

जुहीच्या पावलावर पाऊल ठेवत काही वर्षांतच ऐश्वर्या रायने 'मिस वर्ल्ड' तर सुश्मिता सेनने 'मिस युनिव्हर्स' किताबावर आपलं नाव कोरलं.

आणि जुहीपाठोपाठ त्यांनीही या चंदेरी दुनियेत आपली वाटचाल सुरू केली.

विविधांगी भूमिकांची मुहूर्तमेढ

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या हस्ते जुहीला एकदा सन्मानित करण्यात आलं होतं. 'मिस इंडिया'च्या किताबाची परिणती म्हणजे जुहीला 'सल्तनत' चित्रपटात भूमिका मिळाली. शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात जुहीला छोटीशी भूमिका मिळाली होती.

याच सुमारास ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा 'महाभारत' मालिकेसाठी कलाकारांची फौज निर्माण करत होते. पौराणिक ग्रंथावर आधारित या मालिकेने टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियतेचा शिखर गाठला. आणि या मालिकेनं केवळ लोकप्रियताच नव्हे तर व्यावहारिक यशही अनेक वर्षं संपादन केलं होतं.

या मालिकेतल्या द्रौपदीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी जुहीची निवड पक्की झाली होती. मात्र त्याच वेळी जुहीसमोर एक प्रस्ताव आला.

दिग्गज निर्माते नासिर हुसैन 'कयामत से कयामत' तक चित्रपटाची निर्मिती करणार होते. आताचा सुपरस्टार पण तेव्हा पोरसवदा असणारा आमीर खान मुख्य अभिनेता असणार होता.

आमीरची नायिका 'रश्मी'च्या भूमिकेसाठी जुहीची निवड झाली होती. आता 'द्रौपदी'चं पात्र साकारावं की 'रश्मी'चं, असा पेच जुहीसमोर होता.

एकीकडे द्रौपदीच्या भूमिकेला ऐतिहासिक संदर्भ होता, लोकांच्या मनात कायम घर करण्याची सुवर्णसंधी होती.

तर दुसरीकडे 'कयामत से कयामत तक' द्वारे एका बिग बजेट चित्रपटाची हिरोइन म्हणून पदार्पण होणार होतं. "सेव्हन्टी एमएम" पडद्यावर झळकण्याची ही उत्तम संधी होती.

हा यक्षप्रश्न अखेर बी.आर.चोप्रांनीच सोडवला.

जुहीच्या कारकीर्दीची विचार करून त्यांनी तिला 'कयामत से कयामत तक'च्या प्रस्तावाला होकार द्यायला सांगितलं.

Image copyright SEBASTIAN D'SOUZA

द्रौपदीच्या भूमिकेसाठी सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाली होती. मात्र चोप्रा यांनी स्वहितापेक्षा युवा अभिनेत्रीच्या कारकीर्दीला प्राधान्य दिलं.

'कयामत से कयामत तक'ची सगळी भट्टीच नवीन होती. या चित्रपटाच्या प्रमोशनसंदर्भातला एक धमाल किस्सा जुहीने मला एका मुलाखतीत सांगितला. तेव्हा जुही आणि आमीर स्वत:च स्थानिक टॅक्सीवाल्यांना भेटायला जायचे. त्यांच्या गाडीवर कयामत से कयामत चित्रपटाचं पोस्टर लावावं, अशी त्यांना विनंती करायचे.

ऐंशीच्या दशकात धड कथानक नाही, अशा बटबटीत चित्रपटांचं पर्व होतं. दोन दशकं बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चनही या सपक प्रवाहात अपवाद ठरू शकले नाहीत.

अशातच नवे चेहरे आणि तरल प्रेमकथेचा 'कयामत से कयामत तक' आला आणि या चित्रपटासह या दोघांनीही एकाप्रकारे इतिहासच घडवला. या चित्रपटाने बॉलीवूडमधल्या प्रेमपटांची परिभाषा बदलली.

90च्या दशकात जुही, काजोल, आमीर, सलमान तसंच शाहरुख यांनी आपली सद्दी निर्माण केली. म्हणूनच बॉलीवूडमध्ये नवप्रवाहाच्यां शिलेदारांमध्ये जुहीची गणना होते.

जुही नावाचा बोलबाला

इंडिया किंवा तत्कालीन हिंदुस्तानचं यथार्थ वर्णन जुही आणि शाहरुखच्या या एका गाण्यात आहे - 'हम लोगों तो समझो सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी'.

'डर', 'राजू बन गया जंटलमन', 'स्वर्ग', 'येस बॉस', 'इश्क', 'हम है राही प्यार के', 'बोल राधा बोल' या चित्रपटांनी जुही नावाचा ब्रँड प्रस्थापित झाला. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर सापडेल अशी लाघवी मुलगी, विनोदाचं परफेक्ट टायमिंग आणि अभिनयाची ताकद, यामुळे जुहीने प्रत्येक चित्रपटाद्वारे यशाची नवनवी शिखरं गाठली.

'हम है राही प्यार के' चित्रपटासाठी जुहीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला होता.

पण स्पर्धा तेव्हाही आजच्या सारखीच होती. जुहीसोबतच मराठमोळ्या माधुरी दीक्षितची कारकीर्द फुलत होती. या दोघींमध्ये निकोप स्पर्धा होती. यातून जुहीने 'दिल तो पागल है' चित्रपटाला नकार दिला.

मग या दोघींना पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग आला तो अखेर 2014 मध्येच. चित्रपटाचं नाव 'गुलाब गँग'.

आमीरसोबत 'राजा हिंदुस्तानी' आणि शाहरुखसोबत 'दिल तो पागल है' हे जुहीने नाकारलेले चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. जुहीच्या भूमिका करिश्मा कपूरने साकारल्या.

जुही आणि आमीरची केमिस्ट्री भन्नाट होती. मात्र 'इश्क' चित्रपटाच्या सेटवर एका मस्करीचं कुस्करीत रुपांतर झालं आणि या दोघांमधले संबंध बिघडले होते. अनेक वर्ष ते एकमेकांशी बोलतही नव्हते.

पण शाहरुख आणि आमीरसोबतच समांतर कारकीर्द घडवणाऱ्या सलमान खानबरोबर जुहीने कधीच काम केलं नाही.

सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुहीच्या उत्तम गाण्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. लहानपणी तिने गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पद्मिनी कोल्हापुरे यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून तिनं गाण्याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं आहे. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

पण वेळ साधून जुहीने गजल प्रसिद्ध जगजीत सिंह यांच्यासह एका अध्यात्मिक गाण्यांच्या अल्बमसाठी गायनही केलं होतं. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'भूतनाथ' चित्रपटातही तिच्या गाण्याची एक झलक होती.

चित्रपटांमधल्या ठोस भूमिकांमध्ये जुहीने जीव ओतला आणि त्यासाठी तिला वेळोवेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. मात्र त्या काळातल्या अभिनेत्रींना अभिनयाच्या बरोबरीने अतरंगी गाणी आणि दृश्यांमध्ये काम करावं लागायचं. आज अशा ट्रेंडला 'आयटम नंबर' असं संबोधलं जातं.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जुहीने आपल्या भावना व्यक्त केल्या. "90च्या दशकात चित्रपटाच्या टीमपैकी 90 टक्के मंडळी पुरुषच असायचे. आताही हेच प्रमाण कायम होतं," असं जुहीने सांगितलं.

Image copyright STRDEL/Getty images

जुहीच्या बरोबर नायक म्हणून काम केलेले शाहरुख आणि आमीर आजही हिरोच्या भूमिका करतात. मात्र पन्नाशी गाठलेल्या जुही आणि माधुरी यांचा बॉलीवूड चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी आज विचार होताना दिसत नाही. याबाबतीत "इंडस्ट्री तशीच आहे," अशी खंत जुहीने व्यक्त केली.

अभिनयाच्या क्षेत्रात वावर कमी झाल्यानंतर जुहीने व्यवसायात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रासह जुहीची इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघात शाहरुख खानसोबत सहमालकी आहे.

गेल्या 15 वर्षांत जुही क्वचितच एखाद्या चित्रपटात दिसते. 'माय ब्रदर निखील' चित्रपटात HIV बाधित व्यक्तीच्या बहिणीची भूमिका जुहीने साकारली होती.

'आय एम' या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटात तिने एका काश्मिरी पंडित नागरिकाच्या भूमिकेत जीव ओतला होता. 'तीन दिवारे' चित्रपटातही तिने काहीशी नकारात्मक धाटणीची भूमिकाही समर्थपणे पेलली होती.

हिंदीच्या बरोबरीने जुहीने पंजाबी, तामीळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांत काम केलं. 'वारिस शाह', 'देस होया परदेस' आणि 'शहीद उधम सिंग', या जुहीने अभिनय केलेल्या पंजाबी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

'कयामत से कयामत तक' या सुपरडुपर हिट चित्रपटापूर्वीच जुहीने कन्नड चित्रपट 'प्रेमलोक'च्या माध्यमातून स्टारडमचा अनुभव घेतला होता. प्रख्यात हॉलीवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'द हंड्रेड फूट जर्नी' चित्रपटात जुहीने काम केलं होतं.

पन्नाशी गाठलेली जुही आजही आपल्या निखळ सौंदर्याने अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. आणि तिचे असे फॅन तिच्या पहिल्या सिनेमापासून होते. त्यापैकीच एक होता आमीर भाचा इम्रान खान.

'कयामत से कयामत तक' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीर लहानग्या इम्रानला घेऊन सेटवर यायचा. तेव्हा जुहीच्या सौंदर्याने इम्रान इतका घायाळ झाला होता की त्याने चक्क तिला प्रपोजही केलं होतं. आणि एक अंगठीही दिली होती.

अल्लडपणाचं वय ओसरल्यानंतर इम्रानने जुहीकडून अंगठी परत घेतली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)