पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयीच्या या 8 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

नेहरू, बालदिन, इतिहास Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते.

14 नोव्हेंबर म्हणजे 'बालदिन', कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं फार आवडायची. बालकांचे 'चाचा नेहरू' यांच्या विषयीच्या आठ घटना तुम्हाला माहिती आहेत का? या घटना खरंतर त्यांच्या धीरोदात्त स्वभावाची ओळख करून देतात. जाणून घेऊया.

1. दंगलखोरांशी लढण्यासाठी पिस्तूल उगारली

हा 1947 चा प्रसंग आहे. फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. लाहोर असो वा इतर कुठलंही शहर, सगळीकडे हत्या आणि लूटमार सुरू होती. जवाहरलाल नेहरू यांना अचानक माहिती मिळाली की, दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये मुस्लिमांची दुकानं लुटण्यात येत आहेत.

नेहरू तिथं पोहोचले तेव्हा हिंदू आणि शीख दंगेखोर मुस्लिमांच्या दुकानांमधून महिलांचे हॅंडबॅग्स, कॉस्मेटिक्स आणि मफलर घेऊन पळत होते. पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दंगलीदरम्यान नेहरूंनी रिव्हॉल्व्हरचा आधार घेतला होता.

नेहरूंना प्रचंड राग आला आणि त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका सुस्त पोलिसाची लाठी हिसकावली आणि दंगेखोरांना तिथून पिटाळून लावलं. हे इथंच संपत नाही.

माजी IPS अधिकारी आणि अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत असलेले बदरूद्दीन तय्यब 'मेमॉयर्स ऑफ एन इगोइस्ट' या त्यांच्या आत्मकथेत नेहरूंविषयी एक किस्सा सांगतात.

"एका रात्री मी नेहरू यांच्या घरी पोहोचलो. त्यांना माहिती दिली की, शरणार्थी शिबिरात पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुन्या दिल्लीतील मुस्लीमांना मिंटो ब्रीजच्या जवळपास दंगेखोर घेरून मारत आहेत. हे ऐकताच नेहरू तडक तिथून उठले आणि वेगाने शिड्या चढत वरच्या खोलीत गेले."

थोड्यावेळानं ते खाली उतरले तेव्हा त्यांच्या हातात एक जुनी धुळीनं माखलेली रिव्हॉल्व्हर होती. खरंतर ही रिव्हॉल्व्हर त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांची होती, ज्यातून अनेक वर्षांपासून गोळी चालवण्यात आलेली नव्हती.

त्यांनी मला सांगितलं की, आपण खराब आणि जुने कपडे घालून रात्री मिंटो ब्रीजला जाऊ. आपण तिथून पळून जाणारे मुस्लीम आहोत, असं भासवू. जर कुणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण गोळी घालू.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॉक्टर झाकीर हुसैन

मी नेहरू यांचं म्हणणं ऐकून हादरलो. अशा घटनांशी दोन हात करण्यासाठी इतरही चांगले पर्याय आहेत, हे जगातली दुसरी सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना समजावण्यात मला जोर लावावा लागला.

माउंटबॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा हाच आवेश एखाद्या दिवशी त्यांच्या मृत्यूचं कारण ना ठरो. यासाठी त्यांनी नेहरूंवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते.

2. सुरक्षारक्षकांविना झाकीर हुसैन यांना वाचवायला निघाले

स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसांआधीची ही घटना. नेहरू यांचे सहकारी मोहम्मद युनूस यांना जामिया मिलिया इस्लामियाचे मुख्याध्यापक डॉ. झाकीर हुसैन यांचा रात्री अकरा वाजता फोन आला. ते फार घाबरलेले होते.

युनूस तेव्हा नेहरूंच्या घरीच थांबले होते. झाकीर हुसैन यांनी सांगितलं की कॉलेजबाहेर दंगेखोरांची मोठी गर्दी झाली आहे आणि त्यांचा हेतू काही चांगला दिसत नाही.

मोहम्मद यूनूस त्यांच्या 'परसन्स, पॅशन्स अँड पॉलिटीक्स' या पुस्तकात लिहितात - "फोन होताच मी नेहरूंकडे धावत गेलो. त्यावेळीही ते त्यांच्या कार्यालयात काम करत होते. मी त्यांना फोनवर मिळालेली माहिती सांगितली."

त्यांनी तात्काळ गाडी मागवली आणि मला त्यात बसायला सांगितलं. कारमध्ये त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक नव्हता. आम्ही जामियाला पोहोचलो आणि बघितलं की घाबरलेले विद्यार्थी आणि कर्मचारी कॉलेजमध्ये लपून बसले होते. त्यांना त्या हिंसक जमावानं घेरलं होतं.

Image copyright SHOBHA NEHRI
प्रतिमा मथळा नेहरूंसमवेत बी.के.नेहरू आणि पत्नी कोरी नेहरू

जसे नेहरू तिथं पोहोचले, जमावानं त्यांना ओळखलं आणि त्यांच्या बाजूला गोळा झाले. नेहरू यांनी वेळ न दवडता जमावाच्या वागणुकीवर आक्षेप घेत ओरडायला सुरुवात केली.

काही क्षणातच जमावाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्वच नेहरू यांची माफी मागू लागले.

जामियाच्या प्रांगणात प्रवेश करत नेहरूंनी झाकीर साहेबांना धैर्य दिलं. दरम्यानच्या काळात नवनियुक्त व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांच्यापर्यंत माहिती पोहोचली होती की नेहरू कुठल्याही सुरक्षेविना एका नाराज जमावाला सामोरे गेले.

त्यांनी तत्काळ काही मशीनगन असलेल्या जीपमध्ये आपले सुरक्षा रक्षक नेहरू यांच्या सुरक्षेसाठी पाठवून दिलं. जेव्हा शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तिथं पोहोचले तेव्हा नेहरू यांना जमावानं घेराव घातलेलं दृष्य त्यांनी बघितलं.

पण ते काही कारवाई सुरू करतील त्याआधीच त्यांना घोषणा ऐकू आल्या - "जवाहरलाल नेहरू जिंदाबाद!"

पुढे जाऊन झाकीर हुसैन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.

3. 'नेहरू कधीच रडत नाही!'

नेहरू यांचे भाचे आणि अमेरिकेत माजी राजदूत बी. के. नेहरू यांनी 1935मध्ये फोरी या हंगेरियन युवतीशी लग्न केलं.

लग्नाआधी तिची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून आणण्यासाठी आनंद भवन इथं घेऊन गेले. खादी घालणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला भेटून तिला फार आनंद झाला.

पण नेहरू त्या वेळेस कलकत्त्याच्या अलीपूर जेलमध्ये कैदे होते. बी. के. नेहरू यांनी ती भेट साधवण्यासाठी आपल्या भावी पत्नीला कलकत्त्याला नेलं.

फोरी यांनी जेव्हा नेहरू यांना बघितलं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की, ही अगदी सभ्य, स्नेही आणि इंग्रजांसारखी दिसणारी व्यक्ती एखादा कायदा तोडू शकते.

जेव्हा नेहरूंचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा फोरी आपले अश्रू थांबवू शकल्या नाही. नेहरूंना त्यांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त एकदाच पत्र लिहिण्याची परवानगी होती.

प्रतिमा मथळा बी.के. नेहरू यांचे आत्मचरित्र नाइस गाइज फिनिश सेकेंडचे मुखपृष्ठ

बी. के. नेहरू त्यांच्या 'नाइस गाईज फिनीश सेकंड' या आत्मकथनात लिहितात - "पुढच्या महिन्यात नेहरू यांनी लिहिलेली पत्रं जेव्हा आनंद भवनात आली, तेव्हा त्यात एक पत्र फोरी हिच्यासाठीही लिहिलेलं होतं."

त्यात त्यांनी लिहिलं होतं, तू आता नेहरू कुटुंबाची सदस्य होणार आहेस, म्हणून तुला नेहरू कुटुंबातले काही नियम-कायदेही शिकावे लागतील.

मी बघितलं, जेव्हा तू मला भेटल्यानंतर निरोप घेताना तुझ्या डोळ्यात अश्रू होते. एक खूणगाठ मनाशी बांधून ठेव - 'कितीही मोठं दुःख असू दे, नेहरू कधी रडत नाहीत!'

त्या पाकिटात एक पत्र इंदिरा गांधी यांच्यासाठीही होतं. त्यात त्यांनी कुटुंबाची नवीन सून त्यांना आवडली, असं लिहिलं होतं.

4. 'प्रोटोकॉल? कसला प्रोटोकॉल?'

एप्रिल 1949 मध्ये म्यानमारचे पंतप्रधान यू नू अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाले. तो रविवार होता. त्यावेळी वाय. डी. गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते. नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले.

म्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले, तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉस्च्यूममध्येच जलतरण तलावाकडेच निघाले होते. आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला. पलीकडे पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्यक बोलत होते.

पंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचं आहे असं ते म्हणाले. आहे त्या अवतारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेहरू एका निवांतक्षणी

हा प्रसंग गुंडेविया यांनी 'आऊटसाईड द आरकाईव्ह्स' मध्ये मांडला आहे - नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. नेहरू हसून म्हणाले, "कुठे निघाला आहात? म्यानमारच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेला नाहीत?"

त्यावेळी मी शॉर्ट्स, बुशशर्ट आणि चपलांमध्ये होतो, आणि माझ्या काखेत टॉवेल होता. "मी पोहण्यासाठी निघालो आहे," असं प्रांजळपणे सांगितलं.

आणखी एका तासात त्यांचं विमानतळावर आगमन होईल हे त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणून मी तयार झालो नाही.

त्यावर ते ओरडून म्हणाले, "प्रोटोकॉल, कसला प्रोटोकॉल? म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात. माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावर चला."

पोहण्याच्या वेशात आणि चपलांमध्ये असल्याने मी नेहरूंना विचारलं "अशा अवतारात येऊ?"

ते 'हो' म्हणाले.

त्यांनी कक्षाचा दरवाजा उघडला आणि भराभर पायऱ्या उतरून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो. पोहण्याच्या कपड्यातच मी नेहरूंच्या बरोबर गाडीत बसलो. त्यांच्याबरोबर विमानतळावर पोहोचलो तेव्हा माझा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले.

म्यानमारचे पंतप्रधान यू नू यांचं आगमन झालं. त्यांची आणि नेहरूंची भेट झाली. औपचारिक शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीने मी घरी गेलो.

पण ज्या गाडीत दोन देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीत मागच्या सीटवर पोहण्याच्या वेशात मी होतो. बरोबर अंग पुसण्यासाठीचा टॉवेलही होता.

दुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर एक पार्सल होतं, ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि टॉवेल काळजीपूर्वक पॅक केलेलं होतं.

5. नेहरू आणि एडविना यांचे ऋणानुबंध

नेहरू यांना एडविना माउंटबॅटन आवडायची, त्यांचं तिच्यावर प्रेम असल्याचं काहीजण खाजगीत सांगतात.

1949 मध्ये नेहरू पहिल्यांदा कॉमनवेल्थ परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी खुशवंत सिंग भारतीय दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते.

खुशवंत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा टेबलवर भारताचे राजदूत कृष्णा मेनन यांचा एक निरोप आला. "मला ताबडतोब भेटा," असं त्यात लिहिलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेहरू आणि एडविना माउंटबॅटन

खुशवंत सिंग यांनी 'ट्रूथ, लव अँड लिटिल मॅलिस' या आपल्या पुस्तकात हा किस्सा कथन केला आहे - भेटायला जाण्याआधी नेहरूंबाबत वर्तमानपत्रांमध्ये काही वावगं छापून आलेलं नाही ना, हे पाहू लागलो.

'डेली हेराल्ड' या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांचं छायाचित्र छापलं होतं. नाईटीमध्ये असलेल्या माउंटबॅटन नेहरूंसाठी आपल्या घराचा दरवाजा उघडत असल्याचा तो फोटो होता. या फोटोखाली वाक्य होतं- 'लेडी माउंटबॅटन्स मिडनाईट व्हिजिटर', अर्थात लेडी माउंटबॅटन यांचा मध्यरात्रीचा पाहुणा.

संबंधित बातमीत असंही म्हटलं होतं की लेडी माउंटबॅटन त्या वेळी लंडन शहरात नव्हत्या.

या फोटोचा संदर्भ लक्षात घेऊन मी मेमन यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं जाताच ते माझ्यावर ओरडले, "तुम्ही आजचा हेराल्डचा अंक पाहिलात का? पंतप्रधान तुमच्यावर अतिशय नाराज आहेत."

"या बातमीशी माझं काही देणंघेणं नाही," मी स्पष्ट केलं. "पंतप्रधान विमानतळावर उतरल्यानंतर थेट माउंटबॅटन यांच्या घरी जातील, याची मला काय कल्पना?"

6. एडविना यांना ग्रीक रेस्टॉरंटमध्ये मेजवानी

खुशवंत सिंह पुढे लिहितात - मी दोन दिवस नेहरूंच्या समोर फिरकलोच नाही. त्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये ते इतके व्यस्त झाले की हेरॉल्डमधल्या छायाचित्राचं प्रकरण ते विसरूनही गेले.

भारतात परतण्यापूर्वी नेहरूंनी लेडी माउंटबॅटन यांना सोहोमधल्या एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचं आमंत्रण दिलं. रेस्टॉरंटच्या मालकाने त्यांना ओळखलं. आपल्या हॉटेलमध्ये नेहरू आले आहेत, याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलावलं.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये नेहरू आणि लेडी माउंटबॅटन एकत्र भोजन करत असल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेहरू आणि एडविना माउंटबॅटन.

फोटो पाहताक्षणी हे प्रकरण आपल्याला शेकणार हे माझ्या लक्षात आलं. मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा टेबलवर पुन्हा एकदा मेमन यांचा निरोप होता. यावेळीही तोच निरोप होता- "पंतप्रधान तुम्हाला ताबडतोब भेटू इच्छितात."

मी त्यांना भेटायला क्लैरिजेस हॉटेलमध्ये पोहोचलो. त्यांचे सचिव मथाई यांना भेटलो. त्यांनी नेहरूंच्या खोलीत जायला सांगितलं. मी आत प्रवेश करण्यापूर्वी दरवाज्यावर टकटक केली.

"कोण?" त्यांनी आतून विचारलं.

"तुम्ही मला बोलावलं आहे."

"कोण आपण?"

"लंडनमधला तुमचा जनसंपर्क अधिकारी आहे."

त्यांनी आत बोलावलं. मला आपादमस्तक पाहिल्यानंतर ते म्हणाले, "तुमच्या जनसंपर्काची पद्धत अजबच आहे."

7. ब्रीफकेसची सोबत

ब्रीफकेसमध्ये नेहरूंचा सिगारेटचा (स्टेट एक्स्प्रेस 555) डबा, काडेपेटी, ते वाचत असलेलं पुस्तक, वैयक्तिक पत्रं, घसा नीट राखण्यासाठी औषधाचं एक पॅकेट आणि पुस्तकांच्या नोट्स काढण्यासाठी पेन्सिल असायची.

जिथं जायचं आहे तिथे ही ब्रीफकेस असली पाहिजे, असा नेहरूंचा आदेश होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेहरू खुशवंत सिंह यांच्यासमवेत

8. वायफळ खर्चाला विरोध

नेहरूंना वायफळ खर्च अजिबात आवडायचा नाही. ते बाहेर जायला गाडीने निघायचे. त्यावेळी एखादा नळ उघडा दिसला तर गाडी थांबवून ड्रायव्हरला नळ बंद करण्यासाठी धाडायचे.

रुस्तमजी यांनी आपल्या पुस्तकात याविषयी विस्ताराने लिहिलं आहे - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये नेहरूंच्या राहण्याची व्यवस्था एका खास महालात करण्यात आली होती. या महालातून निघताना ते स्वत: दिवे बंद करायचे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नेहरू कन्या इंदिरा गांधी यांच्यासमवेत

याच दौऱ्याविषयी मोहम्मद युनूस लिहितात - नेहरूंना झोपताना काही वाचायला हवं होतं. म्हणून त्यासाठी एक टेबल लॅम्पची मागणी त्यांनी केली.

खोलीत वाचनासाठी प्रकाश कमी आहे, हे त्यांच्या मदतनीसाला समजलं. म्हणून त्याने अधिक प्रकाश पुरवणारा लॅम्प त्यांना आणून दिला.

त्या लॅम्पचा प्रखर प्रकाश कमी करण्यासाठी मला एका टॉवेलनं झाकावं लागलं. त्यानंतरही प्रखरतेमुळे टॉवेल जळू लागला.

हेही वाचतंल का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)