'लग्न करेन, पण आपल्या पायावर उभं राहिल्यावरच': स्वत:चा बालविवाह थांबवणाऱ्या मुलीचा निर्धार

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - 'लग्न करेन, पण आपल्या पायावर उभं राहिल्यावरच' : स्वत:चा बालविवाह थांबवणाऱ्या मुलीचा निर्धार.

वयाच्या चौदाव्या वर्षी घरच्यांनी रेखाचं (बदलेलं नाव) लग्न ठरवलं. पण तिला शिकायचं होतं, स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. म्हणून मग बंड करत तिनं स्वत:च्या लग्नाविरुद्ध आवाज उठवला.

रेखाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळं आठ वर्षांची असतानाच तिला शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं. शहरात बांधकाम मजुरी करणाऱ्या आजी-आजोबांकडे रेखा राहू लागली.

पण आजी-आजोबा कामावर गेल्यावर तिचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला.

म्हणून मग बांधकाम मजुरांच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत तिला दाखल करण्यात आलं. त्याच संस्थेच्या मदतीनं तिच्या शिक्षणाची सुरुवात झाली.

शिक्षणाची आवड असल्यानं ती एकामागून एक इयत्ता पास करत आठवीत गेली.

घरचेच खोटं बोलले!

आणि एके दिवशी तिला गावाहून फोन आला. "कोणीतरी आजारी आहे. तू ताबडतोब गावाकडं ये," असं रेखाला सांगण्यात आलं.

काळजी वाटून रेखानं लगेच गाडी पकडली न गावी गेली.

प्रतिमा मथळा नर्स बनण्याचं रेखाचं स्वप्न आहे.

पण घरी गेल्यावर तिला खरं काय ते कळालं.

खोटं बोलून घरच्यांनी रेखाला गावाकडं बोलावून घेतलं होतं. तिथं पोहोचल्यावर तिला सांगण्यात आलं की, "चार दिवसांत तुझं लग्न होणार आहे."

रेखाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला लग्नाबद्दल सरळसरळ सांगण्यात आलं होतं. ना तिला काही विचारण्यात आलं, ना तिची मर्जी जाणून घेण्याचा प्रयत्न झाला.

घाबरलेल्या रेखानं ही गोष्ट तिच्या आजी-आजोबांना सांगितली. त्यांनी रेखाच्या घरच्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

"पोरगी लहान आहे. तिला शिकू द्या. नंतर करू लग्न," त्यांनी तिच्या आई-वडिलांना सांगितलं. पण ते काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

शेवटी रेखानेच या सगळ्यातून आपली सुटका करण्याचा निर्णय घेतला.

मोकळा श्वास

रेखानं शिक्षणासाठी तिला मदत करत असलेल्या संस्थेच्या फोनवर मॅसेज केला - "घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. आणि ते चार दिवसांनी पार पडणार आहे. पण मला इतक्यात लग्न करायचं नाही. मला अजून खूप शिकायचं आहे."

प्रतिमा मथळा रेखाच्या मॅसेजमुळं तिचा बालविवाह थांबवणं शक्य झालं.

तो मॅसेज पाहून संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या गावी जायचं ठरवलं. तिथं जाऊन त्यांनी गावातील पोलीस स्थानकात प्रकरणाची माहिती सांगितली.

पोलिसांनीही उशीर न करता गावात जाऊन चौकशी केली. अखेर संस्थेची आणि पोलिसांची टीम रेखाच्या घरी धडकली.

त्यावेळी रेखाच्या घरी लग्नाआधीचे विधी सुरू होते. रेखाला हळद लागली होती, तिच्या हातात बांगड्या होत्या. पुढच्या दोन दिवसांत तिचं लग्न होणार, असं त्यांना समजलं.

पोलिसांनी रेखाच्या आई-वडिलांना लग्न थांबवायला सांगितलं. पण ते काही ऐकायला तयार होईनात.

शेवटी तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. सर्वांसमक्ष पोलिसांनी रेखाला विचारलं, "तुला लग्न करायचं आहे का?"

"मला इतक्या लहानपणी लग्न करायचं नाही," रेखा म्हणाली. "मी करेन लग्न, पण माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर, स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर!"

तिच्या या ठाम भूमिकेनंतर तिचा बालविवाह थांबवण्यात आला. आणि तिला परत शहरात पाठवण्यात आलं. शिक्षण चालू ठेवण्याची संधी मिळाली.

नर्स व्हायचं आहे

रेखा सध्या अकरावीत शिकत आहे. नर्स बनण्याचं तिचं स्वप्न आहे.

प्रतिमा मथळा मुलींनी स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहायला हवं, असं रेखा सांगते.

"मी लग्नाला नकार दिला म्हणून माझे आईवडील कित्येक महिने माझ्याशी बोलत नव्हते. वडील तर अजूनही बोलत नाहीत," रेखा सांगते.

"पण तेव्हा लग्न झालं असतं, तर आज मला शिकता आलं नसतं. माझं स्वप्नही पूर्ण करता आलं नसतं."

"लग्न करायचं नाही, या भूमिकेवर मी ठाम राहिले आणि संस्थेनं मला त्यात साथ दिली. त्यामुळे मी आता खूप शिकणार आहे. स्वत:च्या पायावर उभं राहणार आहे." असं रेखा सांगते.

आजी-आजोबांनीतारलं

गावाकडची परिस्थिती अनुकूल नसल्यानं रेखाला शहरात आजी-आजोबांकडे यावं लागलं. तिचं शिक्षण तिथंच चालू राहिलं, यात आजी-आजोबांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे.

प्रतिमा मथळा रेखाचे आजी-आजोबा बांधकाम मजूर म्हणून काम करतात.

लहान वयात लग्न ठरवण्याबद्दल तिची आजी सांगते, "रेखाचं लग्न ठरलं तेव्हा काय करावं हे समजत नव्हतं. तिच्या आई-वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग जे घडत होतं, ते पाहत बसण्याशिवाय आमच्यापुढं दुसरा पर्याय नव्हता."

पुढे त्या सांगतात, "पण आमचं काही चालत नाही म्हटल्यावर तिनंच पुढाकार घेतला आणि लग्न थांबवलं. तिला आमचा नेहमीच आधार असणार आहे. आता तिनं खूप शिकायला हवं."

रेखाचा संदेश

रेखा इतर मुलींना सांगते, "लहान वयात अजिबात लग्न करू नका. आईवडील ऐकत नसतील तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्या."

"बस्स फक्त स्वत:च्या भूमिकेवर तुम्ही ठाम रहा. मी ठाम राहिले म्हणूनच माझा बालविवाह रोखू शकले. तुम्हीही एक काही निश्चय केला तर सर्व काही शक्य आहे."

(सुरक्षेच्या कारणास्तव रेखाचं खरं नाव, गाव आणि इतर कुठलीही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)