सोशल - 'भारतात खरी धर्मनिरपेक्षता बघायला मिळेल की नाही शंकाच आहे'

Image copyright Getty Images

"स्वातंत्र्यानंतर सांगण्यात आलेलं सर्वांत मोठं असत्य काय असेल तर ते म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे," असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. धर्मनिरपेक्षता ही दांभिकता असल्याचंही ते म्हणालेत.

"धर्मनिरपेक्षतेमुळं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. चुकीचा इतिहास लिहिणं हा देशद्रोह आहे," असं ते रायपूरमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले.

"राजकीय व्यवस्था कधीच धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. ती पंथनिरपेक्ष असू शकते. जर कुणी असं म्हटलं की या एकाच उपासना पद्धतीनुसार प्रशासन चालायला हवं, तर त्याला माझा विरोध राहील. पण, राजकीय व्यवस्था धर्मनिरपेक्ष असते असं मी म्हणणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, बीबीसी मराठीनं याच विषयावर सोशल मीडियावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या.

अगदी बरोबर. निदान भारतात तरी खरी धर्मनिरपेक्षता बघायला मिळेल की नाही शंकाच आहे, असं मत अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

तर भारतातील 'धर्मनिरपेक्षता' म्हणजे 'हिंदु धर्मनिरपेक्षता' झाली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल कुलकर्णी यांनी दिली आहे.

धर्मनिरपेक्षता घटनेतून काढली पाहिजे, असं मत सागर राजे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

पारस प्रभात यांनी मात्र योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. योगी आदित्यनाथांचं वक्तव्य भारतीय राज्यघटनेच्या विचारांना तिलांजली देणारं आहे असं त्यांनी लिहीलं आहे.

Image copyright Facebook

तर धर्मनिरपेक्षता संविधानानं शिकवायची गोष्ट नाही तर त्याची जाणीव असायला पाहिजे असं मत निलकंठ इंगाळे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच धर्मनिरपेक्ष शब्दाचं राजकारण केल्यामुळे त्यांनी राजकारण्यांवर टीका सुद्धा केली आहे.

Image copyright Facebook

मलकर रमेश यांना भारतात तरी हा शब्द खोटाच वाटतो. तर निलेश मुळे यांनीही भारतात धर्मनिरपेक्षता नाहीये असं मत नोंदवलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)