अहमदाबादेत कुणी मारल्या मुस्लिमांच्या घरांवर लाल फुल्या?

अशापद्धतीनं इमारती आणि सोसायटींच्याबाहेर रेड क्रॉस रंगवण्यात आले.
प्रतिमा मथळा अशापद्धतीनं इमारती आणि सोसायटींच्याबाहेर रेड क्रॉस रंगवण्यात आले.

अहमदाबादच्या काही मुस्लीमबहुल सोसायट्यांच्या भितींवर रात्रीतून लाल फुल्या रंगवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. काही काळ तणावानंतर महापालिकेने या खुणा मिटवल्या.

पालडी परिसरातील अमन कॉलनी, एलीट फ्लॅटस, डिलाईट फ्लॅटस, क्रिस्टल अर्पाटमेंट आणि साहिल फ्लॅटस, अशा 10-12 इमारतींवर असल्या लाल फुली रंगवण्यात आल्या होत्या. या सर्व इमारतीमध्ये मुस्लीम समुदायाचे लोक राहतात.

मंगळवारी सकाळी हे रेड क्रॉस बघून रहिवाशांमध्ये खळबळ उडाली, भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या चिन्हांमुळं अहमदाबादेत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात आले.

डिलाईट फ्लॅटमध्ये राहणारे उव्हस सरेशवाला म्हणाले की, "लाल रंगाची फुली बघून कुणीही घाबरणारच. आणि ते स्वाभाविक आहे. कारण लाल क्रॉसचा अर्थ हल्ला असा होतो. आम्ही कोणाच्या निशाण्यावर आहोत?"

अहमदाबाद महापालिकेच्या कामगारांनी या खुणा केल्याचा आरोप नागरिक करत होते. मात्र त्याबाबत स्पष्टता नव्हती.

नंतर मात्र पोलिसांनीच स्पष्ट केलं की सफाई कर्मचाऱ्यांनी या खुणा केल्या होत्या.

प्रतिमा मथळा हे रेड क्रॉस नंतर सफेद रंगाने मिटवण्यात आले.

पोलिस आयुक्त ए. के. सिंग यांनी सांगितलं, "या खुणा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच केल्या होत्या. महापालिकेच्या कचरागाडीला कुठं उभं रहायचं आहे, हे कळावं म्हणून कर्मचाऱ्यांनी अशा खुणा रंगवल्या."

"हे फक्त मुस्लीम भागातच झालेलं नसून काही हिंदूबहुल भागातही अशा खुणा करण्यात आल्या आहेत," अशी माहिती सिंग यांनी दिली.

पण पालडीच्या रहिवाश्यांमध्ये या घटनेमुळे भीती पसरल्याने लगेचच महापालिकेने पांढरा रंग लावून हे लाल चिन्ह मिटवले.

सरेशवाला म्हणाले, "हे चिन्ह बघितल्यावर आम्ही पोलिसांना याविषयी अर्ज लिहून मदत मागितली आहे. पोलिसांनी याचा तातडीनं तपास केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे."

प्रतिमा मथळा साहील इमारतीबाहेरच्या भितींवर रंगवलेला रेड क्रॉस

पण या घटनेनंतर इथल्या रहिवाशांच्या धाक मनात बसला आहे.

अमन कॉलनीतील बंगला क्रमांक 3 मध्ये राहणारे मुबीन लाकडीया म्हणाले, "हे रेड क्रॉस रात्री रंगवण्यात आले आहेत. यामुळं आमचं अख्ख कुटुंब तणावात आहे. यामागे कोणाचा हात आहे, हे अजूनही कळलेलं नाही."

"यानंतर आमच्या घरातील महिला आणि मुलं बेधडकपणे बाहेर जाऊ शकणार नाहीत," असंही ते म्हणाले.

प्रतिमा मथळा इतर भागातील इमारतींवरही असे चिन्ह रंगवल्याचं पोलिसांचं म्हणनं आहे.

एलीट कॉलनीचे चौकीदार यांनाही याची काही कल्पना नव्हती.

"हे क्रॉसचं निशान बघून आम्हीही आश्चर्यचकित झालो. पण त्यानंतर कळालं की, या खुणा फक्त मुस्लीम रहिवाशांच्या अपार्टमेंटसवरच लावण्यात आल्या आहेत. तेव्हा मात्र आम्ही खाबरलो."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)