सैराटची हिंदीत 'धडक': 'मराठीत कळत नसेल तर हिंदीत सांगू का?'

उभ्या महाराष्ट्राला याड लावणाऱ्या 'सैराट'चा काही दिवसांपूर्वीच कन्नडमध्ये रीमेक आला होता. आता हाच सिनेमा हिंदीत येत आहे. सैराटचं हिंदीतलं नाव 'धडक' असेल. त्याचा फर्स्ट लुक आज प्रदर्शित करण्यात आला.
धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केलं आहे. 'धडक'मध्ये आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर असेल तर परश्याचा रोलमध्ये शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर दिसेल.
या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. पण आज फर्स्ट लुक रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं.
'#धडक', '#IshaanKhattar', #Dhadak, #JhanviKapoor असे हॅशटॅग वापरून अनेकांनी त्यांचं सिनेसृष्टीत स्वागत केलं आहे. तर काहींनी घराणेशाहीवर टीका करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
- अहमदाबादेत कुणी मारल्या मुस्लिमांच्या घरांवर लाल फुल्या?
- 'मी लाभार्थी' मध्यावधी जाहिरातींचा निवडणुकीसाठी उपयोग होणार का?
- विनोबा भावे : गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार करणारे सच्चे गांधीवादी
स्वप्नील यांना 'धडक'ची स्टारकास्ट फारशी पसंत पडलेली दिसत नाही. ते निर्मात्यांना सल्ला देत लिहितात, "आर्ची आणि परश्याला घ्या... चित्रपट हिट होईल."
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने या सिनेमाची निर्मित केली आहे. करण जोहरने आतापर्यंत अनेक बड्या स्टार्सच्या मुलामुलींना संधी दिली आहे.
करण घराणेशाहीलाच चालना देतो, अशी टीका अनेकांनी केली आहे. "करण जोहर प्रगती झालेल्यांची आणखी प्रगती करून देतात", असं कुमार सोनू लिहितात.
त्यांचीच री ओढत राजीव चितगुप्पी या सिनेमाचं नाव बदलण्याचा सल्ला देतात. श्रीदेवी कपूर यांची मुलगी आणि पंकज कपूर यांचा मुलागा यात असल्यामुळे "धडकऐवजी चित्रपटाचं नाव 'कपूर सन्स अँड डॉटर्स' का नाही ठेवलं," असं ते विचारतात.
'सैराट'मध्ये परश्याची भूमिका करणाऱ्या आकाशा ठोसरप्रमाणेच आता ईशान खट्टरही लोकप्रिय होणार का, यावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. मिनाक्षी चौधरी भाकित व्यक्त करतात की आता ईशान देशभरातल्या मुलींना वेड लावणार. "अनेक रिकामटेकड्या मुली मागणी करतील की आम्हाला ईशान खट्टर ट्विटरवर हवा."
हिंदीत होत असलेल्या रीमेक्सवर नाराज होत एक प्रतिक्रिया आहे: ओरिजिनल चित्रपट का नाही बनवत? याचा रीमेक, त्याचा रीमेक.
ईशान आणि जान्हवी या दोघांसाठीही हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे यात शंका नाही. त्यामुळे आता जान्हवी, ईशानचा 'धडक' बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. हा सिनेमा 6 जुलै 2018ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
- 'बावन'कशी खान : शाहरुखच्या जीवनातील 52 रंजक गोष्टी
- पन्नाशीतही जुहीची सौंदर्यमोहिनी कायम!
- आज रात्री शांत झोप लागण्यासाठी या 10 गोष्टी नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)