गुजरात : 'गांडो विकास'चा बाप आहे हा 20 वर्षांचा तरुण

सागर सावलिया
प्रतिमा मथळा सागर सावलिया

गुजरातच्या विकासाचं मॉडेल हा भाजपाच्या पोस्टरचा आता एक जुना विषय झाला आहे. भारतातील आणि परदेशातील काही अर्थतज्ज्ञांनीसुद्धा या मॉडेलचं समर्थन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येण्यासाठी या विकासाच्या मॉडेलचा फायदा झाला. आपल्या प्रशासनिक कौशल्याचा हा पुरावा जगासमोर मांडण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही.

जेव्हा त्यांच्या 'सबका साथ सबका विकास' या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, तेव्हा मोदींच्या कार्यकुशलतेचं प्रतीक म्हणून भाजप नेते या गुजरात मॉडेलचा उपयोग करत असत.

... आणि विकास 'गांडो' झाला

विरोधक म्हणून काँग्रेसला या मोहिमेला उत्तर देणं जमलं नाही तेव्हा नेटिझन्स त्यांच्या मदतीला आले. नेटिझन्सनी 'विकास गांडो थायो छे' (म्हणजे 'विकास वेडा झाला आहे') हा हॅशटॅग तयार करून विनोदी पोस्ट, मीम, ऑडिओ व्हिजुअल कॅप्सुलचा अक्षरश: पाऊस पडला. त्यामुळे हा हॅशटॅग व्हायरल झाला.

यामुळे गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढल्या. काँग्रेसनेसुद्धा या हॅशटॅगचा फायदा घेत दिवाळीच्या तोंडावर 'विकासची शेवटची दिवाळी' असा हॅशटॅग तयार केला.

'गांडो विकास'चा बाप

पण या विनोदी हॅशटॅगमागे काँग्रेसचा नसल्याचं उघड झालं. अहमदाबादच्या एका युवकाने हा ट्रेंड सुरू केल्याचा दावा केला आहे. 20 वर्षांच्या सागर सावलिया या तरुणाने या हॅशटॅगबरोबर पहिला फोटो पोस्ट केल्याचं सांगितलं आहे.

सागर अहमदाबादमधल्या इंडस अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. तो आपल्या पालकांबरोबर अहमदाबाद इथे राहतो.

"23 ऑगस्ट 2017ला मी गुजरात वाहतूक विभागाची खड्ड्यात अडकलेली बस बघितली आणि या हॅशटॅगसकट तो फोटो अपलोड केला होता. तो लगेच व्हायरल झाला. मग लोकांनी हीच ओळ राज्यातला आणि देशातला भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी वापरली," असं सागरने बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"मला माहीत नव्हतं की हे इतकं व्हायरल होईल," तो पुढे सांगतो.

गंमत म्हणजे सागर काही दिवसांपर्यंत नरेंद्र मोदींचा समर्थक होता. "मी नरेंद्र मोदींचा 2014पर्यंत फॅन होतो. इतकंच काय 2014 च्या निवडणुकीत मी भाजपसाठी कामसुद्धा केलं होतं."

मोदींचा फॅन ते मोदींचा टीकाकार

त्याच्या आयुष्यात झालेल्या एक घटनेमुळे त्याच्या राजकीय निष्ठेत बदल झाला. पाटीदार आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या हिंसाचारामुळे त्याचं मत बदललं. "पाटीदारांच्या मोठ्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार करताना बघितलं. तेव्हाच माझा भाजपावरचा विश्वास उडाला. दुसऱ्या दिवशी माझ्या घराची पोलिसांनी मोडतोड केली."

सागर ज्या रॅलीबद्दल बोलतो आहे ती रॅली 25 ऑगस्टला अहमदाबाद येथील GMDC ग्राऊंडवर होती. सुमारे पाच लाख पाटीदारांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांच्या समाजासाठी आरक्षणाची त्यांनी मागणी केली. पण मैदानावरची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्यामुळे राज्याच्या विविध भागात हिंसाचार झाला.

सागर सांगतो की या घटनेपर्यंत त्याने राजकारणापासून अंतर ठेवलं होतं, पण या घटनेमुळे त्याला पाटीदार अनामत आंदोलन समितीत (पास) भाग घेण्यास प्रेरणा मिळाली.

सौनो विकास म्हणजे काय?

त्याच्या या हॅशटॅगमुळे गुजरातमधील राजकीय वातावरण तापलं असलं, तरी सागरचा राजकारणात जाण्याचा कोणताही उद्देश नाही. "मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे," तो सांगतो.

सौनो विकास म्हणजे काय असं त्याला विचारल्यावर तो सांगतो, "माझी विकासाची अगदी सरळसाधी व्याख्या आहे. युवकांना नोकऱ्या मिळायला हव्यात. हा खरा विकास आहे. जर युवक नोकरीसाठी रस्त्यावर येत असतील तर पोलिसांनी बळाचा वापर करायला नको."

सागरची विकासाची कल्पना सत्ताधीशांच्या विचारांशी जुळेल की नाही हे माहीत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी या हॅशटॅगचं उत्तर "मी विकास आहे, मी गुजरात आहे" या शब्दांत देतात.

कितीही नाही म्हटलं तरी या मुलाने राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे, हे निश्चित.

गुजरात निवडणुकीविषयी आणखी:

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)