प्रेस रिव्ह्यू : कुंभ मेळ्यावर आत्मघातकी हल्ला करण्याची 'आयएस'ची चिथावणी

कुंभ मेळ्यावर हल्ल्याची भीती. Image copyright AFP/Getty
प्रतिमा मथळा कुंभ मेळा किंवा अशाच धार्मिक सोहळ्यात गर्दीच्या ठिकाणी ट्रक घुसवून हल्ला करण्याचा ISचा मानस असल्याचं वृत्त आहे.

लाखो भाविकांसाठी पर्वणी असलेल्या कुंभ मेळ्यासारख्या हिंदुंच्या धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी आत्मघातकी हल्ले घडवून आणा, भारतातल्या मुस्लिमांना असं चिथावणीखोर आवाहन करणारी कथित इस्लामिक स्टेटची ऑडिओ क्लिप एनआयएच्या हाती लागली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतातून ISसाठी भरती करणाऱ्या आणि केरळमधून अफगाणिस्तानमध्ये परागंदा झालेल्या अब्दुल रशिदने हे आवाहन केले आहे.

पाश्चात्य देशांमधील हल्ल्यांवरून स्फूर्ती घेत भारतातल्या मुस्लिमांनी कुंभ मेळा किंवा त्रिसुर पूरम या धार्मिक कार्यक्रमांवर आत्मघातकी हल्ले करावेत, अशी चिथावणी या ऑडिओ क्लिपमधून दिल्याचं NIAच्या अधिकाऱ्याने या वृत्तात म्हटलं आहे.

ISमध्ये पळून गेलेला अब्दुल रशिद उर्फ अब्दुल्ला अब्दुल रशिद हा मूळचा कासारगोड इथला आहे. त्याने याआधीही अशी चिथावणी देणाऱ्या ऑडिओ क्लिप प्रसृत केल्या होत्या, असं बातमीत म्हटलं आहे.

'इस्लामिक स्टेटचे मुजाहिदीन अनेक देशांमध्ये अशी कृत्यं करत आहेत. लास वेगासमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये आपल्यापैकी एकाने अनेकांना मारलं. तुम्ही निदान रेल्वे रूळांवरून उलटवा. ते जमलं नाही, तर सुरा घेऊन गर्दीवर हल्ला चढवा,' असं या क्लिपमध्ये म्हटल्याचं NIAच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिना बोरा प्रकरणाला नवं वळण

टाइम्स ऑफ इंडियाच्याच बातमीनुसार शिना बोरा प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने सगळं खापर तिचा पती पीटर मुखर्जी याच्यावर फोडलं आहे. विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या एका अर्जात इंद्राणीने शिनाच्या गायब होण्यासाठी पीटरला जबाबदार धरलं आहे. तसंच आपल्यालाही पीटरनेच या प्रकरणात गोवलं असल्याचं तिचं म्हणणं आहे.

'आरोपी क्रमांक 4 म्हणजेच पीटर मुखर्जी याने इतर साथीदारांसह 2012मध्ये माझ्या मुलीला शिना बोरा हिला गायब केलं. त्यानंतर त्यांनी सगळे पुरावे मिटवले, याबाबत माझ्या मनात कोणताही संदेह नाही,' असं इंद्राणीने या अर्जात म्हटलं आहे.

'न्यूड' प्रकरणी बहिष्काराबाबत मतभेद

'इफ्फी'मध्ये निवड होऊनही 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' हे चित्रपट आयत्या वेळी वगळण्यात आल्यामुळे सुरू असलेल्या वादाने वेगळं वळण घेतलं आहे. 'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक योगेश सोमण यांनी आपला 'माझं भिरभिरं' हा चित्रपट महोत्सवातून मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

'निवड झालेला चित्रपट काही कारणांनी नाकारला किंवा दाखवला गेला नाही, तर त्याला आमची कोणतीही हरकत असणार नाही, असे शपथपत्र निर्मात्यांकडून भरून घेण्यात येते', असं सोमण यांनी म्हटलं आहे.

मराठी चित्रपटांनी या महोत्सवातून माघार घेत एकजुटीने निषेध व्यक्त करावा, असं आवाहन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी केलं होतं.

पण 'महोत्सवातून माघार घ्या' हे सांगण्याचा अधिकार प्रस्थापितांना नाही, असं सांगत सोमण यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे, असं 'लोकसत्ता'ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

ऊसदर आंदोलन भडकले

उसाच्या दरवाढीसाठी सुरू असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला राज्यात हिंसक वळण लागल्याचं वृत्त 'सकाळ'ने दिलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.

Image copyright SAM PANTHAKY/Getty
प्रतिमा मथळा उसाला प्रतिटन 3100 रुपये भाव मिळावा, यासाठी आंदोलन सुरू आहे.

या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचं वृत्त 'सकाळ'ने दिलं आहे. उसाला एकरकमी प्रतिटन 3100 रुपयांचा भाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

या प्रश्नावरून राजकारण पेटलं असून आता सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर शरसंधान केलं आहे.

'विरोधी पक्षात असताना उसाला 3500 रुपये भाव मागणाऱ्यांनी आता सत्तेत आल्यावर 3100 रुपये दराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला,' असा हल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चढवल्याचं 'सकाळ'च्या वृत्तात म्हटलं आहे.

'एफआरपीनुसार दर न आकारणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करू नये. शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू,' असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याचंही 'सकाळ'ने नमूद केलं आहे.

ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये 24 नवे विमानतळ

चीन आणि पाकिस्तान या दोन महत्त्वाच्या देशांना लागून असलेल्या ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीर या भागांमध्ये 24 नवीन विमानतळ आणि हेलिपॅड उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. या राज्यांमधल्या दुर्गम भागांना इतर देशाशी जोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख गुरुप्रसाद महोपात्रा यांनी स्पष्ट केलं आहे.

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या बातमीनुसार या 24पैकी 9 अरुणाचल प्रदेशमध्ये, 5 आसाममध्ये, 5 मणिपूरमध्ये, 2 जम्मू-काश्मीरमध्ये आणि मेघालय, त्रिपुरा व सिक्कीम या राज्यांमध्ये प्रत्येकी एक विमानतळ असेल.

'या निर्णयामागे लष्करी डावपेच नाहीत. ईशान्य भारतातल्या राज्यांमधले किंवा जम्मू-काश्मीरमधले अनेक भाग दुर्गम आहेत. तिथे वैद्यकीय मदतही पोहोचत नाही. तिथे विमानतळ झाल्यास ते भाग देशाशी जोडले जातील आणि तिथल्या लोकांना याचा फायदा होईल,' असं गुरुप्रसाद महोपात्रा यांनी 'एक्सप्रेस'ला सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)