भरतकाम करणाऱ्या गुजराती गृहिणींचा सवाल : GST नंबर मिळवायचा कसा?

भरतकाम
प्रतिमा मथळा भरतकाम करणाऱ्या कारागीर

सुरतच्या कापड उद्योगात भरतकामाला विशेष स्थान आहे. अनेक गृहिणी तासन् तास खपून साड्यांवर भरतकाम करतात. यातून प्रत्येक साडीमागे त्यांना 10 ते 15 रुपये मिळतात. पण जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून कामाचा ओघ ओसरला आहे. आणि उत्पन्नही घटलं आहे.

कंचन सावलियांच्या घरात रंगीबेरंगी साड्या आणि भरतकामाचं सामान नेहमीच दिसतं. स्वयंपाक आणि इतर दैनंदिन कामं झाली की, त्या साड्यांवर सुंदर भरतकाम करायला घेतात. घरातूनच चालवलेल्या त्यांच्या या व्यवसायात त्यांची मुलंही त्यांना मदत करतात.

कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये हा प्रघात सर्वदूर पाहायला मिळतो. आपल्या कुटुंबाची काळजी घेत शहरातल्या अनेक महिला या व्यवसायातून रोजगारही मिळवतात.

पण सावलियांसारख्या अनेक महिलांच्या रोजगारावर जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे परिणाम झाला आहे.

साडी व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या अनेक गृहिणींना जीएसटीनंतर आपले दैनंदिन खर्च कमी करावे लागले, कौटुंबीक समारंभ पुढे ढकलावे लागले आणि ज्यादा व्याजदराने कधीकधी पैसे उसनेही घ्यावे लागले.

प्रतिमा मथळा भरतकाम करताना कंचन सावलिया

अश्या अनेक महिला आता बेरोजगार झाल्या आहेत.

सुरतच्या पुनागाम परिसरातल्या मातृशक्ती सोसायटीतल्या महिला संतप्त आहेत. आर्थिक गणिताची सांगड घालताना त्यांची ओढाताण होते आहे. सावलियांचं कुटुंबही त्याला अपवाद नाही.

"जीएसटी नंबर कुठून मिळवायचा याची मला काहीच कल्पना नाही. माझ्याकडे पैसेच नाहीत," त्यांनी बीबीसी न्यूज गुजरातीला सांगितलं.

पाच जणांच्या त्यांच्या कुटुंबात कंचन एकट्याच कमवणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांचे पती अंध आहेत. त्यांच्या मुली 10 आणि 12 वर्षांच्या तर मुलगा 9 वर्षांचा आहे.

बीबीसी न्यूज गुजरातीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, अनेकदा त्यांनी फक्त पोळी आणि लोणच्यावर दिवस काढलेत. कारण भाज्या घेणं त्यांना परवडणारं नव्हतं.

प्रतिमा मथळा "माझ्याकडे पैसेच शिल्लक नाहीत."

आपल्या मुलींच्या मदतीने साड्यांवर भरतकाम करून कंचन दिवसाला 1200 रुपये मिळवत असत. आता त्यांना जेमतेम 300 रुपये मिळतात, कारण कापड व्यापारी त्यांना एकगठ्ठा साड्या देत नाहीत.

गुजरातमधली प्रत्येक साडी या महिला भरतकाम कारागिरांच्या हाताखालून जाते, असं म्हणणं गैर ठरणार नाही. टेक्सटाईल मिलमधून निघून साड्या कापड बाजारात पोचतात. तिथून त्या या महिला कारागिरांकडे शेवटचा हात फिरवण्यासाठी जातात.

नव्या करसंरचनेनुसार या कारागिरांकडे स्वतःचा जीएसटी नंबर असणं आवश्यक आहे. आपल्या एकूण उत्पन्नावर त्यांनी 5% कर भरणं अपेक्षित आहे.

जीएसटी अंमलात आल्यानंतर सुरतचं कापड उत्पादन निम्म्यावर आलं आहे. व्यापाऱ्यांनी याचा निषेध केला आहे.

एका स्थानिक व्यापाऱ्याच्या मदतीने मातृशक्ती सोसायटीतल्या या महिला कारागीर जवळच्याच मिलेनियम टेक्सटाईल मार्केटमधून भरतकामाचं सामान विकत घेतात.

प्रतिमा मथळा मातृशक्ती सोसायटीत अनेक महिला भरतकाम करतात

फेडरेशन ऑफ सुरत टेक्सटाईल ट्रेडर्स असोसिएशनचे (FOSTTA) अध्यक्ष मनोज अगरवाल म्हणतात की, स्थानिक भरतकामाला याचा मोठा फटका बसला आहे.

"सुरतमध्ये अनेक महिला सुमारे सव्वा लाख भरतकाम यंत्रांवर काम करत होत्या. त्यांना मिळणारं काम आता निम्म्यावर आलंय आणि भरतकाम करणारे अनेक गट बंद पडलेत", अगरवाल सांगतात.

FOSTTAच्या एका अंदाजानुसार, साधारण 2 लाख महिला भरतकाम करून पोट भरत होत्या. आता त्या बेरोजगार आहेत. यात यंत्रावर आणि हाताने भरतकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

सुरतमध्ये किमान 175 मोठे कापड बाजार आहेत जे साड्यांवरचं भरतकाम या महिलांकडून करवून घेत असत. जीएसटी आल्यानंतर हे बाजार जवळजवळ बंद पडलेत.

मातृशक्ती सोसायटीत किमान 3300 घरं आहेत. इथले बहुतांश रहिवासी पाटिदार आहेत. हा समाज गुजरातमध्ये आरक्षणासाठी लढतो आहे.

या सोसायटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली आहे. 55 वर्षांच्या शांताबेन राणपरिया यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.

बीबीसी न्यूज गुजरातीशी बोलताना त्या म्हणाल्या, "माझ्या पतीपेक्षाही मला मोदींचं कौतुक होतं, पण जीएसटी आल्यानंतर आम्ही बेरोजगार झालो आहोत. भाजप कार्यकर्त्यांना आता मी माझ्या घराची पायरीही चढू देणार नाही." शांताबेन गेली 10 वर्षं भरतकाम करत आहेत.

प्रतिमा मथळा मुक्ता सुराणींना फक्त भरतकामच येतं

पन्नाशी गाठलेल्या मुक्ता सुराणी विधवा आहेत. त्या आपल्या दोन मुली आणि मुलाबरोबर सुरतमध्ये राहतात. त्यांचा मुलगा एका दुकानात काम करतो आणि महिन्याला 2000 रुपये कमवतो.

नुकत्याच एका आजारपणात मुक्ता सुराणींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या शेजाऱ्यांना पैसे गोळा करावे लागले होते. गेली 12 वर्षं त्या भरतकाम करत आहेत, दुसरं कुठलंच काम त्यांना येत नाही.

"जीएसटी येण्यापूर्वी मी महिन्याला 12000 रुपये कमवायचे, आता मला दरमहा जेमतेम 4500 रुपयेच मिळतात," सुराणी म्हणाल्या. एका प्रदीर्घ आजारपणातून त्या नुकत्याच सावरल्या आहेत आणि आता रोजगाराच्या शोधात आहेत.

व्यापाऱ्यांचं म्हणणं प्रमाण मानलं तर सुरतचा कापड बाजार कोसळला आहे, असंच म्हणावं लागेल.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)