... आणि खाटेवर बसून बिबट्या विहिरीतून बाहेर आला!

PHOTO Image copyright ANAND BORA/SANCTUARY NATURE FOUNDATION
प्रतिमा मथळा विहिरीत पडलेल्या बिबळ्याला खाटेच्या मदतीनं विहिरीतून बाहेर काढण्यात आलं.

पाच वर्षांपूर्वीची, 19 जुलै 2012 ची सकाळ. आठ वाजता आनंद बोरा यांना फोन आला. नाशिकलगतच्या एका आदिवासी पाड्यावर बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती त्यांना मिळाली.

हे असे फोन त्यांच्यासाठी नेहमीचेच आहेत. आनंद हे पेशानं शिक्षक आहेत. वन्यजीवांची फोटोग्राफी हा त्यांचा छंद आहे. त्यांनी आजवर वनखात्याच्या अनेक बचाव कार्यांची फोटोग्राफी केली आहे.

त्या दिवशीचा तो फोन येताच, ते तत्काळ बुबळी या गावी निघाले. तिथं त्यांनी साडेतीन तास चाललेल्या बचाव कार्याचे फोटो काढले आणि तो थरार फोटोबद्ध केला.

त्यातलाच एका फोटोला गेल्या आठवड्यात देशातील मानाचा सँच्युरी पुरस्कार मिळाला.

तो फोटो पाहिल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात... नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण होतेच.

Image copyright ANAND BORA
प्रतिमा मथळा विहिरीत पडलेल्या बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन जाळ्यात बांधून बाहेर काढण्याची नेहमीची पद्धत आहे.

"जेव्हा त्यानं वर पाहिलं, तेव्हा त्याच्या डोळ्यांत कृतज्ञेची जाणीव आम्हाला दिसली," बोरा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या प्रसंगाला उजाळा दिला.

विहिरीत पडल्यापासून गेले 25 तास बिबळ्या विहिरीत पोहतोच आहे, त्याची जीव वाचण्यासाठी धडपड सुरू आहे, अशी माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी दिली.

पाऊस पडत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी साचलेलं पाणीही विहिरीकडे वळवलं... पाण्याची पातळी वाढून बिबट्याला बाहेर पडणं शक्य होईल, अशी गावकऱ्यांची कल्पना होती.

"पण एवढ्या काळात तो बिबट्या बुडून मरेल, याची कल्पना आम्ही गावकऱ्यांना दिली," असं वरिष्ठ वनाधिकारी सुरेश वाडेकर यांनी बीबीसीला सांगितलं. बचाव कार्य वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं.

थकलेल्या बिबट्याला काही काळ विश्रांती देण्याचं वाडेकर यांनी ठरवलं.

त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीनं दोन टायर बांधलेली एक फळी विहिरीत सोडली. त्याचा आधार घेत बिबट्या थोडासा विसावला. काही जणांनी ती फळी दोरखंडानं धरून ठेवली. तर काही लोक तेवढ्या काळात खाट शोधायला धावले.

दीड तास त्या बिबट्याला विश्रांती घेऊ दिल्यावर ती खाट विहिरीत उतरवण्यात आली. बिबट्यानं फळीवरून तत्काळ खाटेवर उडी मारली.

"खाट वर येत असताना तो बिबट्या त्यावर शांत बसून वर जमलेल्या लोकांकडे पाहात होता. काठाशी येताच एका क्षणाचाही विलंब न लावता त्यानं बाहेर उडी मारली आणि जंगलात पळून गेला," असं बोरा म्हणाले.

बोरा यांनी आतापर्यंत 100हून अधिक बचाव कार्याचे फोटो काढले आहेत.

Image copyright ANAND BORA
प्रतिमा मथळा या घुबडाची सुटका केल्यावर वनखात्यानं दोन महिने त्याची काळजी घेतली.

बुबळीतलं हे बचाव कार्य एकदम वेगळंच ठरल्याचं बोरा सांगतात. कारण, गावकऱ्यांनी त्या बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देण्याची मागणी केली नव्हती. शिवाय जमलेले सगळे गावकरी शांतपणे घडामोडी पाहात होते.

आधीच्या एका बचाव मोहिमेत बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन दिलं नाही, तर वनाधिकाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी त्या गावकऱ्यांनी दिल्याची आठवण बोरा यांनी सांगितली.

Image copyright ANAND BORA
प्रतिमा मथळा बोरा यांनी आतापर्यंत 100हून अधिक बचाव कार्यांचे फोटो काढले आहेत.

वाडेकर यांनी आजवर 137 बचाव कार्यं केली आहेत. 100 पेक्षा जास्त वेळा गुंगीचं इंजेक्शन वापरावं लागलं. "पण बुबळी हे आदिवासी लोकांचं गाव आहे. ते प्राण्यांविषयी अधिक सजग असतात," असं वाडेकर म्हणाले.

सगळे फोटो आनंद बोरा यांनी काढलेले आहेत.

हे पण वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)