प्रेस रिव्ह्यू : लष्कर-ए-तोयबात गेलेला काश्मिरी तरुण आईच्या हाकेनं घरी परतला

माजिद Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झालेल्या माजिदची 'घरवापसी.'

लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेत गेलेल्या एका काश्मिरी तरुणाने आपल्या आईच्या विनवणीवरून स्वत:ला सैन्याकडे सोपवलं आहे.

मूळ अनंतनागचा रहिवासी असलेला 20 वर्षांचा माजिद खान कॉमर्सचा दुसऱ्या वर्षाचा विद्य़ार्थी आणि त्याच्या क्लबचा एक लोकप्रिय फुटबॉलपटू आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात तो लष्कर-ए-तोयबामध्ये भरती झाला होता. मग हातात AK-47 धरून असलेल्या माजिदचं एक छायाचित्र सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला होता.

यानंतर माजिदच्या आईनं त्याला परतण्याची खूप विनवण्या केल्या. त्यांचं तसं एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

अखेर आपल्या आईच्या हाकेला साद देत माजिद त्यानं शरणागती पत्करली.

पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात माजिदच्या एका मित्राचा मृत्यू झाला होता. या घटनेनं चिडून तो लष्कर-ए-तोयबामध्ये गेला होता, असं भारतीय सेनेनं सांगितलं.

तर 'त्याला आपली चूक कळली आणि तो स्वत:च परतला. म्हणून त्याच्यावर कुठलाही खटला चालणार नाही', असंही सेनेनं पुढे म्हटलं आहे.

माजिदच्या परतण्यावर जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आनंद व्यक्त केला आहे. "आईच्या प्रेमाचा विजय झाला," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

जयललिता यांच्या बंगल्यावर आयकर विभागाची धाड

तामिळनाडूच्या दिवगंत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या पोज गार्डन येथील बंगल्यावर आयकर विभागाने काल रात्री धाड टाकली. त्यांच्या घरातील लॅपटॉप, एक कॉम्प्युटर आणि हार्डडिस्क्स जप्त करण्यात आली आहे, असं वृत्त 'द हिंदू'ने दिलं आहे.

Image copyright Getty Images

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या व्ही. के. शशिकला या याच बंगल्यामध्ये राहत होत्या. सध्या शशिकला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी आढळल्यावर तुरुंगात आहेत.

बंगल्यात असलेल्या कॉम्प्युटर्समधील पुरावे नष्ट करण्याचा कट शिजला आहे, अशी टिप आयकर विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली, असं द हिंदूने म्हटलं आहे.

शुक्रवारी रात्री पडलेल्या या धाडीनंतर थोड्याच वेळातच पोज गार्डनमध्ये अण्णा द्रमुक पक्षातील कार्यकर्त्यांची गर्दी जमली. काही कार्यकर्त्यांनी आयकर विभागाचा निषेध केला तर काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतलं आहे.

देशाची राजधानी नागपूर करा - श्री. श्री. रविशंकर

दिल्लीच्या वाढलेल्या प्रदूषणामुळे देशाची राजधानी नागपूर करण्यात यावी, अशी इच्छा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार रविशंकर नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते.

Image copyright Getty Images

"देशाच्या मध्यभागी असल्यानं नागपूर येण्या-जाण्यासाठी सर्वांनाच सोयीस्कर होईल," असं ते पुढे म्हणाले.

"नागपूरला देशाची राजधानी बनवण्याचा विचार याआधीही झाला आहे. आताही हे शक्य आहे. पंतप्रधानांमध्ये तसं करण्याची कुवत आहे," असं ते यावेळी म्हटले.

भाजपची पहिली यादीजाहीर

भारतीय जनता पक्षानं गुजरात निवडणुकांसाठी 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात 49 विद्यमान आमदारांचा समावेश आहे, पण केवळ चारच महिलांना स्थान देण्यात आलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

बीबीसीसह सर्वच माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार या यादीत 15 नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहेत, तसंच काँग्रेसच्या पाच बंडखोर नेत्यांचाही या यादीत समावेश आहे.

तर आरक्षणासाठी लढणाऱ्या पाटीदार समाजातल्या 16 उमेदवारांचाही या यादीत समावेश आहे.

गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोट पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर उप-मुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाना येथून निवडणूक लढवतील.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)