'गेंड्याची कातडी असेल तर, राजकारणात नेहमी फायदा होतो'

इंदिरा गांधी Image copyright Stf/getty

'इंदिरा गांधी या खूप गंभीर आहेत,' अशी बहुतेकांची धारणा होती. पण त्याउलट त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक, दुसऱ्याची काळजी घेणारं आणि खेळकर असंही होतं. ही गोष्ट खूप कमी लोकांना ठाऊक आहे.

त्या तडाखेबाज होत्या, कणखर होत्या. तरी राजकारणाबाहेरही अनेक गोष्टींमध्ये त्यांना रस होता. कुणालाही भुरळ पडावी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.

त्यांना कलाकार, लेखक, चित्रकार आणि प्रतिभावंतांच्या बरोबर वेळ घालवणं आवडत असे. आणि हो... त्यांची विनोदबुद्धीही तल्लख होती.

31 ऑक्टोबर 1984ला त्यांची हत्या झाली. यानंतर माझ्या आयुष्यातून वसंत पूर्णपणे निघून गेला आहे, असं मला वाटू लागलं होतं.

मी सर्वांशी प्रेमानं वागावं आणि सर्वांचा सन्मान करावा यासाठी त्यांनी मला नेहमी प्रोत्साहित केलं होतं.

मी त्यांचा शतशः आभारी आहे. त्यांनी मला खूप काही शिकवलं. कदाचित मलाही माहीत नसेल त्याहून अधिक मला त्यांच्याकडून मिळालं आहे.

Image copyright Getty Images

जे लोक आयुष्यात खूप तोलून मापून वागतात किंवा समस्या आल्यावर मागे हटतात असे लोक त्यांना आवडत नसत. दांभिकपणा करणाऱ्यांचा तर त्या आपल्या नजरेतूनच पराभव करत असत.

भ्याडपणा त्यांना बिलकुल खपत नसे. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची त्यांच्यात धमक होती. त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय बंधनं झुगारून दिली होती.

28 ऑगस्ट 1968ला त्यांनी मला पहिल्यांदा पत्र लिहिलं होतं. माझा मुलगा - भगतचा जन्म झाला, त्यावेळी अभिनंदन म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलं होतं.

प्रिय नटवर,

जेव्हा मला माझ्या सचिवानं ही आनंदाची बातमी सांगितली त्याचवेळी मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण काही कारणानं बोलणं झालं नाही.

तुमच्या घरात छोटा पाहुणा आल्याबद्दलतुमचं अभिनंदन. तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारचा आनंद येवो आणि तुमचा मुलगा मोठा झाल्यावर उज्ज्वल कामगिरी करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तुमची विश्वासू ,

इंदिरा गांधी

Image copyright Getty Images

27 जानेवारी 1970मध्ये मी इंदिरा गांधी यांना एक चिठ्ठी पाठवली होती. त्यांना काय म्हणून संबोधित करावं, मायना काय असावा याबद्दल मी खूप विचार केला.

प्रिय मॅडम, मॅडम, प्रिय मिसेज गांधी, प्रिय श्रीमती गांधी, प्रिय प्रधानमंत्री... असा खूप विचार करून मी थकून गेलो. शेवटी नोट पाठवावी असा मी विचार केला आणि लिहिलं -

दोन आठवडे झाले आहेत. मी बिछान्यावर पडून आहे. कारण मला स्लिप डिस्कचा त्राससुरू झाला आहे. 11 तारखेला मी माझ्या मुलाला टेडी बिअर उचलून द्यायला खाली वाकलो आणि तेव्हाच हा त्रास सुरू झाला.

मला वाटत असे की, मी 40 वर्षांचा होईतेव्हा माझ्याकडं आनंदी राहण्याची खूप कारणं असतील.माझ्या वेदना कमी होतील. पण मी सध्या दिल्लीपासून दूर आहे. आणि कदाचित त्यामुळे मला अधिक वेदना होत आहेत.

या वेदना असह्य आहेत. कारण मी अंथरुणाला खिळून आहे. हा विचारच त्रासदायक आहे. माझ्याकडे दोन कामं आहेत, एक म्हणजे दिवसभर छताकडे पाहणं आणि दुसरं या छताला रंगरंगोटीची गरज आहे, असा विचार न करणं.

वडील होण्याचे तोटे पण आहेत

तीन दिवसांनी - जानेवारी 30ला इंदिरा गांधींचं मला उत्तर आलं - त्यांनी लिहिलं -

मला माहीत आहे की, तुम्ही सुट्टीवर आहात. पण तुम्ही आजारी सल्याची मला कल्पना नव्हती. स्लिप डिस्क किती वेदनादायी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.

तुम्हाला काय वाटत असेल याचा मला पूर्ण अंदाज आहे पण या गोष्टीमुळं तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करण्याची संधी मिळाली आहे. असा विचार करण्याची गरज प्रत्येकालाच वेळोवेळी पडत असते.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्ण आठवड्यातली लगबग तुम्हाला तर माहीतच आहे. अनेक ज्वलंत मुद्दे असताना आणि परदेशातून व्हीआयपी आलेले असताना दिल्लीतलं वातावरण कसं असतं, याची तुम्हाला कल्पना आहेच.

मी उद्या एका दौऱ्यावर जाणार आहे. तुम्ही लवकर बरं होऊन कामावर याल अशी आशा ठेवते. तुम्हाला आठवतं का? के.पी.एस. मेनन यांची अवस्था तुमच्यासारखी झाली होती.

आता तुम्हाला कळलं असेल वडील होण्याचे काही तोटे देखील आहेत.

जेव्हा यासर अराफत रुसले होते

7 मार्च 1983ला अलिप्तवादी चळवळीची सातवी परिषद होती. ही परिषद दिल्लीतील विज्ञान भवनात झाली होती. मी त्या वेळी सेक्रेटरी जनरल होतो.

Image copyright Getty Images

पॅलेस्टिनी नेते यासर अराफत परिषदेच्या पहिल्याच दिवशी रुसून बसले होते. त्यांच्या भाषणाआधी जॉर्डनच्या राजांचं भाषण झालं होतं.

त्यामुळे त्यांना अपमानित झाल्याप्रमाणं वाटत होतं. याच गोष्टीचा राग त्यांच्या मनात होता.

त्यांनी निर्णय घेतला की, दुपारच्या जेवणानंतर दिल्लीतून निघायचं.

मी पंतप्रधान इंदिरा गांधींना फोन केला आणि विचारलं, "तुम्ही विज्ञान भवनला येऊ शकता का? शक्य असेल तर तुम्ही फिडेल कॅस्ट्रोसोबत या."

Image copyright Getty Images

इंदिरा गांधी फिडेल कॅस्ट्रो यांच्यासोबत विज्ञान भवनाकडे निघाल्या. येताना त्यांनी कॅस्ट्रोंना सर्व हकीकत सांगितली.

कॅस्ट्रोंनी मग यासर अराफत यांच्याशी बोलणी केली. कॅस्ट्रोंनी त्यांना विचारलं, "इंदिरा गांधी यांच्याशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत का?" त्यावर अराफत म्हणाले, "त्या तर मला मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत."

लगेच कॅस्ट्रो त्यांना म्हणाले, "मग तुम्ही देखील लहान भावाप्रमाणे वागा आणि दुपारच्या सत्रात भाग घ्या." त्यांचं ऐकून अराफत यांनी दुपारच्या सत्रात भाग घेतला.

ऑर्डर ऑफ मेरिट

1983मध्ये दिल्लीत कॉमनवेल्थ देशांची परिषद झाली होती. परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी एक प्रश्न आमच्यासमोर येऊन उभा ठाकला.

इंदिरा गांधींच्या कानावर असं पडलं की, इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ मदर तेरेसा यांना ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार राष्ट्रपती भवनात देणार आहेत.

राष्ट्रपती भवनात पुरस्कार प्रदान सोहळ्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. राजकीय शिष्टाचारानुसार राष्ट्रपती भवनात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींनाच आहे.

Image copyright Getty Images

त्यामुळे या सोहळ्याच्या आयोजनाची परवानगी मिळणार नाही, असं तुम्ही ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना सांगा, असं मला इंदिरा गांधींनी सांगितलं.

मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थॅचर यांना तसं सांगितलं. पण थॅचर म्हणाल्या, "आता मी महाराणींना हे सांगू शकत नाही. कार्यक्रमाचं स्थळ बदलण्याची वेळ निघून गेली आहे."

मी ही गोष्ट पुन्हा इंदिरा गांधींना सांगितली. त्या यावर नाराज झाल्या. "जर राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला तर विरोधक संसद डोक्यावर घेतील. महाराणींवरच टीका होईल," ही गोष्ट त्यांना समजावून सांगा, असंही इंदिरा गांधींनी मला सांगितलं.

त्यांच्या या म्हणण्यानंतर आम्ही एक तोडगा काढला. राष्ट्रपती भवनाच्या बगीच्यामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात मदर तेरेसा यांना ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला.

Image copyright Getty Images

पडद्यामागे काय घडामोडी घडल्या? याचा थांगपत्ता मदर तेरेसा यांना लागला नाही हीच आमच्यासाठी समाधानाची गोष्ट होती.

राजकारणात येण्यापूर्वी दिला कानमंत्र

कॉमनवेल्थ परिषदेच्या शेवटच्या दिवशी मी इंदिरा गांधींची वेळ मागितली. मी त्यांना म्हटलं, "मी गेली 31 वर्षं परराष्ट्र सेवेत कार्यरत आहे. आता मला या कार्यातून मुक्त व्हावंसं वाटत आहे. जर तुमची परवानगी असेल तर मला राजकारणात येण्याची इच्छा आहे." त्यांनी मला परवानगी दिली.

मी 28 नोव्हेंबरला त्यांना साऊथ ब्लॉकमध्ये प्रत्यक्ष भेटलो. मी त्यांना सांगितलं, "मी एक दोन दिवसांत भरतपूरला जाईन आणि माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात करेन. सर्वांत आधी मला कपडे खरेदी करावे लागतील. मला कुर्ता-पायजमा घ्यायचा आहे."

हे ऐकताच त्यांनी मला एक सल्ला दिला. त्या म्हणाल्या, "आता तुम्ही राजकारणात पाऊल ठेवतच आहात तर एक लक्षात ठेवा. गेंड्याची कातडी असेल कर राजकारणात नेहमी फायदा होतो. निगरगट्टाप्रमाणे वागलात तर राजकारणात नेहमी यशस्वी व्हाल."

(काँग्रेस नेते नटवर सिंह हे माजी परराष्ट्र मंत्री होते. काही काळासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. इंदिरा गांधींसोबतच्या त्यांच्या आठवणी त्यांनी 'वन लाइफ इज नॉट इनफ' या आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)