स्वतंत्र खलिस्तानचा प्रश्न का आहे पुन्हा चर्चेत?

जगतारसिंग जोहल
प्रतिमा मथळा जगतारसिंग जोहल

३० सप्टेंबर १९८१ची सकाळ! पाकिस्तानच्या लाहोरच्या विमानतळाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात (ATC) अचानक गडबड सुरू झाली. प्रवासी वाहतूक करणारं एक विमान कोणत्याही परवानगीविना पाकिस्तानच्या हद्दीत घुसलं होतं.

काही मिनिटांतच हे विमान लाहोरच्या धावपट्टीवर उतरलं. विमान होतं शेजारच्या देशातल्या इंडियन एअरलाइन्सचं! जम्मू-नवी दिल्ली मार्गावरच्या या विमानाचं अपहरण करून ते थेट पाकिस्तानमध्ये उतरवण्यात आलं होतं.

यामागे कोणत्याही दहशतवादी संघटनेचा हात नव्हता. हे कृत्य होतं स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या शीख जहालवादी तरुणांचं! या घटनेला ३६ वर्षं उलटून गेल्यानंतर पुन्हा स्वतंत्र खलिस्तान, शीख जहालवाद आणि शीख-हिंदू समाजातली दरी, हे प्रश्न चर्चेत आले आहेत.

निमित्त आहे पंजाबमध्ये घडणाऱ्या जगतारसिंग जोहल प्रकरणाचं!

नेमकं झालं काय?

ब्रिटनमधून भारतात लग्नासाठी आलेल्या जगतारसिंग जोहल या ३० वर्षांच्या ब्रिटीश नागरिकाला पंजाब पोलिसांनी अटक केली. पंजाबमध्ये झालेल्या सहा हत्यांमागे जगतारसिंगचा सक्रीय हात असल्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.

प्रतिमा मथळा पंजाब पोलिसांच्या ताब्यात जगतार सिंग

ही अटक झाल्यानंतर पंजाब पोलीस जगतारचा छळ करत आहेत, त्याचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली जात आहे, त्याला विजेचा शॉक दिला जात आहे, अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत.

विशेष म्हणजे, जगतारसिंग जोहल हा ब्रिटीश नागरिक असल्याने या गोष्टीचे पडसाद ब्रिटनमध्येही उमटत आहेत.

इंग्लंडमध्ये शीख समुदायाचा टक्का मोठा आहे. जगतारसिंगच्या भावांना पंजाब पोलिसांनी दाद न दिल्याने आता इंग्लंडमधील शीख समुदायानं निदर्शनं सुरू केली आहेत.

गेल्या गुरुवारी लंडनच्या व्हाइटहॉल इथं जगतारसिंग जोहलच्या सुटकेची मागणी करत अनेक शीख रस्त्यावर उतरले होते. इंग्लंडमधल्या काही खासदारांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Image copyright ARVIND CHHABRA/BBC
प्रतिमा मथळा जगतारसिंगचं कुटुंबीय कोर्टाच्या बाहेर प्रतीक्षा करताना.

पंजाबमधल्या शिखांचीही नेमकी हीच भावना असल्याचं दिसतं.

पंजाबमध्ये हिंदू आणि शीख या दोन समुदायांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अविश्वासाचं वातावरण आहे. त्यामुळेच या घटनेची चर्चा करणं आवश्यक आहे.

हिंदू-शीख समुदायातली दरी

या सगळ्या वादाला किनार आहे ती पंजाबमधल्या हिंदू आणि शीख या दोन्ही समाजांमधली दरीची! या दरीची मुळं इतिहासात आहेत. हा इतिहास साधारण स्वातंत्र्यानंतर सुरू होतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात 1940 मध्ये मुस्लीम लीगच्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला. मग हिंदूंसाठी आणि मुस्लिमांसाठी तयार झालेल्या वेगवेगळ्या देशांमध्ये शिखांना स्वतंत्र स्थान मिळणार नाही, अशी भावना निर्माण झाली. आणि म्हणून शिखांचंही स्वतंत्र राष्ट्र हवं, या विचाराला वाचा फूटली.

त्यानंतर मार्च 1940 मध्ये डॉ. वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑपरेशन ब्लू स्टारला 25 वर्षं झाल्याच्या पार्श्वभूमीवर घोषणा देणारे शीख कार्यकर्ते

पण स्वतंत्र भारतात शीख समुदायाला अर्ध-स्वायत्तता देण्याची ग्वाही महात्मा गांधी यांनी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही 1946च्या कलकत्त्याच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत हीच भूमिका कायम ठेवली. त्यामुळं तेव्हा स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा मागे राहिला.

याच वर्षी एका पत्रकार परिषदेत नेहरू यांनी या भूमिकेत बदल केल्यानं शीख समुदाय नाराज झाला. हिंदूंच्या राज्यात आपल्यावर अन्याय होईल, ही भीती शिखांच्या मनात त्यामुळे आणखीनच बळावली.

स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडी

स्वातंत्र्यानंतरही पंजाब आणि केंद्र सरकारमध्ये अनेक मतभेद झाले. त्यात सतलज, बियास आणि रावी या तीन नद्यांच्या पाण्यावरून वादाचाही समावेश आहे. या नद्यांच्या पाण्यावरून भारत-पाक या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या राज्यांमध्येही वाद होते.

या वादात केंद्र सरकारची भूमिका नेहमीच इतर राज्यांच्या पारड्याकडे झुकणारी असल्याची भावना पंजाबच्या जनतेत बळावत होती, असं बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांनी आपल्या 'अमृतसर - इंदिरा गांधीज् लास्ट बॅटल' या पुस्तकात नमूद केलं आहे.

याच दरम्यान १९५५मध्ये हरमंदिर साहिब म्हणजेच अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ स्वतंत्र पंजाबी सुभ्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने पोलीस पाठवून कारवाई केली. या कारवाईमुळे शिखांच्या अस्मितेला धक्का पोहोचला, असं इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन सांगतात.

हरयाणा राज्याची स्थापन होतानाही पंजाबची राजधानी असलेलं चंदिगढ शहरच दोन्ही राज्यांची राजधानी म्हणून मुक्रर झालं. लाहोर पाकिस्तानात गेल्याने आणि चंदिगढही दोन राज्यांमध्ये विभागल्याने पंजाबमधले शीख दुखावल्याचं बीबीसी न्यूज पंजाबीचे संपादक अतुल संगर यांनी सांगितलं.

हरयाणा राज्याच्या स्थापनेनंतर या दोन राज्यांमध्ये यमुनेच्या पाण्यावरूनही वाद उफाळला होता. यमुना नदी हरयाणा राज्यातून वाहते. त्यामुळे आतापर्यंत पंजाबला मिळणारं यमुनेचं पाणी बंद झाल्याने पंजाबमध्ये नाराजी होती, असंही संगर यांनी सांगितलं.

ऑपरेशन ब्लू स्टार

शीख समाजाला धक्का देणारी मोठी घटना घडली ती १९८४मध्ये! खलिस्तानवादी चळवळीचा नेता आणि शीख तरुणांमध्ये लोकप्रिय संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले याने सुवर्ण मंदिरात आपला डेरा हलवला.

७० आणि ८०च्या दशकात पंजाबमधल्या हिंसक कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. यामागे भिंद्रनवाले यांचा हात होता, असं बोललं जात होतं.

'पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक लाला जगतनारायण यांची हत्या असो किंवा निरंकारी समाजाच्या लोकांवर होणारे हल्ले असोत, पंजाब अस्थिरतेच्या वाटेवर होता. त्यातही हिंदू समाज किंवा सामंजस्याची भूमिका घेणारे शीख यांना लक्ष्य केलं जात होतं', असं मार्क टुली यांच्या 'अमृतसर : इंदिरा गांधीज् लास्ट बॅटल' मध्ये नमूद केलं आहे.

Image copyright Getty Images

अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं बघून भारत सरकारने लष्कराची मदत घेत ऑपरेशन ब्लू स्टार घडवलं. या मोहिमेत लष्कर सुवर्ण मंदिरात घुसलं. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्यांचे अनके अनुयायी मारले गेले.

या कारवाईदरम्यान मंदिरातल्या जुन्या लायब्ररीलाही आग लागली. त्यात अनेक जुनी हस्तलिखितं आणि ग्रंथ जळून राख झाले. प्रत्यक्ष सुवर्ण मंदिराच्या दिशेनेही गोळ्या मारल्या गेल्याने शीख समाजाचा भडका उडाला.

या संपूर्ण कारवाईदरम्यान पंजाबच्या गावागावांमधल्या शीख तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या तरुणांकडे संशयास्पद नजरेनं बघितलं जात होतं.

इंदिरा गांधींची हत्या आणि शीख हिंसाचार

ऑपरेशन ब्लू स्टारची परिणती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येत झाली. त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या घालून ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेतला.

त्यानंतर दिल्लीत आणि पंजाबमध्येही हिंसाचार उफाळला. काँग्रेसच्या लोकांनी शीख समुदायाला लक्ष्य केलं. या हिंसाचारात हजारो शीख मारले गेले. या घटनेमुळे शीख आणि हिंदू यांच्यातली दरी आणखीनच रुंदावली.

Image copyright Getty Images

त्यानंतर तब्बल एक तप शीख अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पंजाबच नाही, तर देश अस्थिर होता. या १२ वर्षांमध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कोणावरही कारवाई झाली नाही.

त्यामुळे आपल्या विरोधात असलेल्या गटांना तत्कालीन केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, अशी सार्वत्रिक भावना शिखांच्या मनात निर्माण झाली.

१९८५मध्ये एअर इंडियाचं एआय-१८२ आयर्लंडच्या आकाशात असताना बाँबने उडवण्यात आलं. त्यामागेही शीख अतिरेक्यांचा हात होता. देशभरातही रेल्वेरूळ उखडून टाकणं, बसवर हल्ला करणं, रेल्वेवर हल्ला करणं अशा अनेक घटना सातत्याने घडत होत्या.

परदेशातल्या शिखांची भूमिका

कॅनडा, अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये शिखांचं प्रमाण लक्षणीय आहे. यापैकी अनेक जण भारतात त्यातही पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही, या कारणामुळे देश सोडून गेले आहेत. काहींनी राजकीय आश्रय घेतला आहे.

पंजाबमधल्या घटनांकडे या शिखांचं बारकाईने लक्ष असतं. १९८४च्या जखमा त्यांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. स्वतंत्र खलिस्तानचं स्वप्न सत्यात यावं, म्हणून हे परदेशस्थ शीख सढळ हस्ते मदतही करतात, असं निरीक्षण इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन यांनी नोंदवलं.

स्वतंत्र खलिस्तानसाठी लढणाऱ्या अनेक संघटना याआधी होत्या. त्यापैकी बहुतांश संघटना सध्या अस्तित्त्वात नाहीत.

स्वतंत्र खलिस्तानसाठी लढत होत्या या संघटना

  • बब्बर खालसा (इंटरनॅशनल)
  • इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन
  • खलिस्तान कमांडो फोर्स
  • ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशन
  • भिंद्रनवाला टायगर फोर्स ऑफ खलिस्तान
  • खलिस्तान झिंदाबाद फोर्स
  • खलिस्तान लिबरेशन फोर्स
  • खलिस्तान लिबरेशन आर्मी
  • दशमेश रेजिमेंट
  • शहीद खालसा फोर्स

(स्रोत - डॉ. गुरूबचनसिंग बछन)

नव्वदच्या दशकात सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेनंतर अनेक संघटनांचं उच्चाटन झालं आहे. तरीही आजमितीला बब्बर खालसा, इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन, दल खालसा आणि भिंद्रनवाले टायगर फोर्स या चार संघटना कार्यरत आहेत.

या सगळ्याच गोष्टींमुळे पंजाबमध्ये शीख आणि हिंदू या दोन्ही समाजांमध्ये मोठी तेढ आहे. ही तेढ उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. एकमेकांबद्दल अविश्वासाचं वातावरण असल्याने हिंदू नेत्यांवर किंवा हिंदू समाजातल्या प्रतिष्ठितांवर हल्ले झाले की, संशयाची सुई आपसूकपणे शिखांकडे वळते.

Image copyright Getty Images

त्यातूनच पोलीस अशा कारवाया करत असल्याचं मत बीबीसी न्यूज पंजाबीचे संपादक अतुल संगर यांनी नोंदवलं. "पोलिसांनी कारवाईसाठी पुढे केलेल्या कारणांत काहीच तथ्य नसेल, असं अजिबातच नाही, पण त्यामुळे दोन्ही समाजांमधली दरी पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे," असं ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)