प्रेस रिव्ह्यू : 'भाजपचा प्रचार ब्लू फिल्म दाखवून, मनसेचा प्रचार ब्लू प्रिंट दाखवून'

राज Image copyright INDRANIL MUKHERJEE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात शनिवारी घेतलेल्या जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

"2014च्या निवडणुकीवेळी मनसेने ब्लू प्रिंट दाखवून प्रचार केला होता तर भाजप आपला प्रचार ब्लू फिल्म दाखवून करत आहे," असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

राज यांचा इशारा गुजरात निवडणुकांच्या आधी आलेल्या हार्दिक पटेल यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाकडे होता. त्यांनी या सभेत मराठीच्या बँकामध्ये होणाऱ्या वापरावरही भाष्य केलं.

प्रत्येक राज्यात बॅंकेचे व्यवहार, हे प्रादेशिक भाषेनुसारच होतात. त्यामुळं महाराष्ट्रात बॅंकांचे व्यवहार मराठीतूनच व्हायला हवे, असे ते म्हणाले.

सर्व पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने आहेत. कारण याच फेरीवाल्यांकडून दोन हजार कोटी रुपयांचा हफ्ता सरकारला जातो, असा आरोप त्यांनी या सभेत केला.

जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या चकमकीत सहा अतिरेकी ठार

जम्मू काश्मीरच्या बंदीपुरात हाजिन भागात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यानं लष्कर-ए-तोयबाच्या सहा अतिरेक्यांना ठार केलं.

शनिवारी झालेल्या या चकमकीत भारतीय वायूसेनेचा एक जवान शहीद झाल्याचं भारतीय सेनेनं म्हटलं.

Image copyright Getty Images

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या एका वृत्तानुसार या हल्ल्यात ओवेद नावाचा एक अतिरेकी ठार झाला आहे, जो 2006च्या मुंबई साखळी बाँबस्फोटांचा मास्टरमाइंड झाकी-उर-रहमान लखवी याचा पुतण्या आहे.

या हल्ल्यात ठार झालेले सर्व अतिरेकी हे पाकिस्तानचे होते, असं काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी म्हटलं आहे.

मूडीज रेटिंगवरून काँग्रेसची भाजपवर टीका

'मूडीज' या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनं नुकतंच भारताच्या पतमानांकनात एका स्तरानं सुधारणा केली आहे. यामुळं एकीकडे भारतीय जनता पक्षात उत्साहाचं वातावरण आहे, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Image copyright Sean Gallup/getty

"मूडीजनं भारताच्या पतमानांकनांत सुधारणा केली असली तरी भारतानं हुरळून जाऊ नये. अजून खूप गोष्टी बाकी आहेत," असं सिंग यांनी म्हटल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

काँग्रेस नेते आणि माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम म्हणाले, "आता भाजप नेते मूडीजचा संदर्भ देऊन स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी काही महिन्यांपूर्वी याच सरकारने मूडीजच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं."

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पुढं ते म्हणाले, "काही महिन्यांपूर्वी अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी मूडीजच्या कार्यपद्धती चुकीची आहे, असं लिहिलं होतं,"

निर्भया फंडातील 90 टक्के निधी वापरलाच नाही

पाच वर्षांपूर्वी नवी दिल्लीत एका 23 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देश हादरला होता. नंतर या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

मग महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारनं निर्भया फंडाची स्थापना केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी हा निधी वापरला जावा, अशी याचा उद्देश्य होता.

Image copyright Getty Images

पण या फंडात जमा झालेल्या 3,100 कोटी रुपयांच्या राखीव निधीपैकी सरकारनं 2015 पासून ते ऑगस्ट 2017 पर्यंत केवळ 264 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असल्याचं वृत्त द प्रिंट या वेबसाईटनं दिलं आहे.

निर्भया फंडाच्या जमाखर्चाच्या तपशिलाबाबत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात एक शपथपत्र सादर केलं. त्या शपथपत्रानुसार महिलांच्या सुरक्षेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीपैकी 8.5 टक्के निधीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)