पाहा व्हीडिओ : BBC Innovators : मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि सार्वजनिक संडासांची देखभाल!

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : मलमूत्रापासून सार्वजनिक शौचालयांची देखभाल

बिहारमध्ये एका संस्थेने शौचालयांची अशी व्यवस्था उभी केली आहे की, त्या मैल्यातूनच शुद्ध पाणी आणि वीजही मिळते. त्यातून शौचालयाच्या देखभालीचा खर्चही निघतो.

भारतात सध्या शौचालयं बांधण्याची लाटच आली आहे. सरकारने देखील लोकांच्या आरोग्यासाठी तसंच 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त व्हावा म्हणून 2000 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.

अशाच एक सामाजिक संस्थेनं भारतातल्या सर्वांत गरीब भागात शौचालयं बांधण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यांचं वेगळेपण म्हणजे ते मलमूत्रापासूनच शौचलयांची देखभाल करतात.

भारतात जवळपास 50 कोटी लोक अजूनही शौचालयांचा वापर करत नाहीत. याचा परिणाम म्हणून अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात.

शौचालयं उपलब्ध नसल्याने लहान मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. स्त्रियांना आडरानात शौचाला जावे लागल्यामुळे एकट्यानं गाठून कोणी हल्ला करेल अशा भीतीला सतत तोंड द्यावं लागतं.

प्रतिमा मथळा श्री संस्थेने बांधलेला पहिला शौचालय प्रकल्प

म्हणूनच सरकारी प्रयत्नांसोबतच सॅनिटेशन अॅण्ड हेल्थ राईट्स म्हणजेच 'श्री'सारख्या संस्था अनेक नवे उपक्रम राबवत आहेत.

शौचालयांची देशभाल

श्री संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असणारे प्रबीन कुमार जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांना शाळेत पोहचायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. कारण त्यांना शौचाला एक किलोमीटर लांब नदीकिनारी जावे लागायचे.

आज ते बिहारमध्ये अशी शौचालयं बांधत आहेत जी लोकांना मोफत वापरता येतील.

सरकारने बांधलेल्या अनेक शौचालयांची दुरवस्था झाली आहे, कारण त्यांच्या स्वच्छतेचा आणि देखभालीचा प्रश्न आहे.

श्री संस्थेने बांधलेली शौचालयं मात्र वेगळी आहेत. त्यातला मैला वाहून जाण्याऐवजी एक जैविक प्रक्रिया करणाऱ्या यंत्रांत जातो.

या जैविक प्रक्रिया करणाऱ्या यंत्राद्वारे वीजनिर्मिती केली जाते. ही वीज पंपाद्वारे जमिनीतलं पाणी उपसण्यासाठी दिली वापरली जाते. हेच पाणी नंतर शुद्ध करून पन्नास पैशाला लीटर अशा दरात लोकांना होतं.

या पाण्याच्या विक्रीतून येणारा पैसा शौचालयाच्या देखभालींसाठी वापरला जातो. श्री संस्था सध्या दिवसाला 3000 लीटर पाण्याची विक्री करते.

सार्वजनिक शौचालये

2010 मध्ये प्रबीन कुमार आणि त्यांचे सहसंस्थापक चंदन कुमार यांना कॅनडा जन्मलेले इंजिनिअर अनुप जैन भेटले.

प्रतिमा मथळा बिहारच्या बेले मसारी खेड्यात मैल्यावर जैविक प्रक्रिया करणारे यंत्र बसवताना.

चार वर्षांनी त्यांनी त्यांचा पहिला सार्वजनिक शौचालयाचा प्रकल्प बिहारच्या सौपाल जिल्ह्यातल्या नेमुआ गावात उभा केला. यात पुरुषांसाठी आठ आणि महिलांसाठी आठ अशी शौचालयं होती.

हा प्रकल्प सकाळी चार ते रात्री आठपर्यंत सुरू असतो.

प्रबीन कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत पाच गावांमध्ये शौचालय बांधली आहेत. दिवसभरात त्यांचा 800 वेळा वापर होतो, असं ते सांगतात.

प्रत्येक शौचालय प्रकल्प उभारण्याचा खर्च 30,000 डॉलर्स आहे. पण शुद्ध पाणी विकण्याच्या पैशातून या शौचालयांची देखभाल करता येते. म्हणजे एकदा बांधलं की, या शौचालयांवर नंतर वेगळा खर्च करायलवा नको.

"ज्या ठिकाणी अजून सरकारी शौचालयं बांधली गेली नाहीत अशा खेड्यांची निवड आम्ही करतो," चंदन कुमार सांगतात.

शौचालयं बांधण्याआधी ते या गावांमध्ये जनजागृती करतात. याचं कारण म्हणजे बऱ्याचदा लोकांच्या स्वच्छतेच्या सवयी त्यांच्या परंपरा आणि सामाजिकतेशी निगडीत असतात. फक्त शौचालयाची सुविधा नाही म्हणून लोक शौचालयाचा वापर करत नाही असं नसतं, असंही ते म्हणतात.

उद्योजकांच्या नव्या कल्पना

"नवीन कल्पनांसाठी आम्ही उद्योजकांवर अवलंबून असतो," युनिसेफ, इंडियाचे निकोलस ऑसबर्ट सांगतात.

"त्यांच्याकडे बिझनेस कसा करावा याच्या भन्नाट कल्पना असतात. त्यांना नुसतं तांत्रिक बाबींचं ज्ञान असतं असं नाही तर त्यांना त्यांच्या नवीन कल्पनांचं प्रमोशनही करता येतं."

ऑसबर्ट यांना वाटतं की, मैल्यावर जैविक प्रक्रिया करणाऱ्या यंत्रासारखी कल्पना आकर्षक असली तरी ती हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात अडचण येऊ शकते.

प्रतिमा मथळा श्रीच्या संस्थापकांना वाटत की त्यांची कल्पना संपूर्ण भारतात राबवली जाऊ शकते.

पण श्री संस्थेच्या टीमची स्वप्नं मोठी आहेत. "आमची कल्पना अजून मोठ्या प्रमाणावर राबवली जावी म्हणून सरकारसोबत काम करण्याची आमची योजना आहे," अनुप जैन सांगतात.

"सरकारने आम्हाला आणखी शौचालयं बांधायला निधी द्यावा अशी आमची इच्छा आहे."

"या शौचालयांची देखभाल लोकच करतील. ही शौचालयं वापरली जातील आणि त्यांची देखभाल होईल याची काळजी श्री घेईल."

"आपल्या समाजाला 100 टक्के हागणदारीमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे," श्रीचे सहसंस्थापक चंदन कुमार सांगतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)