#BBCGujaratOnWheels पाहा व्हीडिओ : असा गुजरात जिथं जीपमध्येच होते प्रसूती

व्हीडिओ कॅप्शन,

#BBCGujaratOnWheels : असा गुजरात जिथं जीपमध्ये होतो बाळांचा जन्म

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार युवती बीबीसीच्या टीमसह गुजरातमधून बाईक राईड करत स्त्रिया आणि तरुणांचे प्रश्न जाणून घेत आहेत.

पहिल्या दिवशी त्या बनासकांठा जिल्ह्याकडे त्या निघाल्या. गुजरातच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या बनासरकांठा जिल्ह्याची सीमा राजस्थानला भिडलेली आहे.

गुजरातच्या आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, साक्षरता आणि राजकारण या सर्वय क्षेत्रात या जिल्ह्याचं योगदान मोठ आहे. पण या जिल्ह्यात सारंच काही आलबेल नाही.

इथं महिला साक्षरतेचं प्रमाण फक्त 51टक्के आहे. इतर जिल्ह्यांशी तुलना करता हे प्रमाण फारच कमी आहे. तसंच पालनपूर इथलं सरकारी हॉस्पिटल सोडलं तर इथं दुसरं मोठं सरकारी हॉस्पिटल नाही.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, पण तिथं डॉक्टरांची कमतरता आहे. परिस्थिती अशी आहे की, गरदोर महिलांना हॉस्पिटलमध्ये नेताना वाहनातच प्रसूती होण्याची उदाहरणंही बरीच आहेत. बऱ्याच लोकांनी याला दुजोरा दिला.

कोण आहेत या महिला?

बीबीसीच्या टीमसोबत चार महिला बायकर्स गुजरातच्या ग्रामीण भागांतून फिरत आहेत. स्त्रियांचे आणि तरुणांचे प्रश्न त्या जाणून घेत आहेत आणि जगासमोर आणत आहेत. कोण आहेत या बायकर महिला?

ट्विंकल कापडी

32 वर्षांच्या ट्विंकल बायकर आणि सोलो ट्रॅव्हलर आहेत. याशिवाय त्या नवउद्यमी आहे. 15 व्या वर्षीच आपलं सामान उचलून त्या जग फिरण्यासाठी बाहेर पडल्या.

आपल्या बुलेटवरून त्यांनी 65 हजार किमीचा प्रवास केला आहे. आपल्या लाडक्या बुलेटचं नाव त्यांनी बेंजीन असं ठेवलं आहे.

लिन्सी माइकल

लिन्सी 41 वर्षांच्या आहेत. यामाहावर भारतभर फिरल्या आहेत. प्रवास हीच त्यांची पॅशन आहे. नोकरीत चांगलं यशस्वी होऊनही त्या रमल्या नाहीत.

आपल्या स्वप्नांना पंख मिळू शकत नाहीत, पण चाकं तर मिळू शकतात, हे लक्षात आलं त्या दिवशी त्यांनी नोकरी सोडली आणि भटकंती सुरू केली. 30 हजार किमी एवढा प्रवास त्यांनी बाईकवरून केला.

श्लोका दोषी

#BBCGujaratOnWheels सीरीजमधली या सर्वात तरुण टीम मेंबर. 22 वर्षीय श्लोका सांगते की, इतर मुलींप्रमाणे फार काळजी करत मला वाढवण्यात आलं नाही. कायम आपल्या मनाचं ऐक असं सांगत मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं.

16 वर्षी पहिल्यांदा बुलेट हाताळली आणि मग ते वेडच लागलं. वडिलांनी हे पाहिल्यावर 18व्या वर्षीच तिला बुलेट घेऊन दिली. दीव, सुरत, मुंबई, गोवा, सिल्वासा आणि बडौदा इथं 16 हजार किमी प्रवास तिनं केला आहे.

मोनिका अस्वानी

42 वर्षांच्या मोनिका कच्छमध्ये शिक्षिका आहेत. 29 व्या वर्षापासून त्या बुलेट चालवत आहेत. पेशानं शिक्षक असल्या तरी त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे.

घरगुती हिंसाचाराविरोधात महिलांचं समुपदेशन करण्याचं कामही मोनिका करतात. नोकरी आणि बाईक रायडिंगची पॅशन एकमेकांच्या आड येऊ न देता त्या आपली आवड जपत आहेत.

(बीबीसीचे शालू यादव, नेहा शर्मा, आमीर पीराजादा यांचा रिपोर्ट)

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)