ग्राऊंड रिपोर्ट : किती स्वच्छ आहे मोदींचं वडनगर शहर?

  • प्रियंका दुबे
  • बीबीसी प्रतिनिधी, वडनगर
सार्वजनिक संडासाची अवस्था
फोटो कॅप्शन,

सार्वजनिक संडासाची अवस्था

'स्वच्छ भारत अभियान' ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना. पण, या अभियानाचा झगमगाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर शहरात फिका पडलेला दिसतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव असल्यानं गुजरात सरकार वडनगरचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करत आहे.

वडनगरच्या रोहितवास या दलित वस्तीत प्रवेश करताना स्मार्टफोनवर 'वडनगर वायफाय'चा सिग्नल मिळत असतो. पण इथं संडासला कुठं जायचं, असं विचारल्यावर इथले लोक एका मोकळ्या मैदानाकडे बोट दाखवतात.

उघड्यावर जाण्या महिल मजबूर

सुमन, हेत्वी, मोनिका, बिस्वा, अंकिता आणि नेहा या शालेय विद्यार्थिनी वडनगरच्या रोहितवास वस्तीत राहतात. या सगळ्या मुलींना संडासविषयी विचारल्यावर त्या वस्तीजवळच्याच एका मोठ्या मोकळ्या मैदानाकडे घेऊन गेल्या.

रोज सकाळी संडासासाठी याच मैदानावर यावं लागतं, असं त्या सांगतात.

रोहितवास वस्तीच्या परिसरात असलेलं मोकळं मैदान
फोटो कॅप्शन,

रोहितवास वस्तीच्या परिसरात असलेलं मोकळं मैदान

वडनगरच्या रहिवासी असलेल्या 30 वर्षांच्या दक्षाबेन म्हणतात, "रोहितवासमधली सगळी गटारं उघडी आहेत. लहान मुलीच नव्हे तर मोठ्या मुलींनाही उघड्यावर संडासला जावं लागतं. आम्हाला एकतर राहण्यासाठी घर नाही, तसंच इथं संडास बांधण्यासाठी आतापर्यंत कुणी आलं सुद्धा नाही."

आश्वासनं हवेतच विरली

दक्षाबेनच्या शेजारी उभ्या निर्मलाबेन म्हणतात, "मोदी सरकारनं जी आश्वासनं दिली होती, ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की प्रत्येकाला घर दिलं जाईल आणि संडासही बांधण्यात येईल. पण ना घर मिळालं ना संडास बांधले गेलं. एकही आश्वासन पूर्ण झालं नाही."

गेल्या 8 ऑक्टोबरला मोदी वडनगरच्या दौऱ्यावर गेले होते. त्याचा उल्लेख करत त्या पुढे म्हणाल्या, "आता निवडणुका आल्या आहेत तर त्यांना आठवण झाली की, 'चला आपलं गावं वडनगरला पण फिरून येऊ'. नाही तर इतक्या वर्षांपासून आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कुणीही फिरकलं नाही."

वडनगरमधील रोहितवास वस्ती
फोटो कॅप्शन,

वडनगरमधील रोहितवास वस्ती

वडनगर नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात अंदाजे 30,000 लोक राहतात. पण इथल्या रहिवाशांच्या मते जवळपास 500 घरांमध्ये अजूनही संडास नाही.

संडासची व्यवस्था नसलेल्या घरांमध्ये वडनगरमधील रोहितवास, ठाकुरवास, ओडवास, भोयवास आणि देवीपूजकवास यासारख्या दलित आणि मागासवर्गीयबहूल वस्त्यांचा समावेश आहे.

कोट्यावधींच्या योजना पण जीवनमान किती बदललं?

रोहितवास वस्तीत मी उघडी आणि तुंबलेली गटारं सर्वत्र पाहिली. एका ओबडधोबड रस्त्यावरून पुढं जाताना मी काही महिलांना भेटले, ज्या घराबाहेर कपडे धुत होत्या.

उघड्या गटारी
फोटो कॅप्शन,

उघडी गटारं

वैद्यकीय सुविधांसह अद्ययावत तंत्रज्ञानाची नांदी असेल, असं एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ बनवण्यासाठी केंद्र सरकारनं वडनगरमध्ये वेगवगेळ्या विकास योजना आखल्या आहेत.

त्यासाठी नुकताच 550 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही झाली होती. यामध्ये नवीन रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी 450 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

पण, संडासला जाताना वापरण्यात येणारा लाल डब्बा दाखविणाऱ्या 70 वर्षीय मानीबेन यांच्या जीवनात या सगळ्या घोषणांनी आतापर्यंत कुठलाही सकरात्मक बदल झालेला नाही.

मानी बेन यांना वडनगरसाठी मंजुर झालेल्या विकास योजना माहित नाही.
फोटो कॅप्शन,

मानीबेन यांना वडनगरसाठी मंजुर झालेल्या विकास योजना माहीत नाहीत.

मानीबेन यांच्यासोबतच उभ्या असलेल्या लक्ष्मीबेन, अडकीबेन आणि अमीबेन यांनाही वडनगरसाठी मंजूर झालेल्या या योजनांची कुठलीही माहिती नव्हती.

विकासाच्या या घोडदौडीपासून अनभिज्ञ असलेल्या या महिलांना आजही त्यांच्या घरांमध्ये फक्त एक पक्क संडास बांधून मिळण्याची प्रतीक्षा आहे.

रोहितवासच्या रहिवाश्यांना हवीत घरं आणि पक्के संडास
फोटो कॅप्शन,

रोहितवासच्या रहिवाशांना पाहिजेत पक्की घरं आणि संडास

रोहितवासच्या या सर्व महिलांना मी विचारलं की, गुजरातच्या या निवडणुकीसाठी वडनगरचा पंतप्रधानांसाठी काही संदेश आहे का. तेव्हा सगळ्यांनी एका सुरात पक्क संडास निर्माण करण्याची मागणी केली.

मी तिथून परतत असताना लक्ष्मीबेन हळू आवाजात म्हणाली, उघड्यावर संडासला जाण्यासाठी लाज वाटते. त्यामुळेच या निवडणुकीत त्यांच्यासाठी सर्वांत मोठा मुद्दा हा पक्क संडास बांधून मिळावा हाच असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)