उत्तर कोरिया ते अयोध्या : माध्यमांमध्ये आज आलेल्या जगभरातल्या पाच मोठ्या बातम्या

बाबरी मशीद Image copyright AFP

अयोध्येपासून अमेरिकेपर्यंत, काश्मीरपासून ते नाशिकपर्यंत, माध्यमांमध्ये आज प्रसिद्ध झालेल्या जगभरातल्या प्रमुख बातम्यांचा घेतलेला हा आढावा.

1. अयोध्येत 'राम' तर लखनौमध्ये 'रहीम' : वफ्फ बोर्डाचा प्रस्ताव

अयोध्येत राम मंदिर बांधावं आणि लखनौमध्ये मशीद, असा प्रस्ताव शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी मांडला आहे.

विविध पक्षांशी चर्चा करून आम्ही हा प्रस्ताव ठेवला आहे, असं रिझवी यांनी सांगितल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

हा प्रश्न शांततेनं आणि समजुतीनं हा प्रश्न सोडवण्यात यावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे हा प्रस्ताव सोपवण्यात आल्याचं रिझवी यांनी म्हटलं. त्यानुसार अयोध्येतल्या विवादित जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं. आणि लखनौमध्ये एक मशीद बांधण्यात यावी, जिचं नाव 'मस्जिद-ए-अमन' राहील, असं रिझवी यांनी म्हटलं आहे.

या प्रस्तावावर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वफ्फ बोर्डानं नाराजी व्यक्त केली आहे.

2. काश्मिरात हिंसेची वाट सोडणाऱ्याला माफी शक्य

माजिद खान या काश्मिरी फुटबॉलपटूनंतर आणखी एक तरुण जहालवादी गट सोडून घरी परतल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झालेल्या माजिदची 'घरवापसी.'

जहालवादी गटांमध्ये गेलेल्या अशा तरुणांना जर शरणागती पत्करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार नाही, असं काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं.

मात्र शरणागती पत्करणाऱ्या प्रत्येक तरुणाची केस वैयक्तिकरीत्या तपासली जाईल, असंही वैद म्हणाले.

3. उत्तर कोरिया दहशतवादाचा प्रायोजक: डोनाल्ड ट्रंप

उत्तर कोरिया हा दहशतवादाचा प्रायोजक आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी घोषित केलं आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
डोनाल्ड ट्रंप यांनी क्षेपणास्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियावर जोरदार टीका केली.

बीबीसी वर्ल्ड न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार नऊ वर्षानंतर अमेरिकेनं पुन्हा उत्तर कोरियाला दहशतवादाचा प्रायोजक घोषित केलं आहे.

ही गोष्ट याआधीच व्हायला हवी होती, असं ट्रंप म्हणाले.

गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने केलेल्या सततच्या मिसाईल चाचण्यांमुळे अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

4. गाय मारली म्हणून शेतकऱ्याने घेतला दोन वाघांचा जीव?

केवळ हजार रुपयांमुळे नागपूरच्या रामटेक तालुक्यात दोन वाघांचा बळी गेल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

आनंद मडावी या शेतकऱ्याच्या एका गाईला वाघानं मारलं. त्याचा मोबदला मिळावा म्हणून मडावी यांनी शासनाकडं धाव घेतली. पण पवनी परिक्षेत्रातील वनपाल उइके यांनी मोबदल्यासाठी मडावींकडून हजार रुपयांची लाच मागितली. ती फाईल तिथंच अडकली.

त्यातच वाघाच्या आणखी एका हल्ल्यात मडावी यांची एक म्हैस जखमी झाली, आणि तिसऱ्यांदा वाघानं मडावी यांची आणखी एक गाय ठार केली.

दोन गाई गेल्या आणि तरीही मोबदला मिळाला नाही, याचा राग मनात धरून मडावी यांनी दुसऱ्या गाईच्या अवशेषांवर युरिया टाकला. या गाईचं युरिया टाकलेलं मांस वाघ-वाघिणीच्या जोडीनं खाल्लं आणि त्यात ही जोडी त्यांचा मृत्यू.

हजार रुपयांमुळे फाईल अडकवणाऱ्या अधिकाऱ्यामुळं दोन वाघांचा बळी जाणं, ही बाब संतापजनक असल्याचं व्याघ्र्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

"दोन वाघांचा मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे. वाघांच्या मृत्यूबाबतची शक्यता आम्ही तपासत आहोत. या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे." असं नागपूर वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी मटाला सांगितलं.

वाघांचे मृतदेह तपासण्यासाठी गेलेल्या श्वानाचाही मृत्यू झाला. त्याच्याही पोटात युरिया गेलं असावं, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

5. इनोव्हामध्येच उघडलं गर्भलिंग निदानकेंद्र

नाशिकच्या सातपूरमध्ये एका डॉक्टरनं इनोव्हा कारमध्येच सोनोग्राफीचं मशीन बसवून गर्भलिंग निदानचाचणी केंद्र उघडलं आहे.

दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. तुषार पाटीलच्या शांकुतल डायग्नॉस्टिक सेंटरला सील ठोकलं आहे.

या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिव्य मराठीला सांगितलं आहे.

आणखी वाचा :

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)