दलवीर भंडारीबाबात या 14 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

न्यायालय, विधी, कायदा Image copyright ICJ
प्रतिमा मथळा न्यायाधीश दलबीर भंडारी

भारताच्या दलवीर भंडारी यांची 'इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस' (ICJ) च्या न्यायाधीशपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. ICJ च्या या पदासाठीच्या शर्यतीत असलेल्या क्रिस्तोफर ग्रीनवूड यांचं नाव सोमवारी इंग्लंडनं मागे घेतलं.

काही दिवसांपूर्वीच ICJ नं पाकिस्तानच्या अटकेतील भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. ICJच्या त्या 15 न्यायाधीशांमध्ये भंडारी यांचाही समावेश होता.

भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2018 पर्यंत आहे. दुसऱ्या कार्यकासाठी भंडारी आणि ग्रीनवूड यांच्यात कडवी टक्कर होती.

ग्रीनवूड यांना सुरक्षा परिषदेचा तर भंडारी यांना संयुक्त राष्ट्र महासभेचा पाठिंबा होता. ग्रीनवूड यांनी माघार घेतल्यामुळे भंडारी यांच्या दुसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Image copyright ICJ
प्रतिमा मथळा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसचे कार्यालय

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरून भंडारी यांचं अभिनंदन केलं आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना 1945 मध्ये झाली होती. इंग्लंडचे न्यायाधीश या न्यायालयात कार्यरत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ICJच्या 15 न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीश आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करतात. दोन न्यायाधीश अमेरिका तर दोन पूर्व युरोपातील आहेत. पाच न्यायाधीश पश्चिम युरोप आणि अन्य प्रदेशातील आहेत.

कोण आहेत दलबीर भंडारी?

 1. पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित भंडारी गेल्या 40 वर्षांपासून भारतातील न्यायव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहेत.
 2. वकील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अशा विविध भूमिकांना त्यांनी समर्थपणे न्याय दिला आहे.
 3. 1973 ते 1976 या कालावधीत राजस्थानच्या उच्च न्यायालयात कार्यरत भंडारी यांनी त्यानंतर दिल्ली गाठली. त्यानंतर दिल्लीच्या कोर्टात प्रॅक्टीस केली. 1991 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भंडारी यांची नियुक्ती झाली.
 4. यानंतर भंडारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
 5. मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यकाळानंतर भंडारी 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
 6. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयानंतर भंडारी ICJचे न्यायाधीश झाले. 2012 मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी प्रचंड मताधिक्याने निवडून आले.
 7. निवडणुकीत भंडारी यांना 193 देशांपैकी 122 देशांचा पाठिंबा मिळाला. आता न्यायाधीश भंडारी यांचा कार्यकाळ 2018 पर्यंत असणार आहे.
 8. भंडारी यांच्याआधी 1988-90 मध्ये भारताचे सरन्यायाधीश आर.एस. पाठक यांनी ICJमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिले होतं.
 9. भंडारी यांच्या ICJ नियुक्तीवेळी वाद निर्माण झाला होता. भंडारी यांचं नामांकन रद्द व्हावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती.
 10. भंडारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. यामुळे ICJ न्यायाधीशपदासाठीच्या निवडणुकीसाठी सरकारकडून भंडारी यांच्या नावाची शिफारस आणि प्रचार न्यायव्यवस्थेच्या नि:पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे असं याचिकेत म्हटलं होतं.
 11. मात्र इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसचे न्यायाधीश म्हणून भंडारी यांची नियुक्ती होण्याच्या एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाच्या अल्तमस कबीर, जे. चेलामेश्वर आणि रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं भंडारी यांच्या विरोधातली याचिका फेटाळून लावली.
 12. भारतात शिक्षण झाल्यावर भंडारी यांनी अमेरिकेतल्या शिकागोच्या नॉर्थ वेस्टर्न विश्वविद्यालयातून कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा भंडारी यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.
 13. इंटरनॅशनल लॉ असोसिएशनच्या भारत विभागाचे भंडारी हे सदस्य आहेत. 2007 मध्ये इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी त्यांची एकमतानं निवड झाली होती.
 14. भंडारी यांनी 'ज्युडीशियल रिफॉर्म्स : रिसेंट ग्लोबल ट्रेंड्स' हे पुस्तक लिहिले आहे.

हे वाचलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)