उत्तर कोरियाच्या लष्करात बलात्कार आणि पाळी थांबणं नेहमीचं होतं - माजी महिला सैनिक

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, लष्कर Image copyright Reuters
प्रतिमा मथळा यालू नदीजवळ तैनात उत्तर कोरियाच्या लष्करात कार्यरत महिला सैनिक.

"बलात्कार हा दैनंदिन आयुष्याचा भाग झाला होता. अनेक जणींना मासिक पाळी येणं बंद झालं," हे उद्गार आहेत उत्तर कोरियाच्या लष्करात काम केलेल्या एका महिला सैनिकाचे.

उत्तर कोरियाचं लष्कर हे जगातल्या चौथ्या क्रमांकाचं लष्कर आहे.

त्या लष्करात सुमारे दहा वर्षं काम केलेल्या ली सो येऑन यांनी धक्कादायक अनुभव सांगितले आहेत.

दोन डझनहून अधिक बायकांसमवेत त्या राहत असत. सगळ्यांना झोपण्यासाठी साध्या खाटा दिल्या होत्या.

प्रत्येक महिलेला गणवेश ठेवण्यासाठी छोटे खण मिळत.

या खणांवर उत्तर कोरियाचे संस्थापक किम-इल-संग आणि वारसदार किम-जोंग-उन या दोघांची छायाचित्रं लावणं सक्तीचं होतं.

दशकभरापूर्वी त्यांनी लष्करातली नोकरी सोडली. मात्र त्या नोकरीच्या काळातले ते भीषण अनुभव त्या आजही विसरलेल्या नाहीत.

"आम्हाला प्रचंड घाम येत असे. साळीपासून अर्थात भाताच्या कोंड्यापासून तयार केलेल्या गाद्यांवर आम्ही झोपत असू. त्यामुळे शरीराचा दुर्गंध अंथरुणात जात असे."

"एरव्ही गाद्या कापसाच्या असतात. पण आम्हाला साळीपासून तयार केलेल्या गाद्यांवर झोपावं लागत असे. त्यामुळे घाम आणि शरीरातून निघणारा दुर्गंध नेहमीच वातावरणात राही."

"कपडे धुण्यासाठी चांगली व्यवस्था नव्हती. एक महिला म्हणून जाणवलेली अडचण म्हणजे आम्हाला नीट आंघोळही करता येत नसे."

"कारण आंघोळीकरता गरम पाणी मिळत नसे. झाडांना पाणी घालण्यासाठी जसा पाईप असतो तशा नळीतून थेट पाणी अंगावर घेऊन आम्ही आंघोळ करायचो."

"या नळीतून अनेकदा साप आणि बेडूक बाहेर येत."

'दुष्काळामुळे होते मजबूर'

ली सो येऑनचे वडील विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचं बालपण उत्तर कोरियाच्या उत्तरेकडच्या भागात गेलं.

Image copyright Shutterstock
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाच्या लष्करात येणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढत आहे.

त्यांच्या कुटुंबातले अनेकजण लष्करात होते. नव्वदीच्या दशकात दुष्काळानं थैमान घातलेलं असताना ली सो यांनी वेगळा विचार केला.

दररोज जेवण मिळेल, याची खात्री देणारी नोकरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या वयाच्या बहुतांश मुलींनी असाच विचार केला.

"दुष्काळामुळे महिलांची परिस्थिती बिकट झाली. अनेक महिलांना रोजंदारीच्या कामांना जुंपून घ्यावं लागलं. यामुळे लैंगिक शोषण, छळ यासारखे प्रश्न निर्माण झाले," असं 'नॉर्थ कोरियाज् हिडन रिव्हॉल्यूशन' या पुस्तकाच्या लेखिका जियुन बेइक यांनी सांगितलं.


पळून जाणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा?

ली सो यिऑन यांच्याप्रमाणे अनेकींची व्यथा आहे. मात्र प्रत्येक कहाणी समजून घेण्यापूर्वी शहानिशा करणं आवश्यक आहे, असं ज्युलिएट मोरिलेट आणि जियुन बेइक यांनी सांगितलं.

उत्तर कोरियात जीवनमान नक्की कसं आहे, हे जाणून घेण्याची अन्य देशांना इच्छा आहे. लोकांना आमिष दाखवून अतिशयोक्त स्वरुपाची कहाणी ऐकवली जाते.

पैशाचं आमिष असेल तर लोक कहाणी रंगवून सांगण्याची शक्यता असते. त्यामुळे कहाणीची आणि ती सांगणाऱ्या व्यक्तीची वैधता तपासणं अत्यावश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तसंच, उत्तर कोरियातल्या सूत्रांकडून मिळणारी माहिती तिथल्या सरकारची भलामण करणारी असू शकतो.

ली सो यिऑन यांना या मुलाखतीसाठी बीबीसीनं कोणत्याही स्वरुपात पैसे देऊ केलेले नाहीत.


राष्ट्रवादाची कास आणि एकत्रित विचार म्हणून 17 वर्षीय ली सो यांनी लष्करात सामील होण्याचा निर्णय घेतला.

"लष्करी आयुष्य त्यांना आवडलंही. केसांसाठी हेअरड्रायर मिळण्याचा अनुभव सुखावणारा होता."

"मात्र वीजपुरवठा सातत्यानं खंडित होत असल्यानं हेअरड्रायर वापरण्याची संधी फारच कमी वेळा मिळत असे."

"लष्करात पुरुष आणि महिलांची दिनचर्या बहुतांशी सारखीच असे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी श्रमाचं शारीरिक ड्रील असे. "

"मात्र महिलांना साफसफाई, स्वयंपाक ही कामं करावी लागत. पुरुष कर्मचाऱ्यांची त्यातून सुटका असे."

Image copyright Sipa press/ shutterstock
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाच्या लष्करात काम करणं अवघड आहे.

उत्तर कोरिया हा पारंपरिक व्यवस्था अर्थात पुरुषप्रधान संस्कृती मानणारा देश आहे. पुरुष आणि स्त्रियांची कामं ठरलेली असतात.

यानुसार 'रांधा, वाढा, उष्टी काढा' यापुरतं महिलांचं आयुष्य मर्यादित ठेवण्यात आल्याचं, 'नॉर्थ कोरिया इन हंड्रेड क्वेश्चन्स' या पुस्तकाच्या लेखिका ज्युलिएट मोरिलेट यांनी सांगितलं.

कुपोषणामुळे थांबायची पाळी

खडतर प्रशिक्षण आणि अपुरा आहार यांचा परिणाम लष्करात काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर झाला.

"लष्करात वर्षभर काम केल्यानंतर आम्हाला मासिक पाळी येणं बंद झालं. याचं मुख्य कारण कुपोषण आणि तणावपूर्ण वातावरण हे होतं."

आपल्याला पाळी येणं बंद झालं याचं महिला सैनिकांना बरं वाटलं. कारण काम करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नव्हतीच.

पाळी येत असती तर असलेल्या समस्यांमध्ये शारीरिक अडचणीची भर पडली असती. तो त्रास टळला.


कोण पळून जातात?

  • उत्तर कोरिया लष्करात काम करणाऱ्या महिलांपैकी सत्तर टक्के महिला नोकरी सोडून देतात. महिलांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण अधिक का आहे? याचं उत्तर या आकडेवारीत आहे.
  • लष्करातून पळ काढून सोडून जाणाऱ्या महिलांपैकी निम्म्याजणी विशी किंवा तिशीत असतात. जेणेकरून पोहू शकतात किंवा प्रतिकूल हवामानाचा सामना करून प्रवास पूर्ण करू शकतात.

मासिक पाळीसंदर्भात महिलांना काही सुविधा देण्यात उत्तर कोरियाचं लष्कर असमर्थ ठरलं.

त्यामुळेच बहुतांशी महिला कर्मचाऱ्यांना एकदा वापरलेले सॅनिटरी पॅड्स पुन्हा वापरावे लागत, असं ली सो यिऑन यांनी सांगितलं.

उत्तर कोरियाच्या लष्करात काम करणाऱ्या महिला आजही मासिक पाळीदरम्यान पारंपरिक पांढरं कापड वापरतात. हे कापड पाळीदरम्यानच्या दिवसात रोज धुवावं लागतं.

"पुरुषांच्या नजरांपासून लपवत हे करावं लागतं. यामुळे महिला कर्मचारी लवकर उठून हे काम करतात," असं ज्युलिएट यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच ज्युलिएट लष्करी तळाला भेट देऊन आल्या आहेत. असंख्य महिला कर्मचाऱ्यांनी मासिक पाळी नियमितपणे चुकत असल्याचं ज्युलिएट यांनी सांगितलं.

20 वर्षांच्या एका मुलीनं सांगितलेला अनुभव अस्वस्थ करणारा होता. तिला एवढं खडतर प्रशिक्षण देण्यात आलं की दोन वर्षं तिला मासिक पाळी आलीच नाही.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा लष्करात काम करणं उत्तर कोरियातल्या नागरिकांसाठी सक्तीचं आहे.

ली सो यिऑन यांनी स्वत:हून लष्करात काम करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र 2015 पासून उत्तर कोरियानं यासंदर्भात एक आदेश लागू केला. त्यात, 18 वर्षं पूर्ण केलेल्या प्रत्येक महिलेनं किमान सात वर्षं लष्करात काम करणं सक्तीचं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

हे करताना किम-जोंग-उन यांच्या नेतृत्त्वाखालच्या सरकारनं लष्करात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विचार करून एक निर्णय घेतला.

लष्करात कार्यरत महिलांना विशेष अशा स्वरुपाचे सॅनिटरी पॅड देण्यात येतील, असा निर्णय सरकारनं घेतला.

याआधी लष्करात काम करणाऱ्या महिलांवर झालेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीनं सरकारनं हे पाऊल उचललं आहे.

मात्र लष्करात काम करणाऱ्या महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणखी खूप उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

मात्र सुधारणावादी धोरणामुळं नव्यानं काही महिला लष्करात भरती होऊ शकतात.

प्योनगाँग प्रॉडक्ट्स या अग्रगण्य कॉस्मेटिक ब्रँडच्या वस्तू हवाई दलात कार्यरत महिलांना देण्यात आल्या.

उत्तर कोरियाच्या लाइफस्टाइल ब्रँड्सनी आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना टक्कर द्यायला हवी, असं आवाहन राष्ट्रप्रमुख किम-जोंग-उन यांनी केलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर लष्कराचा महिला कर्मचाऱ्यांबद्दल असलेला दृष्टिकोन बदलला आहे.

लष्करी सेवेचा भाग म्हणून दुर्गम भागात कार्यरत महिलांना प्रसाधनगृहाची व्यवस्था मिळत नाही.

अनेकदा पुरुष सहकाऱ्यांच्या समोरच त्यांना नैसर्गिक विधी उरकावे लागतात. हे फारच लाजिरवाणं असतं असं अनेक महिलांनी ज्युलिएट यांना सांगितलं.


उत्तर कोरियात लष्करी सेवा

  • उत्तर कोरियात 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक महिलेला किमान सात वर्ष लष्करात काम करणं अनिवार्य आहे. जगात कुठेही असणाऱ्या लष्करी सेवेच्या सक्तीचं हे सर्वाधिक प्रमाण आहे
  • 18 ते 25 वयोगटातल्या 40 टक्के महिला लष्करात कार्यरत असतात. दोन वर्षांपूर्वी महिलांना लष्करी सेवा करणं बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
  • देशाच्या खजिन्यापैकी 15 टक्के रक्कम लष्करासाठी खर्च करण्यात येते, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मात्र विविध अभ्यासगटांनी हे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत असल्याचं म्हटलं आहे.
  • खेळ तसंच संगीतात विशेष प्राविण्य असणाऱ्या मुलांना लष्करी सेवेतून सूट मिळू शकते.

लैंगिक शोषण आणि छळाचं प्रमाण वाढत असल्याचं बेइक आणि ज्युलिएट यांचं म्हणण आहे.

बलात्काराच्या घटना

"जेव्हा मी अत्याचाराचा विषय आता लष्करात काम करणाऱ्या महिलांसमोर काढला, तेव्हा त्यांनी अन्य महिलांना अशा प्रसंगांना सामोरे जावं लागत असल्याचं सांगितलं," असं ज्युलिएट सांगतात.

मात्र कोणीही स्वत: अशा प्रसंगाला सामोरं गेल्याचं सांगितलं नाही.

ली सो यिऑन यांनी 1992 ते 2001 या कालावधीत लष्करात काम केलं. या काळात एकदाही शारीरिक अत्याचार झाला नाही, असं ली यांनी सांगितलं.

मात्र त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक जणींना हा दुर्देवी अनुभव आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कंपनी कमांडरच या अत्याचार प्रकरणात अग्रणी असे. हे अत्याचार संपतच नसत.

लैंगिक छळासंदर्भातील तक्रारी गांभीर्यानं घेतल्याचं उत्तर कोरिया सरकारनं स्पष्ट केलं. लैंगिक छळाप्रकरणी दोषी आढळलेल्या पुरुष कर्मचाऱ्याला किमान सात वर्षांच्या शिक्षेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मात्र अशा मुद्यांवर कोणीही बोलण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अत्याचार करणारे पुरुष सहकारी किंवा वरिष्ठ मोकाट सुटतात, असं ज्युलिएट यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

लैंगिक छळाविषयी तक्रार दाखल न करणं किंवा त्याविषयी वाच्यता न करणं, हे वागणं उत्तर कोरियाच्या पुरुषप्रधान संस्कृतीचा परिणाम आहे.

नदी पोहून केली सुटका

आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील महिलांना बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी पाठवलं जातं. छोट्या खोपटांमध्ये या महिला राहतात. असं वास्तव्य अगदीच धोकादायक आहे.

घरगुती हिंसाचार मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र त्याविषयी जाहीरपणे महिला काहीही बोलत नाहीत. हीच प्रथा लष्करात काम करतानाही कायम राहते. अशीच संस्कृती दक्षिण कोरियाच्या लष्करातही आहे, असं त्यांनी सांगितलं.

ली सो यिऑन यांनी लष्करातल्या सिग्नल युनिटमध्ये सर्जंट म्हणून काम केलं. दक्षिण कोरियाच्या सीमेनजीक त्यांचं कार्यक्षेत्र होतं.

28 व्या वर्षी त्यांनी लष्कराला रामराम केला. इतक्या वर्षांनंतर कुटुंबासह वेळ व्यतीत करायला संधी मिळाली याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र लष्कराची नोकरी सोडल्यानं आर्थिक परिस्थिती बिघडल्याचं त्यांनी सांगितलं.

2008 मध्ये त्यांनी दक्षिण कोरियात पळून जाण्याचा निर्णय घेतला. चीनच्या दिशेनं असलेल्या सीमेवर त्यांना पकडण्यात आलं आणि वर्षभरासाठी तुरुंगात पाठवण्यात आलं.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी ट्युमेन नदी पोहत चीनमध्ये प्रवेश केला. सीमेवर त्यांची एका मध्यस्थाशी भेट झाली.

त्या मध्यस्थानंच त्यांना चीनमार्गे दक्षिण कोरियात जाण्यास मदत केली.

हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)