प्रेस रिव्ह्यू : आजच्या वृ्त्तपत्रांमध्ये देश-प्रदेशातल्या 5 मोठ्या बातम्या

Image copyright Getty Images

आजच्या मुख्य माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार तिहेरी तलाकवर प्रतिबंधात्मक कायदा लवकरच; महाराष्ट्र सरकारची ऑनलाईन शिष्यवृत्ती योजना ठरली फेल; आणि त्रिपुरात आणखी एका पत्रकाराची हत्या, या काही मुख्य बातम्या आहेत. आजच्या पाच प्रमुख बातम्या सविस्तर वाचा -

1. तिहेरी तलाकवर कायदा लवकरच

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक प्रथेवर बंदी घातल्याच्या तीन महिन्यांनंतर सरकारचा यासाठी कायदा आणण्याचा तयारीत आहे.

मुस्लीम समाजात तिहेरी तलाक देणं फौजदारी गुन्हा ठरावा, यासाठीचं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा सरकारचा विचार आहे, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने एक मंत्रीसमिती नेमली आहे, ज्यात गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि अल्पसंख्याक विषयक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे.

2. ऑनलाईन शिष्यवृत्तीची ऑफलाईनकडे घरवापसी

सरकारच्या विविध शिष्यवृत्तींची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन व्यवस्था विकसित केली होती.

Image copyright Getty Images

पण शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी राज्यातील 30 लाख पैकी एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने हा प्रयोग पूर्णत: फसल्यामुळे ही बातमी लोकसत्ता या दैनिकानं दिली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्याची आफत राज्य सरकारवर आता ओढावली आहे.

तसंच राज्यातीलल विविध विद्यापीठांनी सुरू केलेल्या अभ्यासक्रमांची माहितीही या पोर्टलवर नसल्याचा बातमीत उलेल्ख केला आहे.

3. मोदी 'ब्रम्हदेव', मोदी 'हिटलर'

"नरेंद्र मोदी हे ब्रम्हदेव आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन कधी बोलावयाचं, हे फक्त त्यांनाच माहिती असतं," असं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले, "आपण या सरकारला मोदी सरकार असं म्हणतो, कारण सत्तेत असलेल्या मंत्र्यांना आणि भाजप सदस्यांनाही सरकारच्या कारभाराबाबत काहीही माहिती नसतं."

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.

'सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ते म्हणाले, "लोकशाही मार्गाने जर्मनीत निवडून आल्यानंतर हुकूमशहा हिटलरने दोन वाक्यं सत्यात उतरवली होती - "खोटं बोल, पण रेटून बोल" आणि "शंभरदा खोटं बोललं की ते खरंच वाटतं". त्याचप्रमाणे आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार सुरू आहे."

4. रिव्हेंज पॉर्नचा वाढता धोका

नातेसंबंधांमध्ये दुरावा आल्यानंतर पूर्वाश्रमीच्या प्रियकर अथवा प्रेयसीला अद्दल घडवण्यासाठी "रिव्हेंज पॉर्न"चा वापर करतात.

Image copyright Puneet Barnala

आपल्या साथीदारासोबत घालवलेल्या खासगी क्षणांची छायाचित्रं किंवा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा प्रकार भारतातही वाढत असल्याची बातमी 'दिव्य मराठी'ने दिली आहे.

एखाद्याच्या खासगीपणाचा भंग करणाऱ्या या विकृतीला रिव्हेंज पॉर्न असं संबोधलं जातं. कधी संमतीनं तर कधी छुप्या कॅमेऱ्यातून हे खासगी क्षण शूट केले जातात आणि मग नातेसंबंध बिघडल्यावर ते सार्वजनिक केले जातात.

सायबर अँड लॉ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने 2016 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

जगभरात जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक रिव्हेंज पॉर्नसाइट्सचा असल्याचा अंदाज आहे.

इंटरनेटचा वापर करणाऱ्या 13 ते 45 या वयोगटातील जवळपास 27 टक्के नेटिझन्सचा संबंध या ना त्या कारणाने रिव्हेंज पॉर्न प्रकरणांशी आला असल्याचा बातमीत उल्लेख आहे.

5. त्रिपुरात आणखी एका पत्रकाराची हत्या

त्रिपुरामध्ये एका सैनिकानं एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या केल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे.

सुदीप दत्ता भौमिक असं मृत पत्रकाराचं नाव असून ते स्यांदन पत्रिका या स्थानिक बंगाली वृत्तपत्रात काम करायचे. त्रिपुरामधील लोकप्रिय दैनिक संवाद वृत्तपत्राचे संपादक प्रदीप भौमिक यांचे ते भाऊ होते.

एका बातमीवर काम करताना भौमिक पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनला गेले होते.

तेव्हा एका कमांडंटसोबत काही भांडण झाल्यावर त्या कमांडंटच्या सुरक्षारक्षकाने भौमिक यांच्यावर दोन गोळ्या घातल्या. आणि त्यातच रुग्णालयात नेताना भौमिक यांचा मृत्यू झाल्याचं हिंदूस्तान टाइम्सनं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)