महाराष्ट्रः अलाउद्दीन खिलजीने जेव्हा महाराष्ट्र लुटला होता...

  • डॉ. दुलारी कुरेशी
  • बीबीसी मराठीसाठी
अलाउद्दीन खिलजी

फोटो स्रोत, KISHOR NIKAM/ART WORK - NIKITA DESHPANDE

फोटो कॅप्शन,

अलाउद्दीन खिलजी आणि देवगिरी किल्ल्याचा जवळचा संबंध आहे.

अलाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र तर लुटून नेलाच, पण महाराष्ट्राची होऊ घातलेली सूनही पळवून नेली. संत ज्ञानेश्वर जेव्हा पैठणमध्ये होते, साधारणतः त्याच काळात अलाउद्दीन खिलजी तिथपासून 65 किलोमीटर अंतरावर स्वारी करून आला होता.

इतिहासाच्या या विस्मृतीत गेलेल्या महत्त्वाच्या कालखंडाविषयी लिहीत आहेत इतिहासाच्या अभ्यासक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन व्यवस्थापन विभागाच्या माजी संचालक डॉ. दुलारी कुरेशी.

देवगिरीचे यादव आणि अलाउद्दीन खिलजी यांचा इतिहास म्हणजे एक अत्यंत रोमांचक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे.

यादव राजघराण्याचं खरं नाव 'सेऊन' असं होतं. सेऊन घराणं हे मूळ द्वारावतीमधलं (द्वारकामधलं). त्यांनी आपली राजधानी चंद्रादित्यापूर म्हणजे आताच्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः नवव्या शतकात स्थापन केली.

पण शेजारच्या राज्यांनी वारंवार हल्ले केल्यामुळे यादवांना असुरक्षित वाटायला लागलं. म्हणून यादवांनी राजधानीसाठी अधिक सुरक्षित आणि भक्कम जागेची - (आताच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या) देवगिरीची - निवड केली.

फोटो स्रोत, KISHOR NIKAM

फोटो कॅप्शन,

देवगिरी किल्ला ओळखला जातो तो भक्कम तटबंदीसाठी.

राजा रामचंद्र हे 1271 मध्ये राजगादीवर बसले. पूर्वजांच्या परंपरेनुसार त्यांनीही शेजारच्या वाघेला, काकातिया, होयसाला या राज्यांशी लढाईचं सत्र सुरू ठेवलं. अनेक युद्धं जिंकून खूप संपत्ती जमा केली.

लढाई, युद्ध आणि त्यात मिळवलेला विजय असं जीवनचक्र सुरू होतं. त्यांच्या या घोडदौडीला दृष्ट लागली. म्हणूनच की काय अलाउद्दीन खिलजी हा दिल्लीहून इतक्या लांब देवगिरीला येऊन धडकला.

अबब! केवढी ही लूट!

अलाउद्दीन हा भयंकर महत्त्वाकांक्षी होता. तो दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन फिरोझ याचा जावई होता. त्याला सुलतान बनण्याची घाई झाली होती. त्याने जलालउद्दीनला खोटं सांगून 8000 अत्यंत विश्वासू सेनापती आणि सैन्याला सोबत घेऊन देवगिरीच्या दिशेनं गुप्तपणे कूच केली. हा प्रसंग आहे 1296चा.

हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा रामचंद्र यांचं पूर्ण लक्ष दक्षिणेकडील राज्यांवर हल्ला करण्याकडे होतं. त्यांना उत्तरेकडील राजकीय स्थितीची कल्पना नव्हती. हल्ल्याच्या वेळी रामचंद्र (आताच्या औरंगाबाद जिल्ह्यातील) लासूरजवळ होते.

फोटो स्रोत, KISHOR NIKAM

फोटो कॅप्शन,

देवगिरी किल्ल्याच्या माथ्यावर असलेली 'बारादरी' वास्तू.

या अकस्मात आक्रमणामुळे रामचंद्र पूर्णपणे गोंधळून गेले. कसाबसा जीव वाचवत त्यांनी देवगिरी किल्ल्यात आसरा घेतला. त्याच वेळी अलाउद्दीननं अफवा पसरवली की अजून वीस हजारांचं सैन्य उत्तरेकडून मदतीला येत आहे.

शेवटी रामचंद्र यांनी नाईलाजानं अलाउद्दीनसोबत तह केला. हा तह रामचंद्र यांना खूप महागात पडला. अलाउद्दीनला 6 मण सोनं, 7 मण मोती, 2 मण हिरे, माणिक, पाचूसह मौल्यवान खडे, 1000 मण चांदी आणि 4000 गज रेशमी कापड मिळालं.

पण नंतर या धनराशीत अधिकची भर पडणार होती. असं म्हणतात की, इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती घेऊन जाणारा तो एकमेव सुभेदार होता.

अलाउद्दीन हा सारा ऐवज घेऊन जाण्याच्या तयारीत असताना रामचंद्र यादवचा पुत्र संकरा हा एका मोहिमेवरून परतला होता. त्याच्याजवळ या मोहिमेत मिळालेला अमाप खजिना होता. अलाउद्दीनच्या हल्ल्याचा सारा वृत्तांत त्याला कळला, तेव्हा त्याला भयंकर राग आला.

तो अलाउद्दीनला धडा शिकवायला निघाला. रामचंद्रानं त्याला बरंच समजावलं, पण त्याचा उतावीळपणा नडला. अलाउद्दीननं त्याचा पराभव केला आणि मोहिमेवरून आणलेली संपत्तीही लुटण्यात आली.

सोनं, चांदी, मौल्यवान खडे, हत्ती, घोडे यांव्यतिरिक्त इलिचपूर (आताच्या विदर्भातील अचलपूर) नावाच्या जिल्ह्याचा वार्षिक महसूलही त्याला मिळाला.

आधी राणीला पळवलं

अलाउद्दीनला इतक्या मोठ्या प्रमाणावर गडगंज धनराशी मिळाल्यानं तो अधिकच मस्तीत आला. त्याला सुलतानपणाचे वेध लागले. त्यानं कपटानं सुलतान जलालउद्दीनचा काटा काढला आणि 19 जुलै 1296 ला तो दिल्लीच्या राजगादीवर बसला.

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन,

पद्मावती सिनेमात रणवीर सिंह हा अलाउद्दीनच्या भूमिकेत आहे.

सुलतानपदावर असताना अलाउद्दीनला राज्याचा विस्तार करण्याचं सुचलं. त्याची सर्वांत पहिली शिकार होती गुजरातच्या श्रीमंत प्रांताचे रखवालदार राजे करणराय. संपत्तीची हाव असल्यानं अलाउद्दीननं गुजरात प्रांताची निवड केली. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवलं.

1297ला झालेल्या हल्ल्यात करणराय यांचा मोठा पराभव झाला आणि त्यांना आपल्या मुलीला- राजकन्या देबाला देवीला- घेऊन पळ काढावा लागला. देवगिरीचा राजा रामचंद्र यादव याच्या आश्रयाला ते आले.

अलाउद्दीनचा सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच, सोबत राजा करणराय यांची राणी कमला देवी हिलाही बंदी केलं. कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं. तिची रवानगी अलाउद्दीनच्या जनानखान्यात करण्यात आली. अलाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका भाळला की त्यानं तिच्याशी लग्न केलं.

होऊ घातलेली सून पळवली

इतिहासकारांनी लिहिलं आहे की अलाउद्दीन हा कमला देवीवर खूप प्रेम करायचा. म्हणूनच जेव्हा कमला देवीला आपल्या मुलीची आठवण आली, तेव्हा अलाउद्दीननं ताबडतोब उलूग खान आणि मलिक कफूर यांना देबाला देवीला कुठूनही शोधून आणायला सांगितलं.

फोटो स्रोत, KISHOR NIKAM

फोटो कॅप्शन,

यादवांच्या इतिहासाची साक्ष देणारा देवगिरी किल्ला आजही भक्कमपणे उभा आहे.

तोपर्यंत इकडे राजा करणराय यांनी बगलानाच्या (आताच्या गुजरातमधील) छोट्याशा प्रदेशावर आपलं नवं राज्य स्थापन केलं होतं. आणि यादव राजकुमार संकरा देबिला देवीच्या प्रेमात पडला होता.

त्यानं आपल्या वडिलांकडून लग्नाची परवानगीही मागितली होती. परंतु राजपूत मुलीशी लग्न करायला रामचंद्रानं नकार दिला. शेवटी संकरानं राजा करणरायची संमती घेऊन आपला भाऊ भीमदेव याला देबाला देवीला आणण्यासाठी पाठवलं.

त्याच दरम्यान उलूग खान आणि मलिक कफूर राजकुमारीच्या शोधात सगळीकडे फिरत होते. सर्व शोध घेऊन झाला. राजकुमारी काही मिळत नव्हती.

उलूग खान तर फारच हताश झाला. देबाला देवीला न पकडता अलाउद्दीनच्या सामोरे जाण्याची कल्पना त्याला करवत नव्हती. अलाउद्दीनच्या क्रूर स्वभावाची कल्पना त्याला होती.

उलूग खान आणि त्याचं सैन्य वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ होते. तेव्हा त्यांना दूरवरून दक्षिणेच्या दिशेने एक सैन्याची तुकडी येताना दिसली. त्यांना वाटलं की हे राजा रामचंद्र आणि करणराय यांचंच सैन्य असून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.

पण हे सैन्य देबाला देवीला देवगिरी किल्ल्यात लग्नासाठी नेत होतं.

दोन्ही सैन्य समोरासमोर आलं. वेरूळ लेण्यांच्या परिसरात लढाईला सुरुवात झाली. देबाला देवी हे सगळं दूरवरून पाहत होती. त्याचवेळी देबाला देवीच्या घोड्याच्या पायाला बाण लागला. त्यामुळं दासींनी आरडाओरड केली. उलूग खानच्या सैन्याचं लक्ष तिकडं गेलं.

देबाला देवीला पाहून उलूग खानचा आनंद गगनात मावेना. वेळ न दवडता उलूग खान देबाला देवीला घेऊन दिल्लीच्या दिशेनं निघाला.

फोटो स्रोत, KISHOR NIKAM

फोटो कॅप्शन,

देवगिरी किल्ला

देबाला देवीला अलाउद्दीनच्या दरबारात हजर करण्यात आलं. कमला देवीला आपल्या मुलीला पाहून अत्यानंद झाला. अलाउद्दीनचा मुलगा खिजर खान यानं देबाला देवीला बघितल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. अलाउद्दीननं खिजरचं लग्न देबालाशी लावून दिलं.

या घटनेवर प्रख्यात कवी अमीर खुसरो यांनी पूर्ण कविताच लिहली आहे. पण आता ही कविता किती काल्पनिक आहे आणि किती वास्तववादी आहे हे सांगता येणार नाही.

अलाउद्दीनची सुरुवातीची वर्षं यशस्वी होती, पण अखेरच्या दिवसांमध्ये अगदी उलट पाहायला मिळतं. अखेरचे दिवस अतिशय दुःखात गेल्याचं इतिहासकार सांगतात. त्याला त्याची बायको आणि मुलं विचारत नव्हती. तो पूर्णपणे मलिक कफूरच्या आहारी गेला होता आणि आजारपणातच त्याचा अंत झाला.

(इतिहासकार मोहम्मद कासीम फरिश्ता यांनी आपल्या 'तारीखे-फरिश्ता'या पुस्तकामध्ये अंत्यत सविस्तरपणे या कालखंडाचं वर्णन केलं आहे. या पुस्तकात अलाउद्दीन आणि रामचंद्र यादव यांच्याशी संबधित प्रसंगांचं जे वर्णन आहे, ते इतर कोणत्याही पुस्तकात सापडत नाही. श्रीनिवास रित्ती यांचं 'द सेऊनास (द यादव ऑफ देवगिरी)' आणि ए. श्रीवास्तव यांचं 'हिस्ट्री ऑफ इंडिया' या पुस्तकां यादव आणि अलाउद्दीन यांची माहिती वाचायला मिळते.)

हे वाचलं का ?

तुम्ही हे पाहिलं का ?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : भल्याभल्यांना याचं उत्तर देता आलं नाही, तुम्ही प्रयत्न करणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)