DSK प्रकरणापासून गुंतवणूकदारांनी काय बोध घ्यावा?

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंद असलेले पुण्यातील बिल्डर आणि उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांना शनिवारी पहाटे दिल्लीत अटक झाली आहे.

डीएसके ग्रूपच्या गुंतवणूक योजनांमध्ये हजारो मराठी कुटुंबांनी गुंतवणूक केली. पण, त्यातील बहुतेक जणांचे पैसे अडकल्याने त्याचा फटका बसला आहे.

दीपक सखाराम कुलकर्णी किंवा डीएसके हे मराठी उद्योग विश्वातलं एक मोठं नाव. त्यांच्या नावावर विश्वास ठेवून हजारो मराठी गुंतवणूकदारांनी त्यांच्या कंपनीत ठेवी ठेवल्या आणि त्यांचं नुकसान झालं.

पुणे, मुंबई, कोल्हापूर शहरांतील गुंतवणूकदार नागरिकांनी एकत्र येत डीएसकेंविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. डीएसकेंच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे अडकले आहेत अशा व्यक्तींचे हे अनुभव.

नाव - अविनाश कुलकर्णी, वय - 68 वर्षे, राहणार - पुणे

पुण्याजवळच्या हडपसरमध्ये किर्लोस्कर न्यूमॅटिक्समधून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर एकगठ्ठा जमा झालेल्या रकमेचं आर्थिक नियोजन त्यांना करायचं होतं. त्यातली भरीव रक्कम त्यांनी दोन वर्षांपूर्वी डीएसके डेहलपर्सच्या जनधन योजनेत गुंतवली.

आतापर्यंत कंपनीने त्यांच्याकडच्या मुदत ठेवींवर कायम साडेबारा टक्क्यांच्या वर व्याज दिलं होतं. पहिल्या वर्षी एका योजनेत त्यांनी दिलेलं व्याज साडे एकोणीस टक्क्यांच्या वर होतं.

शिवाय डी.एस. कुलकर्णी हे बांधकाम उद्योगातलं वलयांकित नाव. उद्योजकतेबद्दलचे त्यांचे यूट्यूब व्हीडिओ प्रसिद्ध होते.

पुण्यात आणि पुण्याबाहेर त्यांचं नाव होतं. 'कमी अपेक्षा ठेवणं हे मराठी दळभद्रीपणाचं लक्षण आहे,' असं 'डीएसकें'नीच एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

त्यामुळे जास्त व्याजाची अपेक्षा ठेवून आडनावबंधू असलेल्या अविनाश कुलकर्णी यांनी काही लाख रुपये डीएसकेंकडे विश्वासाने दिले, असं ते सांगतात.

त्यांच्याकडची मुदत ठेवीची पावती असं सांगते की, पैसे पाच वर्षांनी दुप्पट व्हायला हवेत. प्रत्यक्षात आता त्यांना पैसे मिळण्याची कुठलीही शाश्वती सध्या नाही. कारण, 2016पासून डीएसके यांनी दिलेला एकही चेक वटलेला नाही.

फोटो कॅप्शन,

गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले

दुसरं उदाहरणही पुण्यातलं आहे. MSEBमध्ये नोकरी. आणि त्यातून साठलेल्या पैशातून DSK विश्वमध्ये घर घेतलेलं. DSKवर विश्वास इतका की निवृत्तीनंतर मिळालेली सगळी पुंजी त्यांच्याकडे गुंतवलेली.

गुंतवणूकदारांना कसली भुरळ पडली?

मुलगी डीएसके टोयोटा या जॉइंट व्हेंचरमध्ये कामाला. तर नातू डीएसके शाळेत शिकणारा. असं हे अख्खं कुटुंब डीएसकेंना वाहिलेलं. पण, आता परिस्थिती अशी आहे की, गुंतवलेली रक्कम अडकली आहे.

मुलीला मागचे कित्येक महिने पगार मिळालेली नाही आणि शाळा जेमतेम सुरू आहे. तिथेही शिक्षकांचे पगार थकले आहेत.

तिसरं उदाहरण तर पेशाने नियोजन तज्ज्ञ असलेल्या स्वाती रेणापूरकर यांचं आहे.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक चांगली म्हणून स्वाती रेणापूरकर दोन फ्लॅट घेतले. एक डीएसकेंच्या पुण्यातल्या प्रकल्पात तर दुसरा मुंबईत.

सध्या ही दोन्ही कामं कधी पूर्ण होणार, ताबा कधी मिळणार यावर डीएसकेंबरोबर फक्त चर्चा सुरू आहे. आता कंपनीकडून नवीन स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

फोटो कॅप्शन,

डीएसकेंचा निर्दोष असल्याचा दावा

ही तीन प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. अशी 3000वर प्रकरणं पुणे विभागातल्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

आपल्या गुंतवणूकीची माती झालेली असताना यातल्या काही गुंतवणूकदारांचा अजूनही डी. एस. कें.वर विश्वास कायम आहे. त्यातलेच हे दोन.

"त्यांनी जाणून बुजून काही केलेलं नाही, त्यांची व्यवसायाची गणितं फसली," असं अविनाश कुलकर्णी यांनी आपला अनुभव बीबीसीला सांगताना म्हटलं.

गुंतवणूकदार नेमके कशाला भुलले? गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांनी मार्मिक विश्लेषण केलं. त्यांच्या मते, 'लोक डीएसके यांच्या इमेजला लोकं भुलली.'

"टीव्हीवरचे त्यांचे कार्यक्रम, उद्योजकतेवरची भाषणं आणि बांधकाम व्यवसायात 2012 पर्यंतची कामगिरी यामुळे मराठी लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. शिवाय यांनी सुरुवातीला एकोणीस टक्क्यांचा वायदा केला होता. त्यालाच लोक फसले," असं वसंत कुलकर्णी मांडतात.

पैसे परत मिळतील का?

डीएसके यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप असतानाही त्यांनी लोकांना टाळलं नव्हतं. आपल्या ऑफिसमध्ये ते रोज लोकांना सामोर जात असतं.

माध्यमांत उलटसुलट चर्चा सुरु असतानाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. "आपल्याबद्दल खोटंनाटं पसरवलं जातं आहे. पैसे परत करणारच. आपलं आयुष्य पारदर्शी आहे, कोणाला फसवलेलं नाही," असा दावा त्यांनी केला होता.

"विजय माल्यासारखा पळून गेलेलो नाही," असंही ते त्यावेळी म्हणाले होते. "बांधकाम व्यवसायातली मंदी आणि मध्यंतरी झालेला अपघात याचा फटका सध्या बसला," असा दावा त्यांनी केला होता.

शिवाय मीडियाने चुकीचं वार्तांकन केल्याचा आरोपही केला होता.

फोटो कॅप्शन,

पैसे फेडणार कसे?

पण, हे कितीही खरं मानलं तरी पैसे परत करणं शक्य आहे का?

विजय कुंभार हे माहिती अधिकार कार्यकर्ते मागची चार वर्षं डीएसके गुंतवणुकदारांच्या समस्यांचा पाठपुरावा करत आहेत.

"डीएसके प्रकरण दिसतं तसं साधं नाही," असं त्यांचं म्हणणं. "आपली पत्नी आणि मुलाच्या नावे कंपन्या सुरू करून त्यांनी या कंपन्यांमार्फत जमीन खरेदी केली आहे."

"नंतर या कंपन्यांकडून त्या जमिनी डीएसके डेव्हलपर्सना दामदुप्पट दराने विकल्या आहेत. म्हणजे कुटुंबीयांच्या पदरात भरघोस नफा आणि गुंतवणुकदाराचे हात मात्र रिकामे आहेत," असं कुंभार म्हणतात.

शिवाय गुंतवणुकदारांचा पैसा त्यांनी व्यापाराच्या विस्तारासाठी वापरला आहे. त्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. मागची तीन वर्षं ते नियमित परतफेड करू शकलेले नाहीत.

हे फक्त मुदत ठेवींबाबत झालं. ज्यांनी डीएसके गृहप्रकल्पात गुंतवणूक केली आहे, त्यांनाही ताब्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

"गुंतवणूकदारांनी किमान अभ्यास करणं आवश्यक असतं. पण इथं भावनेच्या भरात आणि व्यक्तिमत्वाला भुलून लोकांनी गुंतवणूक केली आहे, तिथेच त्यांची फसगत झाली," असं कुंभार म्हणाले.

गुंतवणूकदारांचं काय होणार, याबाबत बोलताना ते म्हणाले, "डीएसके कंपनीची देणीच मुळात आहेत 5400 कोटींची आणि स्थावर मालमत्ता विकायची जरी झाली तरी बँकांची कर्ज यातून आधी वळती होणार आहेत. अशा वेळी गुंतवणूकदारांना मिळणार काय?"

गुंतवणूकदारांनी काय धडा घ्यावा?

अभ्यासपूर्ण गुंतवणूकीबद्दल तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. "अभ्यास जेव्हा कमी पडतो तेव्हा काय होतं, याचं हे उदाहरण आहे," असं ज्येष्ठ गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

'फुकटात मिळतं ते खड्ड्यात घालतं' म्हणीची आठवण त्यांनी करून दिली.

"आर्थिक विश्वात व्याजदर कमी होत असताना, एखादी कंपनी साडेबारा किंवा एकोणीस टक्क्यांची हमी कशी काय देत होते, हा प्रश्न सुजाण गुंतवणुकदारांच्या मनात यायला हवा."

"ज्या कंपनीत गुंतवणूक करायची तिची पूर्ण माहिती हवी," असं ते म्हणाले.

फोटो कॅप्शन,

बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक किती फायद्याची?

डीएसकेंच्या बाबतीत कंपनीची बॅलन्सशिट तपासली तर खरं सत्य लगेच कळतं. कंपनीने आतापर्यंत जुनी कर्जं फेडण्यासाठी नवीन कर्जं घेतली आहेत. पैशाची निर्मिती उद्योगातून झालेली नाही.

"कंपनीवर किती कर्ज आहे हेही तपासता येतं. गुंतवणूकदारांनी त्याची खातरजमा करायला हवी होती," असं वसंत कुलकर्णी यांचं म्हणणं आहे.

"शिवाय डीएसकेंनी आपल्याकडची मालमत्ता विकून कर्ज फेडल्याचं कागदपत्रात कधी दिसलं नाही. म्हणजे हेतूविषयी शंका घ्यायला वाव आहे," असंही ते म्हणाले.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे तो क्रेडिट रेटिंगचा. डीएसके मुदत ठेवींना सेबीची मान्यता आहे. पण, रेटिंग चांगलं नाही.

अशा वेळी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी, असा सल्ला वसंत कुलकर्णी यांनी दिला.

शिवाय ज्यांनी डीएसकेंच्या भरवशावर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली त्यांनाही वसंत कुलकर्णी यांचं एक सांगणं आहे.

"गुंतवणूकीत रोकड सुलभता महत्त्वाची असते. घर विकलं गेलं तरंच पैसे मिळणार असतात. त्यामुळे कर्ज घेऊन गुंतवणुकीसाठी घर घेणं शक्यतो टाळावं. मिळणारा परतावा आकर्षक असेलच असं नाही," असा सल्ला ते देतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)