प्रेस रिव्ह्यू : 'पद्मावती'वर मध्य प्रदेशपाठोपाठ गुजरातमध्येही बंदी, ब्रिटनमध्ये मंजुरी

चित्रपट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, इतिहास Image copyright AFP
प्रतिमा मथळा दीपिका पदुकोण राणी पद्मावती यांची भूमिका साकारत आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' या सिनेमाबद्दलचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरातमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सरकारनंही या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

'हिंदुस्थान टाइम्स'नं दिलेल्या बातमीनुसार, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

रजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करता येणार नाही, असं रूपाणी यांनी सांगितलं.

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनंही या सिनेमाच्या विरोधकांना पाठिंबा दिला आहे. हिंदूंच्या भावनांशी खेळू नये असं आवाहनही त्यांनी निर्मात्यांना केलं आहे.

यूकेच्या सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यामुळे पद्मावती चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

पद्मावतीवरून वाद सुरू होण्यापूर्वीच हा चित्रपट ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता, असं भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं, असं बातमीत म्हटलं आहे.

'इंडियन एक्सप्रेस'नं, भाजप नेते सूरजपाल अमू आणि कर्णी सेनेचे मुख्य लोकेंद्रसिंह कल्वी या दोघांशी बोलून बातमी केली आहे.

'पद्मावती' या सिनेमाच्या विरोधात बोलणाऱ्या या दोघांनीही तो सिनेमा न पाहताच, विरोधी भूमिका घेतली असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

'कॅन्सर म्हणजे पापाचं फळ'

आपण केलेल्या पापांमुळे लोकांना कॅन्सर होतो. तो दैवी न्यायच आहे, असं विधान आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केल्याची बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिली आहे.

Image copyright Getty Images

"पाप केलं की देव त्याची शिक्षा देतो. एखाद्या तरुणाला कॅन्सर होतो किंवा अपघात होतो. त्याची पार्श्वभूमी तपासली तर लक्षात येतं की, तो दैवी न्याय असतो. दुसरं काही नाही", असं शर्मा म्हणाले.

शिक्षकांना नियुक्तीचं पत्र देण्याच्या कार्यक्रमात शर्मा बोलत होते.

दररोज आठ शेतकरी लावतात गळ्याला फास

नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, म्हणून राज्य सरकारनं कर्जमाफी देऊ केली आहे.

तरीही राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबलेलं नाही. दररोज आठ, याप्रमाणे गेल्या दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळलं असल्याची बातमी 'लोकमत'नं दिली आहे.

Image copyright JAIDEEP HARDIKER
प्रतिमा मथळा कीटकनाशकातून विषबाधा झाल्यानं प्रवीण सोयमचा (23) मृत्यू झाला.

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर आलेली नापिकी, बी-बियाण्यांवरील वाढता खर्च, शेतमालाचे पडलेले भाव, घटलेली उत्पादकता आणि त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, या कारणांस्तव शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत.

राज्य सरकारनं जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यांत ७८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सहा महसूल विभागीय कार्यालयांतील आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील २,४१४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी निकषांस पात्र ठरलेल्या नाहीत.

अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळलं, अशी सरकारची माहिती असल्याचं 'लोकमत'नं म्हटलं आहे.

हाफिज सईदची नजरकैदेतून मुक्तता

'एबीपी माझा'च्या बातमीनुसार, मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद आता पाकिस्तानात उजळ माथ्यानं फिरू शकणार आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डानं हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Image copyright Reuters

हाफिज सईद जानेवारीपासून नजरकैदेत होता. सरकारनं हाफिजच्या नजरकैदेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्याची मागणी केली होती.

पण न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली. तसंच त्याची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. आज, गुरुवारी त्याची नजरकैदेतून सुटका होऊ शकते.

नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश देताना बोर्डाने सांगितले की, "जर जमात-उद-दावा प्रमुख हाफिज सईदविरोधात कोणत्याही प्रकरणात आरोपी नसेल, तर त्याची सुटका केली पाहिजे."

धारावी नव्हे आता अंधेरी झोपडपट्टी मोठी

मुंबईत तब्बल नऊ हजार एकर जमिनीवर झोपडपट्ट्यांचे साम्राज्य निर्माण झालं आहे.

तसंच, मुंबईत सर्वाधिक झोपडपट्ट्या धारावीत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आता झोपडपट्ट्यांचं साम्राज्य अंधेरीत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. ‌

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अंधेरीत के पूर्व विभागात सर्वाधिक झोपड्या

'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीत म्हटल्यानुसार, एसआरए प्राधिकरणानं जीआयएस प्रणालीव्दारे मुंबईच्या नकाशाचं काम पूर्ण केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या भौगोलिक सूचना प्रणालीचे (जीआयएस) बुधवारी अनावरण झालं.

एसआरएनं या प्रणालीच्या मदतीनं संपूर्ण मुंबईचा भौगोलिक नकाशा तयार केला आहे.

या नकाशाच्या माध्यमातून मुंबईत कोणत्या विभागात किती झोपड्या आहेत आणि किती भाग मोकळा आहे, याचा स्पष्ट नकाशा उपलब्ध होतो.

या प्रणालीच्या साहाय्याने मुंबई महापालिकेच्या २४ प्रभागांतील नकाशाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे.

त्या आधारावर अंधेरीत के पूर्व विभागात सर्वाधिक झोपड्या असल्याचं दिसून आलं. तर, दक्षिण मुंबईतील एक प्रभागात सर्वांत कमी झोपड्या असल्याचं दिसलं.

मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक झोपड्या धारावीत असल्याचं बोललं जात होतं. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख होती.

परंतु एसआरएनं तयार केलेल्या नकाशांवरून अंधेरीत सर्वात अधिक झोपड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याचं दिसत आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची बुधवारी भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.

'लोकसता'तल्या बातमीनुसार, सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली.

Image copyright Getty Images

आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारतानं पहिल्यांदाच जेट विमानाचा असा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आणि इतिहास घडवला, असं या बातमीत म्हटलं आहे.

`स्वाभिमानी` ची एक्सप्रेस भरकटली

नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी सोडण्यात आलेली खास रेल्वेची स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली.

नियोजित मार्गाऐवजी भलत्याच मार्गावर रेल्वे गेल्याने रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आल्याचं 'सकाळ'नं म्हटलं आहे.

सकाळी ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी हाताला येईल त्या वस्तूची फेकाफेकी करून निषेध व्यक्त केला. रेल्वेसमोर आडवे होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन झालं.

दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. यासाठीची खास रेल्वे सेवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने केली गेली होती.

परतीच्या प्रवासात मथुरा कोटा मार्गे कल्याण तिथून पुणे असा मार्ग होता. मध्यरात्री मथुरेतून रेल्वे भरकटली. ती परत आग्र्याच्या दिशेने गेली.

चुकीच्या सिग्नलमुळे रेल्वे 160 किलोमीटर मार्ग बदलून गेल्याचं लक्षात आलं.

दोन तास गोंधळ झाल्यानंतर गाडी झाशीकडे रवाना झाली. खासदार राजू शेट्टी यांनी या बाबत रेल्वेमंत्रालयाकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री; गोव्याला प्रथमच 2 उपमुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीचा डिजिटल कार्यक्रम ‘राष्ट्र महाराष्ट्र’, जिथे तुम्ही विचाराल नेत्यांना थेट प्रश्न

मुकेश अंबानी धावले अनिल यांच्या मदतीला #5मोठ्याबातम्या

नेदरलँड्सच्या ट्राममध्ये अंधाधुंद गोळीबारात तीन ठार; नऊ जखमी

प्रियंका पोहोचल्या त्या मंदिरात, जिथे एकेकाळी इंदिरांनी घेतलं होतं दर्शन

राजकारणामुळे बिघडतेय का केरळच्या मसाल्याची चव?- व्हीडिओ

'त्या हल्लेखोरालाही कधीतरी तीव्र दुःख झालं असणार...' - व्हीडिओ

मोदींचं 'पुलवामा'वर इमोशनल ब्लॅकमेलिंग - पृथ्वीराज चव्हाणांची टीका