न्या. लोया मृत्यू प्रकरण : 'सीबीआय न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी व्हावी'

न्यायालय, गुन्हे,
फोटो कॅप्शन,

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महाराष्ट्रात डिसेंबर 2014 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रजगोपाळ हरकिशन लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी, असं मत दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए. पी. शाह यांनी व्यक्त केलं आहे.

या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची आवश्यकता आहे का याचा निर्णय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तसंच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी घ्यायला हवा. कारण लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील आरोपांची शहानिशा झाली नाही तर न्यायव्यवस्थेला कलंक लागेल, असं शाह यांनी 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

मृत्यू झाला तेव्हा लोया मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश होते. नागपूरला ते एका लग्नासाठी गेले होते. भारतीय जनता पक्षाचे सध्याचे अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप असलेल्या सोहराबुद्दीन चकमक खटल्याची सुनावणी लोया यांच्यासमोर सुरू होती.

न्या. लोया यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

मात्र काही दिवसांपूर्वीच लोया यांच्या कुटुंबीयांनी 'द कॅराव्हान' यांना दिलेल्या माहितीत, लोया यांच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.

'लोया यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी झाली नाही, तर न्यायव्यवस्था आणि विशेषत: खालच्या स्तरावरील न्यायालयांना चुकीचा संकेत जाईल', असे ए. पी. शाहा यांनी वायरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)