'पद्मावती' वादात खरा अन्याय तर अलाउद्दीन खिलजीवर झाला आहे!

इतिहास, कृषी, व्यापार, लढाई Image copyright Twitter/ Deepika Padukone
प्रतिमा मथळा पद्मावती चित्रपटात रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे.

मूळ तुर्कस्तानचा अलाउद्दीन खिलजी 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. या घटनेच्या 721 वर्षांनंतर अलाउद्दीनचा संदर्भ असलेला 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रणवीर सिंह अलाउद्दीनची भूमिका साकारत आहेत.

कोणत्याही चित्रपटात तीन पात्रं महत्त्वाची असतात - हिरो, हिरोइन आणि व्हिलन. या चित्रपटात खिलजी व्हिलन आहे. मात्र वीस वर्षं दिल्लीच्या तख्तावर बसलेला खिलजी प्रत्यक्षात खलनायक होता का? इतिहास त्याच्याविषयी काय सांगतो?

मध्ययुगीन भारताचे जाणकार आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठातले इतिहास विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक सय्यद अली नदीम रजावी यांनी अलाउद्दीनसंदर्भात भूमिका मांडली - "काल्पनिक पात्र असलेल्या महाराणी पद्मिनी यांना 'पद्मावती' चित्रपटात कसं दाखवण्यात आलं आहे, यावरून वादाला तोंड फुटलं आहे. त्यानिमित्तानं विरोध, आंदोलनं होत आहेत. मात्र प्रत्यक्षात भन्साळी यांच्याकडून चित्रपटात अलाउद्दीन खिलजीवर अन्याय झाला आहे."

ते पुढे सांगतात, "चित्रपटात अलाउद्दीनला अत्यंत क्रूर, जंगली आणि जुलमी प्रशासक दाखवण्यात आलं आहे. समोरचे पदार्थ ओरबाडून खाणारा, विचित्र कपडे घालणारा, अशी त्याची प्रतिमा चित्रपटात रंगवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र अलाउद्दीन अत्यंत सुसंस्कृत होता. त्यानं अंगीकारलेली ध्येयधोरणं काळाच्या पुढचा विचार करणारी होती. या निर्णयांचे परिणाम आजही दिसतात."

"अलाउद्दीन हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या जीवनाबाबत सगळा तपशील सगळ्यांना उपलब्ध आहे. भारताच्या सगळ्यांत ज्ञानी विद्वान राजांमध्ये अलाउद्दीनचा समावेश होतो."

Image copyright Twitter/Deepika Padukone

दिल्लीवर तुर्कस्तानातल्या राजांची हुकूमत सुरू झाल्यापासून खिलजी वंशाच्या राजांनी भारतावर राज्य केलं आहे.

प्रा. रजावी सांगतात, "खिलजी वंशाच्या राजांच्या आधी दिल्लीवर इल्तुतमिश, बलबन आणि रजिया सुलतान यांनी राज्य केलं होतं. मात्र त्यांनी स्थानिक नागरिकांना प्रशासनात स्थान दिलं नाही. केवळ तुर्कस्तानच्या लोकांकडेच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असायच्या. म्हणूनच त्या राजवटीला तुर्कांची राजवट म्हटलं जायचं."

बाजारभाव नियंत्रण

रजावी यांच्या मते जलाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान झाल्यावर त्यानं भारतीय लोकांना प्रशासनात सामील करून घेण्यास सुरुवात झाली. या कालखंडाला 'खिलजी क्रांती' असं म्हटलं जातं. अलाउद्दीन खिलजीनं हा वारसा पुढे चालवला. ते केवळ परकीय तुर्कांचं सरकार नव्हतं."

"ज्या 'गंगाजमुनी' संस्कृतीसाठी भारत ओळखला जातो त्या विविधांगी संस्कृतीचा वारसा अकबरनं पुढे चालवला. मात्र याची मुहूर्तमेढ अलाउद्दीन खिलजीनं रोवली होती."

Image copyright Twitter/ Ranveerofficial
प्रतिमा मथळा अलाउद्दीननं प्रजेसाठी उपयुक्त असे अनेक निर्णय घेतले.

"वस्तूंच्या किंमती नियंत्रणात राखण्यासाठी अलाउद्दीननं आखलेलं धोरण चमत्कार समजला जातो. त्याच्या कार्यकाळात बाजारात मिळणाऱ्या सगळ्या वस्तूंचे दर नियंत्रणात होते."

जवाहरलाल नेहरू विद्यापाठीत इतिहासाचे प्राध्यापक नजफ हैदर म्हणतात, "व्यापारउदीम, व्यवसाय, बाजारभाव यासंदर्भात अलाउद्दीनचं धोरण लोकप्रिय होतं. त्यानं वस्तूंचे दर निश्चित करण्याला प्राधान्य दिलं होतं."

वस्तूंचे दर निश्चित केले

इतिहासाचे प्राध्यापक रवी सोळंकी यांच्यानुसार खिलजीनं प्रथम आपल्या कार्यकाळात वस्तूंचे दर निश्चित केले होते. बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाईड सायन्सेस' मध्ये प्रकाशित केलेल्या लेखात हाच मुद्दा मांडला आहे.

चांगलं वाण असलेला घोडा 120 टकांमध्ये मिळायचा तर दुभती म्हैस सहा टकामध्ये. चांगलं दूध देणारी गाय चार टकात मिळायची.

गहू, तांदूळ, ज्वारी यांचेही दर निश्चित होते. ठरलेल्या दरांपेक्षा अधिक किमतीला वस्तू विकल्यास सक्त कारवाई करण्यात येत असे.

Image copyright Twitter/Ranveerofficial

तत्कालीन इतिहासाचे अभ्यासक जियाउद्दीन बर्नी (1285-1357) यांच्यानुसार खिलजीनं विविध प्रकाराच्या वस्तूंसाठी स्वतंत्र बाजारपेठांची व्यवस्था अंगीकारली होती. उदाहरणार्थ, खाद्यपदार्थांसाठी एक बाजारपेठ होती. कपडे, तेल आणि तूप यांची एकत्रित बाजारपेठ होती.

शाही भांडार

खिलजीकडे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी फौज होती. काळाबाजार रोखण्यासाठी खिलजीनं शाही भांडार सारखी सुविधा सुरू केली.

या भांडारांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची विक्री व्हायची आणि याच भांडाराच्या माध्यमातून घाऊक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात होतं.

कोणताही शेतकरी, व्यापारी किंवा मोठ्या विक्रेत्याला निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त धान्य साठवणं यायचं. तसंच ठरलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत वस्तू विकण्यावर बंदी होती.

साठेबाजी करणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा खिलजीनं निश्चित केली होती.

Image copyright Delhi.gov.in
प्रतिमा मथळा दिल्ली शहर अलाउद्दीनच्या साम्राज्याचा बालेकिल्ला होता.

वस्तूंच्या दळणवळणावरही खिलजीचं बारीक लक्ष असायचं. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या आणि विक्री झालेल्या वस्तूंवर खिलजीच्या प्रशासनाची करडी नजर रहायची. एखाद्या व्यक्तीला किती सामान दिलं जाऊ शकतं, हेही निश्चित करण्यात आलं होतं.

कृषीसुधारणा

खिलजीच्या काळात शेतीविषयक सुधारणा, हा महत्त्वाचा टप्पा होता. राज्याचं धोरण आखताना स्थानिकांचा विचार केला जात असे.

दिल्ली साम्राज्यात येणाऱ्या जमिनींचं सर्वेक्षण करून त्यांचा समावेश खलीसा व्यवस्थेत करण्यात खिलजीचा मोलाचा वाटा होता. पन्नास टक्के उत्पन्न करस्वरुपात घेतलं जायचं.

याव्यतिरिक्त नागरिकांवर कोणताही कर नाही आकाराला जायचा.

Image copyright Nroer.gov.in
प्रतिमा मथळा अलाउद्दीन खिलजीचा मकबरा.

जनावरांना चरायला घेऊन जाणे आणि गृहनिर्मितीवर कर आकारला जात असे. खिलजीच्या कार्यकाळात सरकार आणि प्रजा यांच्यादरम्यानच्या चौधरी, मुकादम या मध्यस्थ यंत्रणांचे अधिकार सीमित करण्यात आले होते. चौधरी आणि मुकादम यांनाही कर भरावा लागत असे.

खिलजीनं शेतकरी आणि सरकार यांच्यातली मध्यस्थांची साखळी रद्द केली. शेतीविषयकही सुधारणा करताना खिलजीनं प्रशासन सच्चं असेल यावर भर दिला. सरकार आणि प्रजा यांच्यातरी दरी सांधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं.

मंगोलांपासून बचाव

प्राध्यापक रजावी सांगतात, "शेतीविषयक सुधारणांमध्ये खिलजी प्रशासनातल्या स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची होती. आपल्या जमिनीत कोणती पीकं पिकतात, शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं, कोणत्या नैसर्गिक अडचणी येतात याची स्थानिकांना जाण होती. शेतकरी आणि श्रमिकांचा विचार करणारा खिलजी पहिलाच बादशहा होता."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोठ्या लढाया जिंकण्यासाठी अलाउद्दीन प्रसिद्ध होता.

खिलजीनं मंगोलांपासून भारताचा बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली साम्राज्याच्या सीमा त्यांनं निश्चित करून मंगोलांचं आक्रमण खिळखिळं केलं.

भारतावर सगळ्यात मोठं आक्रमण मंगोलांनी केलं होतं. मंगोलांनी मध्य आशिया आणि इराणवर कब्जा केला होता. ते भारतावर सातत्यानं आक्रमण करत होते. खिलजीचं योगदान म्हणजे त्यांनं असंख्य लढाया लढल्या आणि जिंकल्या. यामुळेच मंगोल दूर राहिले.

खिलजीनं सीरी नावाचं शहर विकसित केलं. कुतुब महरौली या जुन्या शहराची तटबंदी मजबूत केली. सीमेपासून दिल्लीपर्यंत सुरक्षा चौक्या उभारल्या. यामुळे मंगोलांच्या आक्रमणाला वेसण बसली. 24 तास आणि सातही दिवस सतर्क आणि तयार अशा सैनिकांची फौज खिलजीनं बांधली.

शक्तिशाली राजा

प्राध्यापक हैदर सांगतात, "खिलजी शक्तिशाली राजा होते. प्रत्येक राजासमोर दोन प्रकारच्या समस्या असतात. प्रतिस्पर्ध्यांपासून राज्याचा बचाव करणं आणि स्वत:चं राज्य वाढवून ताकद वाढवणं. अधिकाअधिक राज्यांना आपल्या ताफ्यात सामील करणं हेही राजाचं उद्दिष्ट असतं. सत्ताकेंद्र प्रस्थापित करून त्याची ताकद समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हा राजा आणि प्रशासनाचा हेतू असतो."

Image copyright Public domain
प्रतिमा मथळा अलाउद्दीन खिलजी.

अलाउद्दीन दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरला. त्यांनं आपल्या प्रजेसाठी सुरक्षाकवच उभारलं. त्याचवेळी स्वत:चं राज्य सातत्यानं विस्तारत ठेवलं. विविध क्षेत्रात सुधारणांची घडी बसवणाऱ्या खिलजीला मोठ्या लढाया जिंकणारा प्रशासक म्हणून ओळखले जातं.

मंगोल आक्रमणाला थोपवण्यात खिलजीचा प्रचंड वेळ आणि ऊर्जा खर्ची झाली होती. युद्धात पकडलेल्या मंगोल सैनिकांना दिल्लीत राहण्यासाठी जागा दिली. यापैकी अनेकजण आश्रित म्हणून राहू लागले.

काकांची हत्या करून राजापदी स्वार

दिल्लीस्थित मंगोल सैनिकांमध्ये फूट पडल्यानंतर खिलजीनं हरलेल्या मंगोल सैनिकांचं शीर विजयी चषक म्हणून दिल्लीतल्या प्रदर्शनात मांडले होतं. मंगोल सैनिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरावं यासाठी सैनिकांची शीरं चुन्यात घोळवून भिंतीवर लटकवली होती.

अलाउदीन खिलजी हा काका आणि सासरा जलालुद्दीन खिलजीच्या कार्यकाळात अर्थात 1291 मध्ये कडा प्रांताचा प्रशासक होता. तत्कालीन कडा प्रांत म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशातलं कौशांबी, माणिकपूर आणि प्रतापगढ जिल्ह्यातल्या काही गावांचा भाग.

Image copyright Nroer.gov.in
प्रतिमा मथळा अलाउद्दीन खिलजीचा मकबरा.

महत्त्वाकांक्षी खिलजीनं दख्खन प्रांतातल्या यादव साम्राज्यावर हल्ला करताना देवगिरीची राजधानी लुटली होती. ते करताना खिलजीनं प्रचंड प्रमाणावर खजिना रिता केला होता.

प्राध्यापक हैदर यांनी सांगितलं की, "अलाउद्दीन खिलजीची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. सत्तेचं पारडं त्यांच्या बाजूनं झुकलं होतं. अलाउद्दीन सत्ता उलथावून टाकेल अशी जलालुददीनला अपेक्षा नव्हती. तो चर्चा करण्यासाठी कडा प्रांतात आला होता. अलाउद्दीनच्या विश्वासू साथीदारांनी गंगा नदीच्या पात्रात उभ्या असलेल्या बोटीतीलच जलालुद्दीनची हत्या केली.

जलालुद्दीनच्या हत्येनंतर तात्काळ अलाउद्दीननं कडा प्रांतातच राज्याची सूत्रं ताब्यात घेतली. मग दिल्लीत पोहोचल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा राज्यारोहण झालं. छोट्या छोट्या राज्यांना ताब्यात घेत अलाउद्दीननं प्रचंड साम्राज्य स्थापन केलं. समकालीन कालखंडात शक्तिशाली राजा म्हणून अलाउद्दीननं स्वत:ची छाप उमटवली.

हे वाचलं का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)