प्रेस रिव्ह्यू : नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

कोर्ट

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाचा सत्र न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. या प्रकरणातील दहा आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

बारावीमध्ये शिकणाऱ्या नितीन आगेची 28 एप्रिल 2014 रोजी हत्या करण्यात आली होती. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता.

आरोपींनी नितीन आगेला त्याच्या वर्गातून बाहेर नेऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर डोंगरावरील झाडाला त्याला गळफास देण्यात आला, असं तक्रारीत म्हटलं होतं.

या प्रकरणात एकूण 26 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. यातील अनेक साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

बीडच्या महिला काँस्टेबलला लिंग परिवर्तनाची परवानगी

महाराष्ट्र पोलीस दलातील एका महिला काँस्टेबलनं लिंग परिवर्तनासाठी मागितलेली परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातल्या एका महिला काँस्टेबलने लिंग परिवर्तन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडे परवानगी मागितली होती. ती पोलीस प्रशासनाने नाकारली होती.

त्या विरोधात या महिलेनं न्यायालयात धाव घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून त्या महिलेला लिंग परिवर्तनाची परवानगी दिली आहे, असं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

लिंग परिवर्तन केल्यास पुरुष काँस्टेबल म्हणून काम करता येणार नाही, असं म्हणत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लिंग परिवर्तनानंतर त्यांना पुरुष काँस्टेबल म्हणून नोकरी करता येईल, असं लोकमतनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

बागपेटमध्ये तीन मुस्लीम तरुणांवर रेल्वेत हल्ला

डोक्यावर रुमाल असल्याच्या कारणावरून तीन मुस्लीम तरुणांना रेल्वेत मारहाण झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. तिघांपैकी एक जण मदरशामध्ये मौलवी आहे.

गुलझार अहमद, मोहम्मद इसरार आणि अबू बकर दिल्ली-हरिद्वार या मार्गावर रेल्वेनं प्रवास करत होते. त्यांच्या डोक्यावर रुमाल होते.

डोक्यावर रुमाल का घालता, असं म्हणत त्या तिघांना सहा सात जणांनी जबर मारहाण केली असं पोलीस अधीक्षक जयप्रकाश सिंह यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)