रिता फारिया ते मानुषी छिल्लर : कोणत्या प्रश्नोत्तरांनी या भारतीय तरुणी बनल्या 'विश्वसुंदरी'?

विश्वसुंदरी मानुषी छिल्लर Image copyright Getty Images

पहिल्या नोकरीची मुलाखत असो वा 'तिचा तो होकार', एक उत्तरात तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असते. अशाच एका उत्तराने मिस वर्ल्डच्या मुकुट भारताच्या मानुषी छिल्लरच्या शिरी येऊन विसावला.

गेल्या आठवड्यापासून सर्वत्र मानुषीची चर्चा होत आहे. या सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदासाठी मानुषीला एक प्रश्न विचारण्यात आला होता : जगातल्या कोणत्या पेशासाठी सर्वाधिक पगार दिला गेला पाहिजे?

मानुषीनं उत्तर दिलं, "माझी आई हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी प्रेरणा आहे. कारण आईकडून मिळणारं प्रेम आणि आई होण्याचा सन्मान सर्वांत मोठा. त्यामुळे आई असणं हीच सगळ्यांत मोठी नोकरी आहे. आणि याला केवळ प्रश्न पैशानं मोजता येत नाही. म्हणून सगळ्यांत जास्त पगारावर तिचा पहिला हक्क आहे."

तिच्या उत्तरानं मनं, मुकुट आणि मिस वर्ल्ड 2017चा मान पटकावत भारतीयांना 17 वर्षांनंतर तो मोठा क्षण पुन्हा आणून दिला.

एखाद्या भारतीय तरुणींनं आपल्या उत्तरांनी विश्वसुंदरीचा मुकूट पटकावण्याची ही पहिली वेळ नव्हती. ही किमया मानुषीच्या आधी पाच भारतीय तरुणींनी केली आहे.

कोण होत्या त्या? आणि काय होती त्यांची उत्तरं? जाणून घेऊया.

रीता फारिया, 1966

रीता फारिया ही भारतातलीच नव्हे, तर आशियातली पहिली युवती होती जिनं मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.

स्पर्धेत भाग घेताना रिता वैद्यकीय शिक्षण घेत होती. पण मिस वर्ल्ड झाल्यावर तिनं फार काळ मॉडेलिंग नाही केली. ती डॉक्टर झाली आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं.

Image copyright INSTAGRAM/MISSWORLD

गेल्या वर्षी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रीतानं मुकुट पटकावण्याआधी विचारलेल्या प्रश्नोत्तरांची माहिती दिली होती.

रीताला पर्सनॅलिटी राऊंडमध्ये विचारण्यात आलं होतं की "तुला नेमकं डॉक्टर का व्हायचं आहे?"

रिता म्हणाली, "भारतात महिला तज्ज्ञांची विशेष आवश्यकता आहे. तसंच भारतात लहान मुलांची संख्याही मोठी असून त्यांच्यासाठीही काम करण्याची गरज आहे."

सौंदर्य आणि समाजाचं भान, अशी उत्तम सांगड साधणाऱ्या रिताला विजेती घोषित करण्यात आलं.

ऐश्वर्या राय, 1994

ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं, "जर तुम्ही विश्वसुंदरीचा किताब पटकावलात तर पुढे काय कराल? आणि 1994 सालच्या विश्वसुंदरीमध्ये कोणते गुण असले पाहिजे?"

Image copyright INSTAGRAM

ऐश्वर्याचं उत्तर होतं, "मी जर आज मिस वर्ल्ड झाली तर मी माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करेन. शांतता, दया आणि सौहार्दाचा संदेश देण्याचा मी प्रयत्न करेन. त्यामुळे आपला 'ब्यूटी विथ पर्पज' हा हेतू साध्य होऊन त्याला माझ्याकडून न्याय मिळेल."

"आतापर्यंत ज्या मिस वर्ल्ड झाल्या आहेत, त्यांनी सामान्यांबद्दल आतापर्यंत दया दाखविली आहे. एक सच्चा माणूस मिस वर्ल्डचा दावेदार आहे. धन्यवाद."

आणि पुढे काय घडलं, ते तर तुम्हाला माहीत आहेच.

डायना हेडन, 1997

आपण जर मिस वर्ल्ड झालात तर पारितोषिकाच्या रकमेचं काय कराल? तुम्ही ही रक्कम दान कराल का?

"मी मला मिळालेली रक्कम इतरांना का देऊ? ही रक्कम मी मित्र-परिवार किंवा कुटुंबावर खर्च करेन. माझ्या मनाप्रमाणे खर्च करेन किंवा त्याची गुंतवणूक करेन," असं वेगळं उत्तर डायना हेडननं दिलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अन्य स्पर्धकांसोबत डायना हेडन

एका मुलाखतीत डायना हेडननं या उत्तराबद्दल सांगितलं होतं - "परीक्षकांना नेहमी 'पृथ्वी वाचवायला हवी' आणि 'विश्वात शांतता नांदायला हवी', अशी उत्तरं या प्रश्नांवर येत असतं. पण, माझ्या उत्तरानं परिक्षक चक्रावून गेले. त्यांना या उत्तराची अपेक्षा नव्हती."

युक्ता मुखी, 1999

तुमचं आवडतं खाणं कोणतं? जर जगात तुम्हाला काही बनायला सांगितलं तर तुम्ही कोण व्हाल? त्यासाठी कोणत्या देशात जाल?

Image copyright Getty Images

"मी गेल्या 20 वर्षांपासून भारतीय खाद्यपदार्थच खात असून त्यांना मी अजून बोअर झालेली नाही. पण माझं आवडतं खाद्य हे थाई फूड आहे," असं युक्ता म्हणाली.

"ब्रिटीश कलाकार आड्री हेपबर्नच्या सौंदर्याची आणि तिच्यातल्या दयाभावाची मी चाहती आहे. तिचं तेज आणि तिच्यातली शांतता तिच्या चेहऱ्यावर झळकते," हे तिच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं.

"आणि भारत वगळता मला फ्रान्सची राजधानी पॅरीसला जायची इच्छा आहे. कारण हा मॉडेल्सचा प्रदेश आहे," असं उत्तर देत युक्ता मुखी मिस वर्ल्ड झाली.

प्रियंका चोप्रा, 2000

आज भारतातल्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी प्रियंका चोप्रा 2000 साली मिस वर्ल्डच्या मुकुटापासून केवळ एक प्रश्न दूर होती. तो प्रश्न होता - "गेल्या वर्षीच्या सौंदर्य स्पर्धेची विजेती देखील भारतीयच होती. यामुळे तुमच्यावर दबाव आहे का? आणि हयात असलेल्या कोणत्या महिलेस आपण सगळ्यांत यशस्वी मानता?"

प्रियंका म्हणाली, "मी दबावात सगळ्यांत चांगलं काम करते. कारण जेव्हा दबाव असतो तेव्हा यशस्वी होण्यासाठी माझ्यात जोश संचारतो."

"असे अनेक जण आहेत ज्यांच्या कार्यामुळे मी प्रभावित झाले आहे. यांच्यापैकी एक महिला म्हणजे मदर तेरेसा या आहेत. त्या भावुक, उत्साही आणि मानवतावादी आहेत. त्यांनी आपलं सगळं आयुष्य लोकांच्या तोंडावर हसू उमटवण्यासाठी अर्पण केलं. मी त्यांचा मनापासून सन्मान करते."

Image copyright Getty Images

प्रियांका चोप्राला 2000 साली विश्वसुंदरीचा किताब मिळाला खरा, पण तिच्या उत्तराची फार चर्चा झाली.

कारण तिला विचारण्यात आलं होतं की, तुम्ही "हयात असलेल्या" म्हणजे जिवंत असलेल्या कोणत्या महिलेला मानता. मात्र मदर तेरेसांचं निधन 1997 सालीच झालं होतं.

हे तुम्ही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)