गुजरात निवडणूक : काँग्रेससमोरची 5 मुख्य आव्हानं

राहूल गांधी हे नव्या दमानं या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहूल गांधी हे नव्या दमानं या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे राज्य. ते तीन वेळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत. मोदी यांच्यासमोर यंदा काँग्रेस पक्षाचं तगडं आव्हान असेल. गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष वेगळ्याच उत्साह आणि आत्मविश्वासानं निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे.

पण काँग्रेससमोर पाच आव्हानं आहेत. काय आहेत ही आव्हानं?

1.भारतीय जनता पक्ष गेल्या 20 वर्षांपासून गुजरातच्या सत्तेत आहे. राज्यातील शहरी मतदारसंघांवर भाजपची मजबूत पकड आहे. निमशहरी भागातही भाजप लोकप्रिय आहे.

Image copyright BBC HINDI
प्रतिमा मथळा गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस उत्साह आणि आत्मविश्वासानं भारावलेला आहे.

भाजप कित्येक वर्षांपासून सत्तेत असला तरी या पक्षाच्या समर्थक कमी झालेले नाहीत.

राज्यात झालेल्या विकासाचा लाभपण या समर्थकांच्या गटालाच मिळाला आहे. सरकारच्या विरोधात नाराजी असली तरी भाजपलाच मतदान करण्यास त्यांची पसंती आहे.

2. गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. भाजप सरकार आणि प्रशासन राज्यात हिंदुत्वाच्या विचारधारेवरच कामकाज चालवतं.

सरकारने हिंदुत्वाला विकासाशी जोडलं आहे आणि गुजरातच्या मतदारांना ते आवडतंय.

Image copyright BBC HINDI
प्रतिमा मथळा मी विकास आहे, मी गुजरात आहे. अशी जाहिरात भाजपतर्फे केली जात आहे.

3. काँग्रेस हा हिंदूविरोधी आणि मुस्लिमांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे, असं चित्र मतदारांमध्ये उभं करण्यास भाजप आणि मोदी यशस्वी झाले आहेत.

गेल्या वेळी निवडणुकांमध्ये मोदी यांनी हा फॉर्म्युला काँग्रेसविरोधात यशस्वी केला होता. गुजरातमध्ये हिंदूमध्ये मुस्लिमांप्रती असलेला द्वेष स्पष्टपणे पाहता येतो.

इथं लोकांना गुपचूप असे संदेश पाठवले जातात ज्यामध्ये मुस्लीम द्वेषाची पेरणी असते. मतदारांना आठवण करून दिली जाती की, जर काँग्रेस सत्तेत आली तर मुस्लीम आक्रमक होतील आणि तुमच्या लेकी-सुना सुरक्षित राहणार नाहीत.

Image copyright Getty Images

या प्रकराच्या प्रचारावर मतदारांचा एक मोठा वर्ग विश्वास ठेवतो.

4. काँग्रेस पहिल्यांदाच मोठ्या आत्मविश्वासानं भाजपला आव्हान देत आहे. पण पक्षानं अजूनही मुख्यमंत्री म्हणून कुठलाही चेहरा पुढे आणलेला नाही. एवढंच नव्हे तर राज्याच्या विकासासाठी ठोस असा कृती कार्यक्रमही जाहीर केलेला नाही.

मोदी पुढच्या आठवड्यापासून निवडणूक प्रचार मोहिमेला सुरुवात करत आहेत. काँग्रेसनं यापूर्वीच ही मोहीम सुरू केली आहे.

मोदी हे गुजरातच्या राजकारणातील धुरंधर खेळाडू आहेत. काँग्रेस त्यांच्या राजकीय चालींचं सक्षमपणे आकलन करू शकेल, असं सध्या तरी वाटत नाही.

5. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात विधानसभा निवडणूक जिंकणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जर असं नाही झालं तर केवळ त्यांचं राजकीय वजन कमी होणार असं नाही तर त्यांची पक्षावरील मजबूत पकडही ढिली पडेल.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
#BBCGujaratOnWheels : असा गुजरात जिथं जीपमध्ये होतो बाळांचा जन्म

त्यामुळं गुजरातचा विजय हा त्यांच्यासाठी 'जिंकू किंवा मरू' असा आहे.

या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप आपल्याकडील सगळ्या बळाचा आणि राजकीय डावपेचांचा वापर करेल.

निश्चितच काँग्रेससाठी या निवडणुकीचं आव्हान पेलणं जरा कठीणच होऊ शकतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)